Friday, 31 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची नवी दिल्लीत पहिली बैठक होत आहे. राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा पहिला निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्यांना हा निर्णय समर्पित करण्यात आला आहे. तत्पुर्वी, आज दुपारी सतराव्या लोकसभेच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय, नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री, अमित शाह यांना  गृहमंत्री तसंच  नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. निर्मला सीतारमण या अर्थ आणि कंपनी व्यवहार, रामविलास पासवान हे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंग तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, तसंच रवि शंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच पर्यावरण, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यबळविकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत.
****
आज अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी त्यांच्या २९४ व्या जयंती निमीत्त विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं. माजी मंत्री गणपतराव देशमुख  यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी झालेल्या समारंभात खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर यांनी सर्व जाती धर्माना घेऊन काम केलं. त्या महामाता होत्या. त्यांचा आदर्श पुढं चालू ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
दरम्यान, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आपल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केलं. यावेळी पशूपालन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
*****
जंगलवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र देशात अव्वल असून जलयुक्त सोबतच वनयुक्त शिवार ही संकल्पना त्यासाठी उपयुक्त ठरली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिक इथं पत्रकार परिषदेत आज दिली. राज्य शासनाच्या वतीनं यंदा वनमहोत्सवाअंतर्गत ३३ कोटी झाडे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात वाघांची संख्या वाढत असून चार वर्षांपूर्वी राज्यात २०४ वाघ होते परंतु आता २५० मोठे वाघ असून बछड्यांची संख्याही वाढल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमुद केलं.
****
विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे. औरंगाबादमध्ये काल ४२ पूर्णांक तीन अंश सेल्सीअस तर उस्मानाबादमध्ये ४३ पूर्णांक नऊ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.  
****
ज्येष्ठ पत्रकार, भाषांतरकार तसंच लेखक डॉ. राम अग्रवाल यांची संसदेतील राज्यसभेत मराठी भाषांतर सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे. भारताचे राष्ट्रपती एम. वेंकाय्या नायडू यांच्या उपस्थितीत, राज्यसभेचे महासचिव देश दिपक वर्मा यांच्या हस्ते डॉ. राम अग्रवाल यांना बालयोगी सभागृहात झालेल्या समारंभात नियुक्ती बद्दल सन्मान पत्र प्रदान करण्यात आलं.
****
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त आजपासून ३० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस. व्ही.  कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना, औरंगाबाद आणि  परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

No comments: