आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मे २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही
आघाडी -रालोआला केंद्रात सत्ता स्थापनेसाठी मोठं बहुमत मिळालं आहे. या आघाडीला ५४३
जागांपैकी ३३९ जागांवर विजय मिळाला असून बारा जागांवर ही आघाडी पुढं आहे. भाजपनं
स्वबळावर २९० जागा जिंकल्या असून पक्ष अन्य तेरा जागांवर आघाडीवर आहे. संयुक्त
पुरोगामी आघाडीनं ८७ जागांवर विजय मिळवला आहे आणि दोन जागांवर आघाडी घेतली आहे.
निकालांच्या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज नवी
दिल्लीत बैठक होत आहे. सोळावी लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव या बैठकीत संमत
होईल, त्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. सोळाव्या
लोकसभेची मुदत येत्या तीन जूनला संपत असून, त्यापूर्वी सतरावी लोकसभा स्थापन केली
जाणार आहे.
****
महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पक्षानं
२३ आणि शिवसेनेनं १८ जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात चार आणि
लक्षद्विप इथं एक अशा पाच जागांवर विजय मिळवला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे
सुरेश धानोरकर, औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी- ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल
मुस्लिमीनचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील तर अमरावतीमधून अपक्ष उमेदवार नवनीत कौर
राणा विजयी झाल्या आहेत.
मराठवाड्यातून औरंगाबाद वगळता, सर्व मतदार संघातून शिवसेना
भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. औरंगाबाद इथं वंचित
बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यात कडवी लढत
झाली, अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत इम्तियाज यांनी खैरे यांचा चार हजार
४९२ मतांनी पराभव केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक
चव्हाण ४० हजारावर मतांनी पराभूत झाले, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा
पराभव केला.
परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव बेचाळीस हजार मतांनी विजयी
झाले, त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर
यांचा पराभव केला.
उस्मानाबाद मधून शिवसेनेचे ओम प्रकाश राजेनिंबाळकर एक लाख
सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे
राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला.
लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांनी
काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत, यांचा दोन लाख ८९ हजार मतांनी पराभव केला.
बीडमध्ये भाजपच्या डॉक्टर प्रितम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
बजरंग सोनवणे यांचा एक लाख ६८ हजार मतांनी पराभव केला. हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत
पाटील यांनी कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा दोन लाख ७७ हजार मतांनी तर जालन्यात
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे विलास औताडे यांचा तीन लाख
३२ हजार मतांनी पराभव केला.
****
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेला विजय हा, जनता जनार्दनाचा विजय असल्याचं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयाच्या
प्रांगणात आयोजित विजयी सभेत बोलत होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी
केलेल्या भाषणात, देशातल्या जनतेचे आभार मानत, भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं.
शिवसेनेनं निकालांच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली
आहे.
निवडणुकीतल्या विजयाबद्दल, शेजारी देश असलेल्या नेपाळ,
भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, आणि पाकिस्तान सह, अमेरिका, रशिया, फ्रान्स,
जपान, इस्राईल, आणि संयुक्त अरब अमीरात आदी देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.
****
काँग्रेसच्या अपयशानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी
संवाद साधताना पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेतली आहे. देशवासियांनी दिलेल्या
निर्णयावर आपण कोणतंही प्रश्नचिन्ह उपस्थित करु इच्छित नसून, या निर्णयाचा पूर्ण
सन्मान करत असल्याचं ते म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारत असून, विधानसभा
निवडणुकीत मात्र हे चित्र दिसणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी
बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणुकीला उभे असते, तर चित्र
वेगळं दिसलं असतं, असंही पवार म्हणाले. यंदा मोदी लाटेचं रुपांतर मोदी त्सुनामीत
झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मोदी यांच्या
नेतृत्वात केलेलं काम आणि त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनामुळे हा महाविजय साकार
झाल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
//*************//
No comments:
Post a Comment