Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेच्या पाचशे बेचाळीस
जागांपैकी पाचशे अडतीस जागांचे स्पष्ट निकाल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक
तीनशे दोन जागा जिंकत, एका जागेवर आघाडी घेतली आहे. भाजप आणि मित्रपक्षांची राष्ट्रीय
लोकशाही आघाडी तीनशे पन्नास जागा जिंकत, पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज
झाली आहे. काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीनं ८९ जागा जिंकून एका जागेवर आघाडी
घेतली आहे. काँग्रेसला स्वबळावर ५२ जागा जिंकता आल्या आहेत. इतरांनी ९७
जागा जिंकल्या असून चार जागांवर आघाडी मिळवली आहे.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना
रिपाई महायुतीनं अठ्ठेचाळीस पैकी ४१ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपनं २३, तर शिवसेनेनं
१८ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यात चार आणि लक्षद्वीपमध्ये एक
अशा पाच जागा जिंकल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनं राज्यात प्रत्येकी एक
जागा जिंकली आहे.
****
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या
यशानंतर आज सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा
यांनी आज पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नवी दिल्ली
इथं त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आडवाणी आणि डॉ. जोशी सारख्या नेत्यांनी पक्ष
निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. हे नेहमीच पक्षाला बळ देण्यासाठी आणि अनेकांना
मार्गदर्शन करण्यासाठी काम करतात.यांच्यामुळेच भाजपला आज हे यश मिळवता आलं असल्याचं
मोदी यांनी एका संदेशात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीत
झालेला पराभव स्वीकारत असून, विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र दिसणार नाही, असं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर
पत्रकारांशी बोलत होते. यंदा मोदी लाटेचं रुपांतर
मोदी त्सुनामीत झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मोदी यांच्या नेतृत्वात केलेलं काम आणि त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनामुळे हा महाविजय
साकार झाल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेनं निकालांच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे
यांनी या निकालांना अनाकलनीय संबोधलं आहे.
****
आंध्रप्रदेशमध्ये विधानसभा
निवडणुकीत वायएसआर काँग्रेसनं १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत तर तेलगू देसम पक्षाला
२३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत ३२ पैकी सिक्कीम क्रांती
मोर्चानं १७ जागा जिंकल्या असून सिक्कीम लोकशाही आघीडीनं पंधरा जागा मिळवल्या आहेत.
अरुणाचल प्रदेशमधील ५५ जागांपैकी ३३ जागा भाजपनं जिंकल्या असून तीन जागांवर आघाडी मिळवली
आहे. जनता दल संयुक्तनं सात जागा तर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या आहेत. ओडीशामध्ये
१४६ जागांपैकी शंभर जागा जिंकण्यात बिजू जनता दलाला यश आलं असून बारा जागांवर आघाडी
घेतली आहे. भाजपनं २२ जागा जिंकल्या आहेत तर एका जागेवर आघाडी मिळवली आहे.
****
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी
आज सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त चार न्यायधीशांना शपथ दिली. न्यायमूर्ती भूषण गवई,
न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांना
सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायधीशांच्या उपस्थितीमध्ये शपथ देण्यात आली. सर्वोच्च
न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता ३१ झाली आहे.
****
भारतीय
खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द स्पर्धेत सहा वेळा विश्व विजेत्या मेरी कोमनं भारताच्या
निखात झरिनला हरवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. गोहत्ती इथं सुरू या स्पर्धेत अंतिम
फेरीत मेरी कोमची लढत आज मिझोरामच्या वनलाल दुआतीत बरोबर होईल. या स्पर्धेत १७ भारतीय
मुष्टीयोध्दयांनी दहा वेगवेगळया वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. माजी युवा विजेता
सचीन सीवाचनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता गौरव सोलंकीला हरवत अंतिम फेरीत
धडक मारली आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना आशियाई स्पर्धा विजेता अमित पंघल याच्या बरोबर
आज होणार आहे.
****
औरंगाबाद तालुक्यातल्या गोलटगाव इथं सह्याद्री दुध उत्पादक
संस्थेच्या वतीनं चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. या छावणीत लहान मोठी सुमारे दोन हजार ४०० जनावरं दाखल झाली आहेत. औरंगाबाद तालुक्यात शेतकरी
शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला अधिक महत्व देत आहेत.
// ********** //
No comments:
Post a Comment