Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय गटनेते नरेंद्र मोदी
यांना केंद्रात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे निमंत्रण
v लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, राहूल
गांधी यांनी दिलेला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारीणीकडून नामंजूर
v डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात, वकील
संजीव पुनाळेकर आणि सनातनचा साधक विक्रम भावेला अटक
आणि
v ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही.शांताराम
तर ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांना, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, राष्ट्रीय लोकशाही
आघाडी- एनडीएचे संसदीय गटनेते नरेंद्र मोदी यांना, सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं
आहे. मोदी यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना ही
माहिती दिली.
त्यापूर्वी काल मोदी यांची, भाजप संसदीय गटनेते पदासह
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संसदीय गटनेते म्हणून निवड झाली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात
काल सायंकाळी झालेल्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, मोदी यांची भाजप गटनेते
पदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला, भाजपचे माजी अध्यक्ष नीतीन गडकरी आणि राजनाथसिंह
यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. भाजपच्या नवनियुक्त तीनशे तीन खासदारांनी हात उंचावून,
हा प्रस्ताव मंजूर केला.
त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असलेल्या
शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनी मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी
एनडीएच्या संसदीय गटनेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे, संयुक्त जनता दलाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, अन्नाद्रमुक पक्षाचे
प्रमुख तमिळनाडूचे मुख्यमंत्री इ. के. पलानीसामी, राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षाचे नेते
रामविलास पासवान, यांच्यासह आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं,
एनडीएच्या नवनिर्वाचित तीनशे त्रेपन्न खासदारांनी, हात उंचावत हा प्रस्ताव मंजूर केला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर
मुरली मनोहर जोशी, रिपाईं नेते रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएचे राज्यसभेतले सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
यानंतर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी, संविधानाला
अभिवादन करून, उपस्थित सर्वांचे आभार मानले. सर्वांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ
ठरवण्यासाठी, आपण प्रयत्नरत राहू, असं मोदी म्हणाले. भारतीय लोकशाही परिपक्व होत असल्याचं, यंदाच्या निवडणुकीतून दिसून
आल्याची भावना मोदींनी व्यक्त केली. एनडीएच्या मावळत्या कार्यकाळात, विविध योजनांना
प्रतिसाद देत, देश चालवण्यात जनताही सरकारसोबत प्रत्यक्ष सहभागी झाली होती, त्यातून
निर्माण झालेल्या विश्वासामुळेच, जनतेनं पुन्हा आपल्याकडे देश चालवण्याची जबाबदारी
दिल्याचं मोदी म्हणाले. व्हीआयपी संस्कृतीच्या मोहापासून दूर राहण्याचं आवाहन मोदींनी
सर्व खासदारांना केलं.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, लोकसभेच्या नवनिर्वाचित पाचशे बेचाळीस सदस्यांची यादी सादर केली. लोकसभा निवडणुका सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल
राष्ट्रपतींनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, आणि त्यांचे सहकारी अशोक लवासा तसंच सुशील चंद्रा, निवडणूक आयोगाचे कर्मचारी,
पोलिस यंत्रणा, तसंच मतदारांचंही कौतुक
केलं.
****
काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची काल नवी दिल्लीत बैठक
झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी
स्वीकारत, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, समितीनं त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास
नकार दिला. गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीकडे पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची
सूचना गांधी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची सविस्तर कारणमिमांसा यावेळी
करण्यात आली. कार्यकारणीनं राहुल यांना पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे पूर्ण अधिकार
दिले असल्याचं, पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं.
दरम्यान, निवडणुकीतल्या पराभवाला पक्षाध्यक्ष राहुल गांधी एकटे जबाबदार नसून ती सामुहिक जबाबदारी असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं
आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर
ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन, आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास तयार
असल्याचंही चव्हाण म्हणाले.
****
आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच असल्याचं, महाराष्ट्र
स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. रालोआच्या बैठकीसाठी
दिल्लीत पोचलेल्या राणे यांनी काल महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांसमोर आपली भूमिका मांडली. आपल्या काँग्रेस प्रवेशाच्या
बातम्या खोट्या असल्याचं ते म्हणाले.
****
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात, केंद्रीय गुन्हे अन्वेषण
विभाग- सीबीआयनं काल दोघांना मुंबईतून अटक केली. वकील संजीव पुनाळेकर आणि सनातनचा साधक
विक्रम भावे, अशी या दोघांची नावं आहेत. पुनाळेकर हा दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी
एका आरोपीचा परिचित असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं असून, या हत्याकांडातल्या काही
आरोपींची पुनाळेकरनं न्यायालयात बाजू मांडली आहे. या दोघांना आज पुण्यात न्यायालयासमोर
हजर करण्यात येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात
आहे.
****
राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार
आणि राज कपूर पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री,
निर्माती तसंच दिग्दर्शक सुषमा शिरोमणी यांना तर आणि विशेष योगदान पुरस्कार अभिनेता
भरत जाधव यांना जाहीर झाला, तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन
भोसले यांना, तर विशेष योगदान पुरस्कार अभिनेता परेश रावल यांना जाहीर झाला आहे. राज्य मराठी
चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
राज्यात दुष्काळाचा कठीण काळ आहे, मात्र सर्वांनी
मिळून त्यावर मात करु, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
व्यक्त केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यात चिलेवाडी आणि नागेवाडी या
दुष्काळग्रस्त गावांची त्यांनी काल पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. दुष्काळ निवारणासाठी
राज्य सरकारकडून मदत घेऊ, असं ते म्हणाले. पाण्याचं योग्य नियोजन आणि पाण्याचा प्रत्येक
थेंब वाचवणं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दुष्काळी
भागात पाण्याचे टँकर, चारा छावण्या याबाबत जनतेकडून होत असलेल्या मागण्या सरकारपर्यंत
पोहोचवू, असं ते म्हणाले.
****
मराठवाड्याचा अनुशेष दूर
करुन विकासाला चालना देण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्वांनी मिळून दबावगट निर्माण केला
पाहिजे, असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केलं आहे. ते
काल लातूर इथं मराठवाडा विकास परिषद आणि मराठवाडा अनुशेषासंदर्भात आयोजित विचारवंत,
सर्वपक्षीयांच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. मराठवाडा दुष्काळवाडा बनत चालला
असून, आता ठोस भूमिका घेऊन पावलं उचलायला हवीत, असं सांगत, सरकारनं उपाययोजना कराव्यात
यासाठी अभ्यास, प्रबोधन, आंदोलनात्मक पावलं या तिहेरी भूमिकेतून लढा देण्याची गरज आहे,
असं ते म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात परभणी-हिंगोली राज्य महामार्गावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या नेतृत्वाखाली काल पाणी प्रश्नासाठी
रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. औंढा नागनाथ तालुक्यात जवळाबाजार इथं काल सकाळी झालेल्या
या आंदोलनात महिला आणि बालकं मोठ्या संख्येने पाण्याची भांडी घेऊन, रस्त्यावर ठाण मांडून
बसले होते. जवळाबाजार इथली वीसगाव पाणी पुरवठा योजना, गेल्या दोन वर्षांपासून बंद असून,
गावातले हातपंपही बंद पडले आहेत. पाणी पुरवठ्यासाठी टँकरची व्यवस्थाही करण्यात आली
नसल्यानं, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या "आओ शहर सुंदर बनाये"
या महास्वच्छता अभियाना अंतर्गत काल शहरातला ३२२ टन कचरा गोळा करण्यात आला. या अभियाना
अंतर्गत काल पहिल्या टप्य्यात शहरातल्या नऊ प्रभागांतर्गत ४९ ठिकाणी स्वच्छता मोहीम
राबवण्यात आली. सुमारे ८० महिला बचत गट, विविध स्वयंसेवी संस्था, मनपा शाळेतले शिक्षक
तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या अभियानात सहभागी झाले.
*****
***
No comments:
Post a Comment