Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 March
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०१९ सायंकाळी ६.००
****
वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत जगाचं लक्ष वेधून घेत आहे. याचं श्रेय
भारतातल्या शास्त्रज्ञांना दिलं पाहिजे, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी
म्हटलं आहे. आज सकाळी गोवा इथं डोना पॉलाच्या परिसरात, राष्ट्रीय सागरी संशोधन संस्था
आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या
वैज्ञानिक
आणि कर्मचाऱ्यांसमोर ते बोलत होते. समुद्री जैव विविधता, समुद्री प्रदूषण, वादळ संशोधन,
महासागर विज्ञान, हवामानातील बदल आणि संबंधित क्षेत्रात या संस्थेनं केलेल्या कार्याचाही
गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच, राष्ट्रीय सागरी संशोधन संस्था ही भारताच्या
सागरी पर्यावरण संवर्धन व विकासात मध्यवर्ती स्थान मिळवू शकते, असंही उपराष्ट्रपती
यावेळी बोलतांना म्हणाले.
****
पालघर जिल्ह्यातल्या
नाशिक - जव्हार मार्गावर, मोखाडाजवळ एक खाजगी बस तोरंगण घाटात, दरीत कोसळली. या अपघातात
चार जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३० जण जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
गुजरातचे काही भाविक या बसनं शिर्डी इथून डहाणू तालुक्यातल्या महालक्ष्मीच्या दर्शनाला
जात असताना, बसचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
****
लोकसभेच्या
निवडणुकीत, बुलडाणा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी
काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीच्या वतीनं माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते
डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी जाहीर झाली असून, शिवसेना - भारतीय जनता पक्ष
- भारत रिपब्लिकन पक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष, युतीच्या वतीनं विद्यमान खासदार प्रतापराव
जाधव, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बळीराम सिरस्कार निवडणुकीच्या रिंगणात उतरले
आहेत.
****
हिंगोली
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट
या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, आज विधानसभा मतदार
संघनिहाय, मतदान केंद्रांनुसार या ईव्हीएम मॅनेजमेंट प्रणालीची माहिती, राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींना देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात, जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी ही माहिती दिली.
****
दरम्यान,
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसनं सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर,
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार
सतीश चव्हाण यांनी आघाडीचा धर्म पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. शहरातल्या राष्ट्रवादी
भवन या पक्ष कार्यालयात आज जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार
परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
****
पालघर जिल्ह्यातल्या
घोलविरा जवळ आज एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली. दिवान अँड सन्स उद्योगनगरातल्या नॅशनल
फर्निचरच्या एका भागात टँकरमधून केमिकल टाकीत ओतलं जात असताना अचानक आग लागली. संपूर्ण
कंपनीत पसरलेल्या या आगीत ड्रममध्ये ठेवलेल्या केमिकलमुळेही काही स्फोट झाले. अग्निशमन
दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून, जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
कौटुंबिक
कलहाचा परिणाम मुलांच्या संवेदनशील मनावर होत असतो, त्यामुळे वैवाहिक जीवनाचं नाजूक
नातं टिकवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयांची आवश्यकता असते, असं प्रतिपादन मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न कुमार वराळे यांनी केलं आहे.
जालना इथं कौटुंबिक न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. कुटुंबातल्या सदस्यांमध्ये
आलेली कटुता दूर करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयातल्या समुपदेशकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा
करावी, असंही ते म्हणाले.
****
नवी मुंबईतल्या
तुर्भे परिसरातल्या एका गोदामात, पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापा मारुन, सत्तर लाख
रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment