Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
नव्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा खातेवाटप जाहीर झाला आहे. राजनाथ
सिंह यांना संरक्षण, अमित शाह यांना गृह आणि नितीन गडकरी यांना परिवहन मंत्रालयाचा
पदभार देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाची पहिली बैठकही आज संध्याकाळी होणार आहे. या बैठकीत
संसदेचं कामकाज किती तारखेला सुरू होणार हे निश्चित केलं जाईल. संसदेच्या आगामी सत्रात
लोकसभेतील नवीन सदस्यांचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांमध्ये
सुरक्षा, संसदीय कामकाज आणि राजनैतिक बाबी या सारख्या अन्य मंत्रिमंडळ समित्यांबाबत
निर्णय घेणार असल्याचंही वृत्त आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल
सिरीसेना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांची काल किर्गिजस्तानचे राष्ट्रपती
सूरोनबे जीनबेकोफ यांच्याशी राष्ट्रपती भवनात द्विपक्षीय बैठक झाली होती. किर्गिजस्तानचे
राष्ट्रपती शंघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष या नात्यानं कालच्या शपथविधी समारंभाला
उपस्थित होते. पंतप्रधान आज नवी दिल्लीत बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद,
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविन्द कुमार जगनॉथ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली आणि भूटानचे पंतप्रधान लोटे
शेरिंग यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
****
जम्मू - काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत
आज एक दहशतवादी ठार झाला. सुरक्षा दलांनी शोपीया
जिल्ह्यात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याच्या माहितीवरून शोध मोहीम हाती घेतली असता
उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
****
या वर्षात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सात
पूर्णांक एक टक्के राहील असं उद्योजक आणि व्यावसायिकांची प्रमुख संघटना फिक्कीनं केलेल्या
सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उद्योग-व्यवसाय,
बँकींग आणि वित्तीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण
केलं होतं. या वर्षात चलन फुगवट्याचा दर सामान्य राहील, असंही या अहवालात म्हटलं आहे.
****
मेट्रो-दोन ए आणि मेट्रो-सात रेल्वे सेवा २०२० च्या पूर्वार्धात
चालू केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई, नागपूर आणि पुण्यातल्या
मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ, सिंचन योजना, सी-लिंक प्रकल्प राज्यातल्या रेल्वे
प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेट्रो-दोन आणि मेट्रो-सात मार्ग
चालू करण्याची मुदत वाढवण्याचे निर्देश दिले तसंच मुंबईतले अन्य मेट्रो प्रकल्प २०२२
पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
****
कोल्हापूर जिल्हयातल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात ईव्हीएम
घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या लोकसभा मतदारसंघात झालेलं एकूण मतदान बारा
लाख ४५ हजार ७९७ इतकं होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये बारा लाख ४६ हजार २५६ मतं
आढळली, म्हणजेच या मतदारसंघात ४५९ मतं जास्तीची आढळल्याचा आरोप पराभूत खासदार राजू
शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली
असल्याची माहितीही त्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. देशातलं सर्वाधिक ४८ अंश सेल्सीअस
तापमान काल चंद्रपुरात नोंदवलं गेलं. राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच
आहे. औरंगाबादमध्ये काल ४२ पूर्णांक एक अंश
सेल्सीअस तर उस्मानाबादमध्ये ४३ पूर्णांक पाच अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात
आज आणि उद्या काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची
शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
जर्मनीत सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत
भारतानं पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे. या स्पर्धेत भारत पदकांच्या मालिकेत
पहिल्या स्थानावर आहे. महिलांच्या दहा मीटर रायफल प्रकारात अपूर्वी चंदेला तर पंचवीस
मीटर रायफल प्रकारात राही सरनोबत हीनं सुवर्णपदक पटकावलं. पुरूषांच्या दहा मीटर रायफल
प्रकरात सौरभ चौधरीनं तर मिश्र गटात दहा मीटर रायफल प्रकारात अंजुम मुदगल आणि दिव्यांग
सिंह पवार यांनी सुवर्ण पदक पटकावलं. तर पुरूषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात मनुभोकर
आणि सौरभ चौधरी या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे.
************
No comments:
Post a Comment