Saturday, 25 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.05.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५  मे २०१ सकाळी ७.१० मि.
****

v सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची राष्ट्रपतींकडे शिफारस 
v देशभरात भाजपच्या मतांच्या टक्केवारीत भरघोस वाढ; लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाणही चौदा टक्क्यांपेक्षा अधिक
v खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास संस्था -एनआयए कडून आरोपपत्र दाखल
आणि
v राज्यात विविध जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या तेवीस जूनला मतदान
****

 सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळानं काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांचा राजीनामा स्वीकारला असून, पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत पदभार सांभाळण्यास सांगितलं आहे.

 सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ येत्या ३ जून रोजी समाप्त होत असून त्याआधी, सतरावी लोकसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. दरम्यान, आज तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. त्यानंतरच नव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल.

 दरम्यान, भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या बैठकीत नेते म्हणून निवड होण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
****

 देशभरात भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. उत्तरप्रदेश, हरयाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमधे पक्षानं पन्नास टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. भाजपाला हिमाचल प्रदेश मध्ये सर्वात जास्त म्हणजे एकोणसत्तर टक्के एवढी मतं मिळाली आहेत.

 महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तावीस पूर्णांक एकोणसाठ शतांश आणि शिवसेनेला तेवीस पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के मतं मिळाल्यानं या मित्रपक्षांनी एकत्रितपणे राज्यातली निम्म्याहून अधिक मतं मिळवली आहेत. उमेदवारांना नाकारणारं नोटा मतदान, राज्यात शून्य पूर्णांक नऊ दशांश टक्के इतकं झालं आहे.
****

 सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं तीनशे तीन जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्याचं, निवडणूक विभागानं काल सायंकाळनंतर जाहीर केलं. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देशभरात साडे तीनशे जागांवर विजय मिळवला आहे.

 या विजयानंतर काल नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ मुरली मनोहर जोशी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
****

 लोकसभा निवडणुकीत अट्ठ्याहत्तर महिला उमेदवार निवडून आल्या असून, महिला खासदारांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. सतराव्या लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाण चौदा टक्क्यांहून जास्ती असेल. सोळाव्या लोकसभेतल्या एक्केचाळीस महिला खासदारांपैकी सत्तावीस खासदारांनी आपलं पद राखली आहेत. यात सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, भावना गवळी, हेमा मालिनी आणि किरण खेर यांचा समावेश आहे. तर नव्यानं खासदार होत असलेल्या एक्कावन्न महिलांमध्ये स्मृती इराणी, नवनीत राणा, भारती पवार आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश आहे.
****

 स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या हेतूनं शीख दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या प्रयत्नांसंदर्भातल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था -एनआयए नं काल एक आरोपपत्र दाखल केलं. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं या प्रकरणी, गेल्या डिसेंबर महिन्यात गुन्हा नोंदवल्यानंतर, पुण्यामधून हरपालसिंह नाईक या इसमाला अटक करण्यात आली होती, नाईक याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसनं मुंबईतून मोहियुद्दिन सिद्दिकी याला अटक केली होती. सायप्रस मध्ये राहणारा निज्जार नावाचा इसम या कटाचा सूत्रधार असल्याचं एनआयएनं म्हटलं असून, या प्रकरणी एनआयए पुढील तपास करत आहे.
****

 डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं  विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी काल यशस्वीरित्या पूर्ण केली. राजस्थानातल्या पोखरण इथं झालेल्या या चाचणीत एसयू तीस एमकेआय या विमानातून पाचशे किलो वजनाचा बॉम्ब टाकून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राज्यातल्या विविध जिल्हा परिषदा  आणि पंचायत समित्यांमधल्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या तेवीस जूनला मतदान तर चोवीस जूनला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल मुंबईत दिली. यात मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्हा परिषदेचा समावेश आहे. पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये बीड जिल्ह्यातल्या केज आणि आडस, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली, अटकळी, माहूर आणि मुखेड, तर हिंगोली जिल्ह्यातल्या जांब बुद्रुक आणि औंढा नागनाथ यांचा समावेश आहे.

 याच तारखांना विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या तेवीस रिक्तपदांच्या; तर परभणी जिल्ह्यातल्या मानवत या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आणि मतमोजणी होणार आहे.

 राज्यातल्या नऊ महानगरपालिकांतल्या पंधरा रिक्त पदांसाठीही येत्या तेवीस जून रोजी मतदान होणार असून, चोवीस जून रोजी मतमोजणी होणार आहे. यात परभणी महानगरपालिकेचा समावेश आहे.
****

 सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ, महायुतीच्या जागा वाटपात रयत क्रांती संघटनेला द्यावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते काल सांगली इथं बोलत होते. आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी असून, या मतदार संघातून आपण स्वत: निवडणूक लढवणार असल्याचं, खोत यांनी सांगितलं.
****

 निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरच्या आक्षेपांबाबत, कायम स्वरूपी समाधान शोधायला हवं, असं  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ही प्रक्रिया पारदर्शी न केल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास कमी होईल, असं पाटील यांनी ट्वीट संदेशातून म्हटलं आहे.
**** 

 लातूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भारतीय जनता पक्षाचे दीपक मठपती यांची निवड झाली आहे. काल झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी तसंच पीठासीन अधिकारी जी श्रीकांत यांनी ही निवड जाहीर केली.
****

औरंगाबाद जिल्ह्यात दोन जणांचा काल तलावात बुडून मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास खुलताबाद इथं ही दुर्घटना घडली.
****

 गुजरातच्या सुरत शहरात एका खाजगी शिकवणी वर्गाच्या इमारतीला लागलेल्या आगीत वीस मुलांचा मृत्यू झाला. काल सायंकाळच्या सुमारास ही दुघर्टना घडली. गुजरात सरकारनं, मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
****

 सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज इथला गिर्यारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर मृत्यू झाला. परवा तेवीस तारखेला एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यासाठी सुमारे दोनशे गिर्यारोहकांनी गर्दी केली होती. या दरम्यान, निहाल यांचा कॅम्प-क्रमांक चार इथं पोहोचल्यावर अति थकवा आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला. २२ मे रोजी एव्हरेस्ट सर केलेल्या मुंबईच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचाही एव्हरेस्ट बाल्कनी जवळ मृत्यू झाल्याचं, आमच्या सोलापूरच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या पावसे पांगरी इथल्या ग्रामसेवक मनिषा महापुरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. महापुरे यांनी, नळयोजनेच्या कामाचं देयक मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार होती. या तक्रारीची शहानिशा करून, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****

 बीड तालुक्यातल्या शिवनी इथल्या चारा छावणीवर तपासणीसाठी आलेल्या पथकातल्या कर्मचाऱ्यांनी, सकारात्मक अहवाल देण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी छावणी चालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर या पथकातल्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. 
*****
***

No comments: