आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ मे २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी होणाऱ्या
आपल्या शपथविधीसाठी बिम्सटेकच्या सदस्य देशांना आमंत्रित केलं आहे. गुरूवारी मोदी पंतप्रधानपदाची
दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ
कोविंद हे मोदी आणि मंत्रीमंडळाच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.
किरगिझस्तानचे राष्ट्रपती आणि विद्यमान शांघाय सहकारी
संघटनेचे सुरोनबे झेनबेकाव, मॉरिशसचे पंतप्रधान आणि यावर्षींचे अनिवासी भारतीय दिवसाचे अध्यक्ष प्रविन्द जगन्नाथ
यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रानं सांगितलं.
शेजारील राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या सरकारच्या धोरणाला अनुसरून या नेत्यांना
निमंत्रित करण्यात आलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी वार्ताहरांच्या
प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं. बिम्सटेक ही बंगालच्या खाडीलगतच्या देशांनी विविध
क्षेत्रातलं तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य करण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे. यामध्ये
भारतासह बांग्लादेश, म्यानमां, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान या देशांचा समावेश
आहे.
****
स्वांतत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती. या निमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साहस, देशभक्ती आणि
मजबूत भारताच्या प्रति एक अतूट आस्थेचे, स्वातंत्र्य वीर सावरकर हे प्रतिक होते. त्यांनी
अनेकांना राष्ट्र निर्मितीची प्रेरणा दिली, असं मोदी यांनी आपल्या ट्वीटरच्या संदेशात
म्हटलं आहे.
****
बालगृहातल्या बालकांना सुरक्षा, आहार, कौशल्य विकास यांसारख्या दर्जात्मक
सुविधा मिळण्याच्या हेतूनं नवीन धोरण आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्याच्या महिला
आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबईत सांगितलं. दि चिल्ड्रेन्स एड्स सोसायटीच्या
नियामक परिषदेच्या सभेत त्या बोलत होत्या. या सोसायटीच्या अंतर्गत बालकांच्या शिक्षण,
प्रशिक्षण, पुनर्वसनाचे कार्य केले जाते. हे कार्य अधिक आधुनिक पध्दतीने करण्यासाठी
संस्थेला शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात मानव - वन्यजीव
संघर्ष कमी करण्यासाठी गांभीर्यानं पावलं उचलण्यात येत असल्याचं वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी सांगितलं. काल मुंबईत त्यांच्या अध्यक्षतेखाली व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या
नियामक मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत राज्यातल्या सहा व्याघ्र प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र
संवर्धन प्रतिष्ठानच्या २०१९-२० मध्ये करावयाच्या विविध कामांना तसंच प्रस्तावित तरतुदींना
यावेळी मान्यता देण्यात आली.
****
राज्यात जानेवारी ते एप्रिल २०१९ या कालावधीत विनाहेल्मेट
वाहन चालविणाऱ्या तीन लाख ३९ हजार ९८२ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईत झालेल्या रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत
ही माहिती देण्यात आली. राज्यात या प्रकरणांमध्ये
आठ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांनी यावेळी सांगितलं. हेल्मेटचा वापर
करण्याबाबत लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा-
बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून
ही माहिती देण्यात आली. मंडळाच्या www.maharesult.nic.in,www.hsscresult.mkcl.org,
या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजेनंतर निकाल पाहता येतील. बीएसएनएल मोबाईलधारक ५७७६६
या क्रमांकावर एसएमएस पाठवूनही निकाल जाणून घेऊ शकतात. यासाठी मेसेज बॉक्समध्ये एमएचएचएससी
स्पेस सीट क्रमांक लिहून ५७७६६ या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे.
****
आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल
प्रकारात नेमबाज राही सरनोबत हिनं सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरचं टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी
ती पात्र ठरली आहे. राहीनं अंतिम फेरीत ५० गुणांपैकी ३७ गुण मिळवत ही कामगिरी केली.
१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सौरभ चौधरीनं सुवर्णपदक पटकावलं. त्यानं २४६ पूर्णांक
६ शतांश गुणांसह २४५ गुणांचा विश्वविक्रम मोडीत काढला. दरम्यान, याच प्रकारात भारताच्या
मनू भाकरेला पिस्तुल बिघडल्यानं पाचव्या स्थानावर समाधान
मानावं लागलं.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नगर परिषदेनं प्रत्येकी
दोन हजार रूपयांप्रमाणे ५०० अपंगांना, अपंग निधीचं वाटप केलं आहे. ५ टक्के अपंग निधीतून
हा निधी वाटप करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष
डॉ. संतोष मुंडे यांनी यावेळी दिली. अंबाजोगाई नगर परिषद ही अपंगांना प्रोत्साहन देण्यासाठी
अनेक शैक्षणिक किंवा क्रिडासह विविध उपक्रम राबवण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment