Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधान पदाची
शपथ; आचारसंहिताही आली संपुष्टात
** काँग्रेस
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा
** पावसाचं आगमन लांबलं; हवामानाच्या
सल्ल्यानुसार शेतीच्या कामाचं नियोजन करण्याचं कृषि विभागाचं
आवाहन
** आणि
** जर्मनीतल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या
अपूर्वी चंदेलाला महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते नरेंद्र मोदी येत्या
गुरुवारी, ३० मे रोजी सायंकाळी सात वाजता नव्यानं पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती
भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांसह काही सदस्यांना मंत्री पद आणि गोपनीयतेची
शपथ देतील, असं अधिकृत वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, मालदीवचे माजी राष्ट्रपती
मोहमद नशीद आणि नेपाळचे माजी पंतप्रधान माधव नेपाळ यांनी निवडणुकीच्या विजयानंतर
शुभेच्छा दिल्या आहेत. तिन्ही देशातल्या या नेत्यांनी मोदी यांना दूरध्वनीवरून
शुभेच्छा दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. मोदी यांनी दूरध्वनी करून
शुभेच्छा दिल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले. यावेळी
मोदी यांनी शेजार धोरणाचा प्रथमच उल्लेख करत दारिद्र्याशी संयुक्तपणे लढावं लागणार
असल्याचं सांगितलं. विश्वास निर्मिती, हिंसा आणि दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण
करण्यावर त्यांनी यावेळी जोर दिला. शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी सहकार्य आवश्यक
असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
मालदीव आणि
भारता दरम्यानचे परस्पर संबंध अलिकडेच अधिक सुदृढ झाले असून जहालवादी
शक्तींविरूद्ध लढण्याच्या आवश्यकतेवर मालदीवचे राष्ट्रपती नशीद यांनी भर दिला. डचच्या पंतप्रधानांनीही मोदी यांचे विजयाबद्दल अभिनंदन
केलं आहे.
****
सतराव्या लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रीया
पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर लागू असलेली आदर्श आचार संहिता मागे घेण्यात आल्याचं
काल केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. आयोगानं याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या
कॅबिनेट सचिवांसह राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले. निवडणूक आयोगानं राष्ट्रपतींना
निवडून आलेल्या सदस्यांची यादी सादर केल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होते, त्यानंतर
संसदेचं गठन केलं जाते. गेल्या दहा मार्चपासून देशभरात आचार संहिता लागू होती.
****
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा, पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे पाठवला
आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण
यांनी राजीनामा दिला आहे.
****
मतमोजणी कार्यात अडथळे निर्माण केल्याप्रकरणी नागपूर
मतदार संघातले काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर
कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पोलीस सुत्रांनी ही माहिती दिली.
२३ मे राजी पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रात घुसून कर्मचाऱ्यांशी
वाद घातला होता. नागपूर पूर्व मतदारसंघाच्या अतिरिक्त निवडणूक अधिकारी शीतल देशमुख
यांनी पटोले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ता आदेश वंजारे आणि पक्षाचे मतदान प्रतिनिधी
यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. शीतल देशमुख यांनी जिल्हाधिकारी
आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली होती.
****
अरबी समुद्रात विषुवृत्तीय
प्रवाह अनुकूल नसल्यामुळे यावर्षी पावसाचं आगमन विलंबानं होणार आहे. मान्सून अंदमान
निकोबार द्वीपसमुहात जरी पोहोचला असला तरी अद्यापर्यंत तो सगळ्या भागात पसरला नाही.
गुरूवारपर्यंत तो अंदमान द्वीपसमूह आणि बंगालच्या खाडीत पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये
हा मान्सून सहा जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह
देशाच्या काही भागात आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं
व्यक्त केली आहे.
राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर
होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामं पूर्ण करावीत
मात्र, हवामानाच्या सल्ल्यानुसार शेतीच्या कामाचं नियोजन करण्याचं आवाहन कृषि
विभागानं केलं आहे. राज्यात किमान आठ जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्व
पावसाची शक्यता नाही. येत्या ३१ मे पर्यंत तापमान बदल होणार नसून उन्हाचा चटका कायम राहील.
तर, एक जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागात कमाल तापमान कमी
होण्यास सुरुवात होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं काल मुंबईत
वितरण झालं. याप्रसंगी, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ऑस्कर अकादमीचे
अध्यक्ष जॉन बेली, अकादमीच्या गव्हर्नर कॅरॉल लिटलटन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार चित्रपट संकलक वामन
भोसले यांना तर, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते परेश रावल यांना आणि ज्येष्ठ
अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर, अभिनेता भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं.
