Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
May 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
शेती
आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत
ते आज बोलत होते. राज्याच्या चार लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा
आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षीच्या पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या
केवळ चोपन्न टक्केच कर्जांचं वितरीत झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, बॅंकर्स
समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, असं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. केंद्र शासनाच्या मुद्रा बॅंक, प्रधानमंत्री जनधन
योजना, स्टॅण्ड अप इंडिया, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना
आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांमधली पत पुरवठ्याची कामगिरी देखील
सुधारली पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बँकांना बजावलं. कृषिमंत्री चंद्रकांत
पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध विभागांचे आणि बँकांचे वरिष्ठ
अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
बिजू
जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी आज पाचव्या वेळी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ
घेतली.
भारतीय
जनता पक्षाचे नेते पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे दहावे मुख्यमंत्री म्हणून आज
शपथ घेतली. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बी.डी.मिश्रा यांनी इटानगरमध्ये खांडू आणि त्यांच्या
मंत्रीमंडळातल्या अकरा मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
या
वर्षी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याच्या मुदतीत केंद्र सरकारनं
आज वाढ केली असून, आता, या अभ्यासक्रमांना येत्या एकतीस मेपर्यंत प्रवेश घेता येणार
आहे. याआधी ही मुदत अठरा मे पर्यंत होती. मात्र, या वाढीव मुदतीत, याआधी प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांना घेतलेला प्रवेश रद्द करून दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार
नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राज्यभरात तीनशे चौऱ्याहत्तर तंबाखूमुक्ती
केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
आहे. येत्या एकतीस तारखेला येणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्यानं मुंबईत
झालेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. राज्यातल्या आठशे चार आरोग्य संस्था आणि
दोन हजार सातशे पंचावन्न शाळा तंबाखूमुक्त
करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण सर्वांनी मिळून राज्य तंबाखूमुक्त
करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं आवाहनही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी
केलं आहे.
****
बीड
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी तागाच्या पिशव्या निर्मिती
प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या तीन ते पंधरा जून या कालावधीत हे प्रशिक्षण
बीड ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येणार आहे. प्लॅस्टिकच्या
पिशव्यांवर आलेल्या बंदीमुळे इतर पिशव्यांची मागणी वाढलेली असल्यामुळे या व्यवसायातली
संधी लक्षात घेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं असून, विशेषत: बचत गटातल्या महिलांनी
या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशिक्षण संस्थेनं केलं आहे.
****
अकोला
लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मोजलेलं मतदान
यात एकशे एकोणचाळीस मतांचा फरक आढळल्या प्रकरणी, कर्मचाऱ्यांची मानवी चूक झाली आहे,
कुठंही अनियमितता झालेली नाही, असं अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळवलं
आहे. मात्र, वंचित बहूजन आघाडीनं अकोला लोकसभा मतदारसंघातली निवडणूक या मुद्दावर रद्द
करण्याची मागणी कायम ठेवली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला
जिल्ह्यातल्या, आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याखाली कारावास भोगलेल्या पंच्याऐंशी व्यक्तींना
शासनानं दरमहा दहा हजार रुपये मानधन सुरु केलं आहे. तर, अशा कारावासात मरण पावलेल्या
बंदींच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. या सर्वांचं मानधन
आज खासदार संजय धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
परभणी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाथरी शाखेअंतर्गत येणाऱ्या गावांतल्या शेतकऱ्यांना दुष्काळ
अनुदानाचा दुसरा हप्ता त्वरीत द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात
आली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसनं दिला असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment