Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** नरेंद्र मोदी यांनी घेतली सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची
शपथ; कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून प्रत्येकी २४ तर नऊ जण स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री
** राज्यातल्या सात जणांना मंत्रीपदं; मराठवाड्यातून
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना संधी
** पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठीचं
१० टक्के आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी
विजय मिळवत यजमान इंग्लंडची विजयी सलामी
****
नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची
शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना एका शानदार सोहळ्यात
पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मोदी यांच्याबरोबरच २४ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून,
नऊ जणांनी स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून तर २४ जणांनी राज्यमंत्री म्हणून
शपथ घेतली. यामध्ये ४५ जण लोकसभेचे तर १३ जण राज्यसभेचे सदस्य आहेत. महाराष्ट्रातल्या
सात खासदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं असून यामध्ये चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा
समावेश आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत, अकोल्याचे संजय धोत्रे यांचा नव्याने मंत्रीमंडळात
समावेश झाला आहे, तर मराठवाड्यातून जालन्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
रावसाहेब दानवे यांना संधी मिळाली आहे.
मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काल राजनाथ सिंग,
अमित शहा, नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारमण, रामविलास पासवान,
नरेंद्र सिंग तोमर, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गेहलोत, माजी परराष्ट्र
सचिव सुब्रह्मण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरियाल निशंक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ.
हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुक्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद
जोशी, डॉ. महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गिरीराज सिंह, गजेंद्रसिंग शेखावत या २४
जणांनी शपथ घेतली.
स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून संतोषकुमार
गंगवार, राव इंद्रजित सिंग, श्रीपाद नाईक, डॉ. जितेंद्रसिंग, किरण रिजीजू, प्रल्हादसिंग
पटेल, आर. के. सिंग, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय यांनी शपथ घेतली. तर राज्यमंत्री
म्हणून फग्गनसिंह कुलस्ते, अश्विनीकुमार चौबे, अर्जुन राम मेघवाल, व्ही. के. सिंग,
कृष्णपाल गुर्जर, रावसाहेब दानवे, गंगापूरम
किशन रेड्डी, पुरूषोत्तम रूपाला, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबूल सुप्रियो,
संजिवकुमार बलियान, संजय धोत्रे, अनुरागसिंग ठाकूर, अंगाडी सुरेश चन्नबसप्पा, नित्यानंद
राय, रतनलाल कटारिया, व्ही. मुरलीधरन, रेणुका सिंग सरूता, सोम प्रकाश, रामेश्वर तेली,
प्रतापचंद्र सारंगी, कैलास चौधरी आणि देबश्री चौधरी यांनी शपथ घेतली.
****
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठीचं
१० टक्के आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वैद्यकीय परिषदेनं
अधिकच्या जागा निर्माण केल्या नसून, आहे त्या जागेत १० टक्के खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना
प्रवेश देता येणार नाही, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरूद्ध बोस
यांच्या पीठानं म्हटलं आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही नोव्हेंबर २०१८
साली सुरू झाली असून, दहा टक्के आर्थिक मागास आरक्षणासंदर्भातील घटना दुरूस्ती ही जानेवारी
२०१९ मध्ये झाली आहे, त्यामुळे हे आरक्षण लागू करता येणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं
आहे.
चालू वर्षात आरक्षण लागू करण्यासाठी अतिरिक्त जागा वाढवण्याची
गरज आहे. जो पर्यंत भारतीय वैद्यकिय परिषद जागा निर्माण करत नाही, तो पर्यत सध्याच्या
उपलब्ध जागांसाठी आरक्षण देता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
राहुल गांधी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी
भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सद्य राजकीय परिस्थितीवर सुमारे एक तास चर्चा
झाली. काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा राहूल गांधींचा निश्चय असल्याच्या पार्श्र्वभूमीवर
त्यांनी या पदावर कायम राहावं, असं पवार यांनी त्यांना सूचवल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या
वृत्तात म्हटलं आहे. पवार यांची भेट घेतल्यानंतर गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर
मनमोहनसिंग यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
दरम्यान, कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद
कार्यक्रमासाठी आपले प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेसचे
प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका संदेशात ही माहिती दिली.