****
गेल्या २५ वर्षांपासून मथुरेत गोसेवा करणाऱ्या, पद्मश्री
पुरस्कार प्राप्त जर्मन नागरिक फ्रेडरिक इरिना ब्रूनिंग, उर्फ सुदेवी दासी यांच्या
व्हिसाची मुदत वाढवण्यास नकार दिल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी
आपल्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. ब्रूनिंग यांचा व्हिसा २५ जूनला संपुष्टात
येणार आहे. मात्र, व्हिसाची मुदत वाढवून न मिळाल्यास सरकारने दिलेला पद्म पुरस्कार
परत करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव
प्रकल्पाचं काम बंद पाडण्यात आलं आहे. गावातल्या पाणी प्रश्नासह इतर मागण्या जोपर्यंत
पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत प्रकल्पाचं काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी
दिला आहे. अनेकदा निवेदन देऊनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं
हे आंदोलन करण्यात आलं आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री विलासराव
देशमुख यांची ७४ वी जयंती काल लातूर इथं विविध कार्यक्रम तसंच समाजोपयोगी उपक्रमांचं
आयोजन करून साजरी करण्यात आली. बाभळगाव इथल्या विलासबागेत सकाळी अभिवादन सभा झाली.
पोद्दार रुग्णालयामध्ये मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात २८३ रूग्णांची
तपासणी करण्यात आली. आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं. याशिवाय युवक कॉंग्रेसनं गोरक्षम संस्थेत चारा वाटप केलं.
तसंच महापालिकेच्या हरित मार्गावर वृक्षारोपण केलं. महापालिकेतही विलासराव देशमुख यांची
जयंती साजरी करण्यात आली. पालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी विलासरावांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण केला.
****
मराठी बालरंग भूमीवर नवनवीन प्रयोग व्हायला हवेत असं मत रंगकर्मी डॉक्टर
सतीश साळुंके व्यक्त केलं आहे. साळुंके यांच्या, राखेतून उडाला मोर या नाटकाला राष्ट्रीय
बालनाट्य महोत्सवात कटक इथं सन्मानित करण्यत
करण्यात आलं, त्यानिमित्त औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे त्यांचा सत्कार
करण्यात आला त्यावेळी, ते बोलत होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते
साळूंके यांना सपत्नीक गौरव करण्यात आला.
****
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र
दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात, अटक करण्यात आलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे
यांना एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं
काल या दोघांना पुणे न्यायालयात हजर केलं होतं.
****
जर्मनीत म्युनिक इथं सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी
स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेलानं काल महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक
जिंकलं. अंतिम फेरीत तिनं चीनच्या वॅन्ग लुयाव हिला निसटत्या फरकानं मागे टाकलं. याच
प्रकारात भारताची ईलाव्हेनील वॅलारीवन चौथी आली. तिचं कांस्यपदक काही अंशांनी निसटलं.
२५ मीटर पिस्टल प्रकारात आशियाई सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतनं पहिल्या फेरीत २९४
गुणांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. आज ती पदकासाठी, तसंच पुढील वर्षी होणाऱ्या
टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याकरता खेळणार आहे.
****
आशियाई बॅडमिंटन परिषदेच्या उपाध्यक्षपदी, भारतीय बॅडमिंटन
संघटनेचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत,
हिमंता यांना ४० पैकी ३५ मतं मिळाली. हिमंता हे आसामचे आरोग्य आणि शिक्षण मंत्री आहेत.
हिमंता यांच्या निवडीमुळं, आशियाई बॅडमिंटन परिषदेकडून
भारतात बॅडमिंटनच्या विकासासाठी मोठं पाठबळ मिळेल अशी खात्री, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे
सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी व्यक्त केली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात शिंगणापूर फाट्याजवळ
मनमाड महामार्गावर काल जीप आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत, दोन जण ठार तर सहा
गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं नगरच्या
रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातातील मृत
दोघेही पुणे जिल्ह्यातले रहिवासी होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर
स्टेशननजीक आगाठाण शिवारात वाळूची दरड कोसळून एक जण मरण पावला. चांगदेव उदार असं या
तरुणाचा नाव असून काल पहाटे ५ वाजता ही घटना घडली. दरम्यान, औरंगाबाद-नगर महामार्गावर
दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एका घटनेत दुचाकीवरुन घसरुन एक जणाचा,
तर अन्य एका घटनेत अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment