Friday, 24 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 24.05.2019 7.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May 2019
Time 7.00 AM to 7.10 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४  मे २०१ सकाळी ७.०० मि.
****
·       लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यश
·       काँग्रेसला अवघ्या ५२ जागा, अध्यक्ष राहूल गांधी अमेठीतून पराभूत तर केरळच्या वायनाडमधून विक्रमी मताधिक्यानं विजयी
·       राज्यातही भाजप - शिवसेनेला ४१ जागा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून पराभूत
आणि
·       लोकसभा निवडणुकीतला विजय जनतेला समर्पित- पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. पक्षानं आतापर्यंत निकाल घोषित झालेल्या ५०६ जागांपैकी २८८ जागा जिंकल्या असून १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपला स्वबळावर लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळालं आहे, तर भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३२९ जागांवर विजय मिळाला असून आणखी १७ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं १८ जागांवर विजय मिळवला आहे. संयुक्त जनता दलानं १६, लोकजनशक्ती पक्षानं सहा, शिरोमणी अकाली दलानं दोन जागांवर विजय मिळवला आहे.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ आतापर्यंत केवळ ५० जागांवर विजय मिळवता आला आहे, त्यांच्या आणखी दोन जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या अन्य पक्षांपैकी तामिळनाडूतला द्रविड मुनेत्र कळघम पक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाला लक्षणीय यश मिळालेलं दिसून येत नाही. द्रमुकला तामिळनाडूत २२ जागांवर विजय मिळाला असून त्यांचा आणखी एक उमेदवार आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष १०, समाजवादी पक्ष पाच, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २२, आंध्रप्रदेशमध्ये युवाजन स्त्रमिका रिथु - वायएसआर काँग्रेस २२, तेलंगणा राष्ट्र समिती नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. ओडिसात बिजु जनता दलाचे दोन उमेदवार विजय झाले असून त्यांचे दहा उमेदवार आघाडीवर आहेत.
****
देशभरात सर्व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीनं चांगलं यश मिळवलं. प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासह मंत्रीमंडळातले बहुतांशी मंत्री विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या नेत्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग, अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला विजयी झाले आहेत.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हारले आहेत, मात्र केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून ते सात लाख ९० हजार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभेतले काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, उपनेते ज्योतिरादित्य शिंदे, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, शत्रुघ्न सिन्हा, जया प्रदा यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे.
****
चार राज्यांच्या विधानसभांसाठीची ही मतमोजणी झाली आहे. यात आंध्र प्रदेशमध्ये वाय एस आर काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली आहे तर अरुणाचल प्रदेश मध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधानसभेच्या ६० जागांपैकी भाजपनं ३१ जागा जिंकल्या असून चार जागांवर आघाडी घेतली आहे. संयुक्त जनता दलनं सात, काँग्रेस चार, अन्य आणि अपक्षांनी चार जागा जिंकल्या आहेत.
१४६ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेत पुन्हा एकदा बिजू जनता दलाला सत्ता मिळाली आहे. सिक्कीम विधानसभे ३२ जागांपैकी सुरु असलेल्या मतमोजणीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चानं १३ जागी विजय मिळवला असून तीन जागांवर आघाडीवर आहेत. तर सिक्कीम डेमॉक्रॉटीक फ्रंटनं आठ जागी विजय मिळवला असून पाच जागी आघाडी घेतली आहे.
****
महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पक्षानं २३ आणि शिवसेनेनं १८ जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाच जागांवर विजय मिळवला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर, औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी- ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील तर अमरावतीमधून अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा विजयी झाल्या आहेत.
राठवाड्यातून औरंगाबाद वगळता, सर्व मतदार संघातून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे मेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. औरंगाबाद इथं वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यात कडवी लढत झाली, अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत इम्तियाज यांनी खैरे यांचा चार हजार ४९२ मतांनी पराभव केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ४० हजारावर मतांनी पराभूत झाले, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला.
परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव बेचाळीस हजार मतांनी विजयी झाले, त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा पराभव केला.
उस्मानाबाद मधून शिवसेनेचे ओम प्रकाश राजेनिंबाळकर एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला
लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत, यांचा दोन लाख ८९ हजार मतांनी पराभव केला. बीडमध्ये भाजपच्या डॉक्टर प्रितम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा एक लाख ६८ हजार मतांनी पराभव केला. हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा दोन लाख ७७ हजार मतांनी तर जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे विलास औताडे यांचा तीन लाख ३२ हजार मतांनी पराभव केला.
नागपूरमधून नितीन गडकरी, रामटेकमधून कृपाल तुमाने, गडचिरोलीमधून अशोक नेते, भंडारा - गोंदिया मधून सुनिल मेंढे, वर्धामधून रामदास तडस, अकोल्यातून संजय धोत्रे, बुलडाण्यातून प्रताप जाधव, वाशिम यवतमाळमधून भावना गवळी, जळगावमधून उन्मेष पाटील, रावेर मधून रक्षा खडसे, धुळे इथून डॉक्टर सुभाष भामरे, नंदूरबारहून हिना गावीत, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, नाशिकमधून हेमंत गोडसे, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, अहमदनगर डॉक्टर सुजय विखे पाटील, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून  सुनील तटकरे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे मावळमधून श्रीरंग बारणे, सातारामधून उदयन राजे भोसले, माढातून रणजीत निंबाळकर, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज, सांगलीमधून संजय पाटील, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगलेमधून धैयशिल माने, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहूल शेवाळे, अरविंद सावंत, उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे मनोज कोटक, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, गजानन किर्तीकर, ठाणेमधून राजन विचारे, पालघरमधून राजेंद्र गावित, भिवंडीतून कपिल पाटील, कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत.
****
शिवसेनेचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते, भाजपचे मंत्री हंसराज अहीर, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे. 
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेला विजय हा, जनता जनार्दनाचा विजय असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित विजयी सभेत बोलत होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित होते. शहा यांनी यावेळी केलेल्या भाषणात, देशातल्या जनतेचे आभार मानत, भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं.
निवडणुकीतल्या विजयाबद्दल, शेजारी देश असलेल्या नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, आणि पाकिस्तान सह, अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान, इस्राईल, आणि संयुक्त अरब अमीरात आदी देशांच्या प्रमुखांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.
//************//


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...