Friday, 1 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.03.2019 13.00




 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०१९ दुपारी .०० वा.

****



 व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या सर्व ठिकाणांवर सक्तवसूली संचालनालयानं आज छापे घालून तपासणी सुरू केली आहे. धूत यांना बँकेकडून सुमारे एक हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज देताना झालेली, अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे. या दोघांची मुंबई आणि इतरत्र असलेली, पाच निवासस्थानं आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही कारवाई सुरू आहे

****



 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार क्रमांक, बँक खात्यांशी संलंग्न असणं, बंधनकारक नसल्याचं, सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या योजनेचा दुसरा हप्ता येत्या एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबाला, दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये मदत सरकारकडून मिळणार आहे. गेल्या २४ फेब्रुवारीला पंतप्रधानांनी या योजनेचं उद्घाटन करताना, योजनेचा पहिल्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला.

****



जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानातच असल्याचं, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांनी मान्य केलं आहे. भारतानं मसूद विरोधात ठोस पुरावे दिल्यास, पाकिस्तान सरकार मसूदविरोधात कारवाई करेल, असं कुरैशी यांनी म्हटलं आहे. मसूद सध्या आजारांनी ग्रस्त असल्याचं, कुरैशी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्यात जैश ए मोहम्मद संघटनेचा हात असल्याचे सविस्तर पुरावे, गेल्या बुधवारीच भारत सरकारनं पाकिस्तानला दिले आहेत. जैश ए मोहम्मद संघटनेचे पाकिस्तानात अनेक दहशतवादी तळ असल्याच्या पुराव्यांचाही यात समावेश असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 पाकिस्तानच्या ताब्यात असलेले वायूदलाचे वैमानिक अभिनंदन वर्तमान यांच्या स्वागतासाठी पंजाबमधल्या वाघा सीमेवर नागरिक गर्दी करत आहेत. अभिनंदन, आज दुपारपर्यंत भारतात परत येण्याची शक्यता आहे. परवा सकाळी काश्मीरमध्ये घुसखोरी केलेलं पाकिस्तानचं विमान पिटाळून लावताना, अभिनंदन यांचं मिग विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं.



 भारतानं अभिनंदन यांना, तत्काळ बिनशर्त सुरक्षितरित्या, परत पाठवण्यास पाकिस्तानला बजावलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल पाकिस्तान संसदेत अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली होती.



 अभिनंदन यांची तत्काळ सुटका होणं, हा भारताच्या कूटनीतिचा विजय असल्याचं, भाजप अध्यक्ष खासदार अमित शहा यांनी म्हटलं आहे, ते आज नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.

****

       

 सीमा सुरक्षा दलानं, पंजाबच्या फिरोजपूर परिसरातून एका संशयिताला अटक केली असून, हा इसम हेरगिरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद इथला रहिवासी असलेला हा इसम, फिरता विक्रेता म्हणून सीमेलगतच्या परिसरात वावरत होता, मात्र त्याचा वावर संशयास्पद वाटल्यानं, त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीदरम्यान त्यानं दिलेली असंबद्ध उत्तरं तसंच त्याच्या मोबाईलमध्ये असलेले संशयास्पद नंबर, यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

****



 हुतात्मा निनाद मांडवगणे यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक इथं, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. निनाद यांचा परवा काश्मीरमध्ये वायूदलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचा पार्थिव देह नाशिक इथं आणण्यात आला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी, मांडवगणे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं. वायूदलाच्या वतीनंही मांडवगणे यांना मानवंदना देण्यात आली. मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.

****

       

 राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं, पत्रकारिता क्षेत्रातल्या पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. या स्पर्धेसाठी एक जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम दिनांक १५ मार्च २०१९ आहे. यासाठी अर्जाचा नमूना, महासंचालनालयाच्या तसंच राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

*****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...