Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 20 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग
यांनी नागरी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमांची
काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं आज अकराव्या नागरी सेवा
दिन समारंभात ते बोलत होते. देशाच्या आणि जनतेच्या हिताच्या आधारे निर्णय घेतले जावे,
तसंच नियम तयार करताना तो लोकांना उपयुक्त कसा राहील, याचा विचार करावा, असं ते म्हणाले.
नागरी सेवेत अधिकार मिळतात, मात्र त्याचबरोबर जबाबदारी आणि दायित्वही येत असल्याचं
ते म्हणाले. इतक्या वर्षात नागरी सेवांमुळे देशातल्या राजकारणात पोकळी जाणवली नाही, प्रशासकीय
सातत्य हे लोकशाहीच्या यशाचं महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-
सी बी एस ईनं शैक्षणिक संस्थांना पुस्तके, गणवेश आणि अन्य शालेय साहित्य विकण्यास विरोध केला आहे. शैक्षणिक संस्था या व्यावसायिक अस्थापना नसून,
त्यांनी पुस्तके, गणवेश आणि अन्य शालेय साहित्य विकणं हे नियमाच्या विरुद्ध असल्याचं मंडळानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शाळांकडून अशा प्रकारचे साहित्य
विकण्यात येत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्याच्या पार्श्चभूमीवर सी बी एस ईनं हे परिपत्रक जारी केलं आहे. शैक्षणिक संस्थांनी हे बेकायदेशीर कार्य थांबवून, उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यावर
भर द्यावा, असं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे.
****
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी
येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला मतदानानंतर पडताळणी पावती देणारे
तीस हजार व्हीव्हीपॅट यंत्रं मिळणार आहेत. निवडणूक आयोगाकडे सध्या ५३ हजार व्हीव्हीपॅट
यंत्र उपलब्ध आहेत, त्यात आणखी तीस हजार यंत्रांची भर पडल्यावर सुमारे ८४ हजार व्हीव्हीपॅट
यंत्र या दोन्ही राज्यातल्या निवडणुकीसाठी पुरेशी असल्याचं, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानं
पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.
****
मास्टर दिनानाथ स्मृति प्रतिष्ठान
आणि हृदयेश आर्ट्स यांच्या वतीनं दिले जाणारे मास्टर दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार
अभिनेते आमिर खान यांना आणि क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल क्रिकेटपटू
कपिल देव यांना जाहीर झाला आहे. हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर यांनी आज मुंबई
इथं घोषणा केली. याबरोबरच मास्टर दिनानाथ विशेष पुरस्कार अभिनेत्री वैजयंतीमाला यांना,
तर उत्कृष्ट नाटकासाठीचा मोहन वाघ पुरस्कार अभिनेते सुनिल बर्वे यांना जाहीर झाला आहे.
मुंबई इथं येत्या २४ एप्रिलला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
राज्यात आज सर्वात जास्त ४६ पूर्णांक
चार अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात आज नांदेड आणि परभणी
इथं सरासरी ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल उस्मानाबाद ४३ तर औरंगाबाद
इथं ४१ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची
लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रोडवरून
दुपारी १२ ते चार या काळात जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा निर्णय पोलीस
आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर होत असलेले
अपघात लक्षात घेऊन जड वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश
कुमार यांनी नुकताच घेतला होता. त्यामुळे जड वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांची मोठी अडचण
झाली होती. या पार्श्वभूमीवर आज पोलिस आयुक्त आणि औरंगाबाद शहरातल्या ट्रान्सपोर्ट
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
औरंगाबाद शहरामधल्या देवानगरी भागातल्या
नागरिक आणि महिलांनी पाण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. गेल्या
काही दिवसांपासून शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं या भागातल्या पाणीपुरवठ्यावर
परीणाम झाला आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण
सभेतही आज नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. पैठणहून औरंगाबाद शहराला
पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटत असल्यामुळे शहरातले पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक
विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर सर्वसाधारण सभेत
आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर टीका केली.
****
लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांसाठीची
मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून, या पार्श्वभूमीवर चोख
बंदोबस्त लावण्यात आला आहे. परभणी महानगरपालिकेसाठी काल ६५ टक्के तर लातूर महानगरपालिकेसाठी
६२ टक्के मतदान झालं होतं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या मौजे ताडपिंपळगाव
आणि मौजे देभेगाव इथल्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ५२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment