Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
देशाची सुरक्षितता हाच आपला प्राथमिक उद्देश असून, आपलं सरकार
हे देशाच्या एकता आणि अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. कर्तव्य बजावतांना देशासाठी शहीद झालेल्यांबद्दल देशाला त्यांचा
सदैव अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी आज सकाळी दिल्लीतल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाला
श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर एका संदेशात नमुद केलं आहे. दरम्यान, भारतीय
जनता पक्षाचे अध्यक्ष अमीत शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मंत्रीमंडळाच्या
स्थापने संदर्भात दीड तास चर्चा केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती
भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ
देतील. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी
जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच बरोबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांच्या समाधीस्थळी जाऊन नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शपथविधी
सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद यांचं
काल नवी दिल्लीत आगमन झालं. याशिवाय म्यानमार, भूतान, किर्गिजस्तान, नेपाळ, थायलंडच्या
राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही
आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
नव्या सरकारच्या शपथविधी
सोहळ्याचं, आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे. याशिवाय सोहळ्याआधी,
संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे. हे दोन्ही
कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ. एम. रेनबो वाहिन्यांवर ऐकता येतील.
शपथविधी सोहळ्याचं थेट प्रसारण संध्याकाळी सहा वाजून ५५ मिनीटांपासून सुरु होईल. त्यामुळे
आज संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र
संध्याकाळी सहा वाजून १५
मिनिटांनी प्रसारित होईल. आणि आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र
शपथविधी सोहळ्याचं प्रसारण संपल्यानंतर प्रसारित होईल.
****
आर्थीक
गैरव्यव्हार आणि विदेशातील बेहीशोबी मालमत्ता खरेदी प्रकरणी व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा
आज दिल्ली इथं सक्तवसूली संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. याबाबत चौकशी अधीकाऱ्यांसमोर
उपस्थित राहण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. आर्थीक गैरव्यव्हार प्रतिबंधक
कायद्याखाली त्यांची चौकशी केली जात आहे.
****
विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण
आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्काराची निवड
प्रक्रिया गृह मंत्रालयानं सुरु केली आहे. पुरस्कार प्राप्त विजेत्यांच्या नावाची घोषणा
पुढच्या वर्षी २६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी नामांकन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. या पुरस्कारांसाठी नामांकनं आणि शिफारशी
केवळ www.padmaawards.gov.in या पद्म पोर्टलवर ऑनलाईन स्वीकारण्यात येतील अशी माहिती
आमच्या बातमीदारानं दिली आहे.
****
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी
राज्य सरकारनं काढलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्रातल्या
खुल्या वर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षासाठी
दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमुर्ती
रंजन गोगोई आणि न्यायमुर्ती अनिरूद्ध बोस यांच्या सुट्टीच्या पीठानं म्हटलं आहे की,
वैद्यकीय परिषदेनं अधिकच्या जागा निर्माण केल्या नसून आहे त्या जागेत १० टक्के खुल्या
वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया
ही विद्यार्थ्यांना २०१८ साली सुरू झाली असून, दहा टक्के आर्थीक मागास आरक्षणा संदर्भातील
घटना दुरूस्ती ही जानेवारी २०१९ मध्ये झाली आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
गेल्या
दोन दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधिक
४७ पुर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची काल नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं
४६ पुर्णांक एक अंश सेल्सीअस इतकं तर त्याखालोखाल बीड इथं ४४ पुर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड इथं ४४ पुर्णांक पाच अंश सेल्सीअस, उस्मानाबाद इथं ४३ पुर्णांक ४ अंश सेल्सीअस तर औरंगाबाद इथं ४२
अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद काल झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांत तसंच
मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं
व्यक्त केली आहे. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान बाहेर पडणं टाळावं, असं आवाहनही
हवामान खात्यानं केलं आहे.
************
No comments:
Post a Comment