आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ मे २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या
हालचालींना वेग आला आहे. भाजप संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होत असून या बैठकीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची नेतेपदी औपचारिक घोषणा करण्यात येईल. त्यानंतर
पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या नेतेपदी निवड करण्यात
येईल. यावेळी पंतप्रधान मोदी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे.
मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची काल भेट घेऊन त्यांचा आणि त्यांच्या
मंत्रीमंडळाचा राजिनामा दिला. राष्ट्रपतींनी राजिनाम्याचा स्वीकार केला तसंच पंतप्रधानांना
व त्यांच्या मंत्रीमंडळाला नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू म्हणून काम करण्यास
सांगितलं.तत्पूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी सोळाव्या
लोकसभेच्या विसर्जनाची शिफारस केली होती.
****
दरम्यान, काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी समितीचीही
आज नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत पक्षाचे
प्रमुख नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
****
नव्या भारताच्या निर्माणासाठी आणि एकशे तीस कोटी
भारतीयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी
वचनबध्द असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवल्यानंतर केलेल्या ट्वीट मध्ये आपल्या कार्यकाळाचा
सूर्यास्त होत असला तरी आपल्या कार्यानं जी झळाळी निर्माण झाली आहे ती कोट्यावधी लोकांच्या
आयुष्यात चमतक राहील असं म्हटलं आहे .एक नवी पहाट वाट पहात असून
एक नवा कर्यकाळ सुरू होत आहे, असं त्यांनी म्हटलं म्हटल्याचं पीटीआयचं वृत आहे.
****
देशभरात भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत
भरघोस वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. उत्तरप्रदेश, हरयाणा, राजस्थान, मध्यप्रदेश,
गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमधे पक्षानं पन्नास
टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. भाजपाला हिमाचल प्रदेश मध्ये सर्वात जास्त म्हणजे
एकोणसत्तर टक्के एवढी मतं मिळाली आहेत.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तावीस पूर्णांक
एकोणसाठ शतांश आणि शिवसेनेला तेवीस पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के मतं मिळाल्यानं या
मित्रपक्षांनी एकत्रितपणे राज्यातली निम्म्याहून अधिक मतं मिळवली आहेत. उमेदवारांना
नाकारणारं नोटा मतदान, राज्यात शून्य पूर्णांक नऊ दशांश टक्के इतकं झालं आहे.
****
लोकसभा निवडणुकीत अट्ठ्याहत्तर महिला उमेदवार निवडून
आल्या असून, महिला खासदारांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. सतराव्या लोकसभेत
महिला खासदारांचं प्रमाण चौदा टक्क्यांहून जास्ती असेल. सोळाव्या लोकसभेतल्या एक्केचाळीस
महिला खासदारांपैकी सत्तावीस खासदारांनी आपलं पद राखलं आहे. यात सोनिया गांधी, सुप्रिया
सुळे, भावना गवळी, हेमा मालिनी आणि किरण खेर यांचा समावेश आहे. तर नव्यानं खासदार होत
असलेल्या एक्कावन्न महिलांमध्ये स्मृती इराणी, नवनीत कौर राणा, भारती पवार आणि साध्वी
प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेचे अध्यक्ष
डोनाल्ड ट्रंप हे जून मध्ये जापान इथं जी-२० या देशांच्या बैठकीत भेटणार आहेत. डोनाल्ड
ट्रंप यांनी काल फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील यशाबद्दल अभिनंदन केलं. भारत आणि अमेरीका या उभय देशातील संबंध दृढ करण्यासाठी
प्रयत्न करणार असल्याचं दोघांमध्ये बोलणं झाल्याचं पीटीआयच्या
वृतात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे महान
नेते असून ते आपले मीत्र असल्याचं डोनाल्ड ट्रंप यानी ट्वीट केलं आहे.
****
रायगड लोकसभा मतदार संघाची
मतमोजणी सुरू असताना शेतकरी
कामगार पक्षाचे आमदार
जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून पत्रकारास
मारहाण केल्या प्रकरणी निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी काल आमदार जयंत पाटील यांच्यासह शेकापचे अलिबागचे
आमदार पंडित पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील तसेच
राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे या चोघांविरोधात अलिबाग
पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
लोकसभा मतमोजणी सुरू असताना परवा नेहुली इथं हा प्रकार घडला होता. या प्रकाराची तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडं केल्यानंतर या
आमदारांना आणि त्यांच्या साथीदारांना बाहेर काढण्यात आले होतं. आता या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली चार
आमदारांवर गुन्हे दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment