Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
May 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात
दुष्काळग्रस्त भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधल्या जनावरांना टॅंकरद्वारे पाणी
पुरवठा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे
शेळ्या-मेंढ्यांसाठीदेखील छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत आणि
पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रीमंडळ
उपसमितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. जनावरांच्या
देखरेखीसाठी शेतकरी तसंच त्यांच्या कुटुंबातल्या महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये
राहत आहेत, या महिलांसाठी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात
आल्या आहेत. चारा छावण्यांची देयक तपासून तातडीनं अदा करण्याचे निर्देशही संबंधित जिल्हा
प्रशासनाला देण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितलं.
राज्यात
सध्या ६२०९ टॅंकर्सच्या माध्यमातून ४९२० गावे आणि दहा हजार ५०६ पाड्यांवर पाणी पुरवठा
केला जात आहे. राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण १५०१ चारा छावण्या सुरू
आहेत. त्यामध्ये जवळपास दहा लाख चार हजार ६८४ जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी
औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १११ कोटी, पुणे चार कोटी आणि नाशिक विभागीय आयुक्तांना
४७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
मराठवाडा
आणि विदर्भातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जात असलेल्या विद्युत शुल्क
माफीची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं आज घेतला
आहे. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
या सवलतीची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपली होती. या सवलतीमुळे महावितरणला होणारा ६००
कोटी रूपयांचा तोटा राज्य सरकार भरून देणार आहे.
याशिवाय
येत्या पावसाळ्यात राज्यात पाऊस पडण्याचं प्रमाण वाढावं यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग
राबवण्यासही राज्य मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. मध उद्योगाला चालना देण्यासाठी
संपूर्ण राज्यात मध केंद्र योजना राबवण्यात येणार आहे. पुणे आणि कोल्हापूर इथं मंजूर
करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी ९२ पदांची निर्मिती करण्यासही राज्य मंत्रीमंडळानं
आज मंजुरी दिली. बारामती नगरपरिषदेनं क्रिडांगणासाठी आरक्षित केलेल्या जागेचं आरक्षण
बदलून ही जागा आता आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याकरता वापरण्याच्या निर्णयालाही
मान्यता देण्यात आली.
जळगाव
जिल्ह्यातल्या फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी सात कोटी रुपयांची थकहमी देण्यासही
मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितल्या
स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे समावेशन पुन्हा वन विभागाकडे करण्याच्या निर्णयालाही
मंत्रीमंडळानं मान्यता दिली. यामुळे या विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, सेवाज्येष्ठता,
पदोन्नती आदींबाबतच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.
****
राज्य
विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे. विधिमंडळ
कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत आज याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत या अधिवेशनाची
रूपरेषा तयार करण्यात आली. हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून १८ जूनला राज्याचा अर्थसंकल्प
सादर करण्यात येणार आहे. २१ आणि २४ जून रोजी
अर्थसंकल्पावर चर्चा होईल.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा ३० मे रोजी शपथविधी झाल्यानंतर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील
यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होईल, असं भाजपचे वरिष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी
सांगितलं. त्यांचा हा प्रवेश विनाशर्त असणार आहे, असं ते म्हणाले. विखे पाटील यांनी
आज महाजन यांची मुंबईत भेट घेतली, निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदार संघात आपल्या मुलाला
केलेल्या सहकार्याबद्ल आभार मानण्यासाठी ही भेट असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.
भाजपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या मुलाचा खुलेपणानं प्रचार केला, त्यामुळे आपल्याविरूद्ध
कारवाई झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या मौजे बाजी उम्रदच्या ग्रामसेविकेविरूद्ध लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत
विभागानं गुन्हा दाखल केला आहे, तक्रारदार कांता टोपे यांना ग्रामपंचायतीकडून काही
कागदपत्रांची आवश्यकता होती, ही कागदपत्रे देण्यासाठी ग्रामसेविकेनं त्यांना बारा हजार
रूपयांची लाच मागितली. यासंदर्भात टोपे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
नोंदवली, या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सदरील ग्रामसेविकेविरूद्ध गुन्हा
दाखल केला.
****
No comments:
Post a Comment