****
लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची
कारणं शोधण्यासाठी काँग्रेसनं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली
समिती नेमली असून तिचा अहवाल प्राप्त झाल्यावर काँग्रेसच्या सर्व पातळ्यांवर मोठे बदल
होण्याची शक्यता असल्याचं पक्ष सूत्रांनी काल दिल्लीत सांगितलं. येत्या १० दिवसात समिती
अहवाल सादर करेल असं समितीचे सदस्य योगानंद शास्त्री यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तडवी कुटुंबीयांनी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश
महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणाची सखोल
चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. घटनेचं गांभीर्य
लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यानं
दिली आहे.
****
तंबाखुमुक्त शाळा अभियानात
नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी
केलं आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन
प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन
संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचं कार्य करत असल्याची माहिती बडोले यांनी दिली. शाळांच्या
परिसरात मिळणारा पेन हुक्का बंद करण्याचे काम राज्य शासन करीत असून, भविष्यात संपूर्ण शाळा या
तंबाखूमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ज्या कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय आणि परिभाषित
अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू आहे, त्या
कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकित रक्कम येत्या पाच वर्षात समान हप्त्यात देण्याचा
शासन आदेश काल जारी करण्यात आला. येत्या एक जुलैला या थकबाकीचा पहिला हप्ता देण्यात
येणार आहे.
****
क्रिकेट -
इंग्लंडमध्ये सुरु झालेल्या
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कालचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना १०४ धावांनी
जिंकत यजमान इंग्लंडनं विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं निर्धारित ५०
षटकात आठ बाद ३११ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ चाळीसाव्या षटकात
सर्वबाद झाला. हा संघ केवळ २०७ धावाच करु शकला. ७९ चेंडूत ८९ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या
बेन स्टोन्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेत आज नॉटिंगहॅम
इथं वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात पाणी पुरवठा
करण्यासाठी बारामतीच्या ॲग्रीकल्चरल ट्रस्टनं २१ टँकर्स उपलब्ध करून दिले आहेत, या
टँकर्सचं लोकार्पण विधानसभेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि पुणे जिल्हा परिषद
सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते काल झालं. या टँकर्सद्वारे जिल्ह्यातल्या १०० गावांना
पाणी पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातल्या पाणी टंचाई निवारणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांनी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार हे टँकर्स
पुरवण्यात आले असून आणखी नऊ टँकर्स लवकरच उपल्ब्ध करुन दिले जाणार असल्याचं रोहित पवार
यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी
तालुक्यातल्या रेणुका साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची २०१८-१९ या वर्षाच्या रास्त आणि किफायतशीर दराची
चारशे एकोणपन्नास लाख रुपयांहून अधिक थकबाकी असल्यानं, कारखान्याच्या दोन गोदामांना
काल टाळं ठोकण्यात आलं. या थकबाकीसंदर्भात कारखान्याला चार मे रोजी नोटीस बजावण्यात
आली होती. मात्र, या नोटिसला कारखान्याकडून प्रतिसाद न आल्यामुळे उपविभागीय अधिकारी
व्ही.एल. कोळी यांनी काल ही कारवाई केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाळूज पोलिस ठाण्यातला जमादार
अशोक जगधने याला पाच हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी वैजापूर इथल्या अतिरिक्त सत्र
न्यायालयानं दोन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अपघाताचा
गुन्हा दाखल न करता जप्त वाहन परत करण्यासाठी वाहनधारकाकडून जगधने यानं ही लाच मागितली
होती. ३१ जानेवारी २०११ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून जगधने याला
अटक केली होती.
//**********//
No comments:
Post a Comment