Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24
May 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्रीय मंत्रिमंडळाची आताच नवी दिल्लीत बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, मेनका गांधी यांच्यासह विविध मंत्री
या बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आता भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपच्या नेतृत्त्वाखालील
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची उद्या संध्याकाळी नवी दिल्लीत
बैठक आयोजित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या बैठकीत नेता म्हणून
निवड होण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभेच्या ५४३ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत ३४७
जागा जिंकून आणि चार जागांवर आघाडी घेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी, नवं सरकार
स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपनं एकटयानं ३०२ जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं
असून, अभूतपूर्व विजयाच्या दिशेनं भाजपची वाटचाल सुरु आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीनं ८९ जागा जिंकल्या असून
एका जागेवर आघाडी घेतली आहे.या निवडणूकीत द्रमुकने २३ जागा, तृणमूल कॉंग्रेस आणि वाई एस आर सी पीनं प्रत्येकी
२२ जागा, शिवसेना १८ आणि जनता दल-युनायटेडनं १६ जागा जिंकल्या आहे भाजपचे ज्येष्ठ नेते
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघात चार लाख ७९ हजार पेक्षा जास्त
मतांनी विजय मिळवला आहे.
****
काँग्रेसनं पक्ष कार्यकारी समितीची उद्या नवी दिल्लीत
बैठक ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवावर या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते चर्चा
करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पक्षअध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी
आघाडी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंह या बैठकीत सहभागी होण्याची
शक्यता आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात काल रात्री
सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधीत अन्सार गझवत
उल हिंद या गटाचा म्होरक्या झकीर मुसा हा ठार झाला. त्रालमध्ये दादसरा या गावात शोधमोहीम
सुरू असताना, झकीर मुसानं पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर गोळीबार सुरू झाला आणि त्यात
तो मारला गेला. या दहशतवाद्याचा मृतदेह आज सकाळी सापडल्यावर त्याची ओळख पटवण्यात आली.
यावेळी घटनास्थळावरून शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत केल्याची माहिती सुरक्षा दलानं दिली
आहे.
*****
लंडन इथं बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी रॉबर्ट
वाड्रा यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सक्तवसुली संचालनालयानं आज दिल्ली
उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वाड्रा यांना एक एप्रिलला न्यायालयात जामीन मंजूर करण्यात
आला होता. परंतू तपासाच्या दृष्टीने, वाड्रा यांना दिलेला हा जामीन रद्द करण्याची याचिका
सक्तवसुली संचालनालयाकडून दाखल करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात पावसे पांगरी इथल्या
ग्रामसेवका मनिषा महापुरे यांच्याविरोधात लाचलुचपत विभागानं गुन्हा दाखल केला आहे.
महापुरे यांनी, नळयोजनेच्या कामाचं देयक मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितल्याची
तक्रार विभागाकडे दाखल झाली होती, या तक्रारीची शहानिशा करून, तक्रार योग्य असल्याचं
निष्पन्न झाल्यानं, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भाजपचे
दीपक मठपती यांची निवड झाली आहे. लातूर महापालिकेच्या स्थायी समितीत काँग्रेस आणि भाजपचे
प्रत्येकी आठ – आठ सदस्य असल्यानं, सभापती पदाची निवड सोडत पद्धतीनं केली जाते. काँग्रेसकडून
रविशंकर जाधव तर भाजपनं दीपक मठपती यांना सभापतिपदासाठी उमेदवारी दिली. यात दीपक मठपती
विजयी झाले. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून
काम पाहिलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात दोन जणांचा आज तलावात बुडून मृत्यू
झाला. खुलताबाद इथं आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे दोन्ही तरुण मजुरीचे
पैसे घेऊन गावाकडे परतत असताना, खुलताबाद इथं तलावात पोहण्यासाठी उतरले, मात्र तलावाच्या
खोलीचा अंदाज न आल्यानं, दोघंही पाण्यात बुडाले. काही नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा
प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचं, पोलिसांनी म्हटलं आहे.
****
अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट शिखर
सर केल्यानंतर मृत्यू झाला. काल एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यासाठी सुमारे दोनशे गिर्यारोहकांनी
गर्दी केली होती.
****
No comments:
Post a Comment