आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ मे २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र राज्य देशातलं सर्वात
विकसित आणि अग्रेसर राज्य असून, देशातंर्गत आणि परदेशी गुंतवणुकीसाठीचं सर्वात चांगलं
स्थान आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या
एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. राज्यपालांनी
यावेळी ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी
नागरिकांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि राज्याच्या स्थापनेसाठी हौतात्म्य
पत्करलेल्या वीरांचं स्मरण केलं.
औरंगाबाद इथं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकट काळात शासन दुष्काळग्रस्तांच्या आणि शेतकऱ्यांच्या
पाठीशी ठामपणानं उभं असल्याचं सांगताना ते म्हणाले…..
महराष्ट्राचा एक तृतीयांश भाग हा दुष्काळग्रस्त
असून, उन्हाची तीव्रता ही विक्रमी म्हणजे ४७ डीग्री पर्यंत झाली आहे. पाण्याची संमस्या
हि दिवसेंनदिवस वाढत जाणार आहे. जनावरांच्या चाऱ्यांची परिस्थिती देखील गंभीर होत जाणार
आहे. या सर्वांची सरकारला पूर्णपणे जाणीव आहे. शासन यासंदर्भात तातडीनं पावलं उचलण्याचे ठरविले आहे. दुष्काळग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या
संकट काळात शासन ठामपणाने त्यांच्या मागे उभे
राहिल. असं आजच्या दिनी मी आश्वासित करीत आहे.
जालन्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव
लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झालं. लोणीकर यांनी उपस्थितांना महाराष्ट्र
दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलाच्या वतीन पथसंचलन करण्यात
आलं.
बीड इथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजवंदन झालं. आपलं राज्य बलशाली आणि
महान होण्यासाठी आपण कटीबध्द राहावं, असं आवाहन
त्यांनी यावेळी केलं. राज्यात बीड जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रभागी राहील, यासाठी प्रयत्न
करण्याचं आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिलं.
नंदुरबार इथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते
ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संचलनानंतर पोलीस दलातल्या पदकप्राप्त
अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
धुळ्यामध्ये पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
जागतिक कामगार दिवसही आज पाळला जात आहे. कामगारांना
त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्य नायडू यांनी तसंच राज्यपाल सी. विद्यासागर
राव यांनी कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या उरलेल्या टप्प्यांसाठीच्या प्रचाराला
आता वेग आला असून, प्रमुख राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज बिहारमध्ये प्रचार सभा घेत
आहेत.
****
राष्ट्रीय गृह निर्माण बँक ताब्यात घेतल्याची अधिसूचना
काल केंद्र सरकारनं जारी केली आहे. या बँकेचे, रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात असलेले सगळे
समभाग केंद्र सरकारनं खरेदी केले आहेत. राष्ट्रीय गृह निर्माण बँक ही गृहनिर्माण क्षेत्रातली
वित्तीय नियामक संस्था असून, अशा नियामक संस्थांवरचं दुहेरी नियंत्रण संपुष्टात आणण्याच्या
धोरणाचा एक भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी
रस्त्याच्या कामावरची छत्तीस वाहनं जाळल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या
दादापूर इथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी ही घटना घडली.
पुराडा-मालेवाडा-येरकड या महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी दादापूर या गावात काल रात्री
दीडशेहून जास्त सशस्त्र नक्षलवादी गेले, त्यांनी संपूर्ण गावभर शासनाच्या विरोधात मजकूर
लिहिलेले फलक लावले आणि नंतर वाहनं आणि यंत्रसामग्रीला आग लावली. यामध्ये छत्तीस वाहनं,
मोठे जनरेटर आणि दोन कार्यालयं जळाली, असं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथे सुरू होत असलेल्या न्यूझीलंड
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सायना नेहवाल, एच.एस.प्रणोय, बी.साई प्रणित, शुभंकर
डे आणि लक्ष्य सेन हे खेळाडू आज पहिल्या फेरीचे सामने खेळणार आहेत. सायना नेहवालचा
सामना चीनच्या वांग झियी हिच्याशी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment