Monday, 27 May 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.05.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. उद्या दुपारी मंडळाच्या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील, असं शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
****
विधान परिषदेच्या एका रिक्त जागेसाठी सांगली जिल्ह्यातले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. देशमुख हे सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत. काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळं विधान परिषदेतली ही जागा रिक्त झाली होती. येत्या अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी या जागेची पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ असल्यामुळे, काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवण्याची शक्यता नसून, पृथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या जागेसाठी येत्या सात जूनला मतदान होणार आहे.
****
चित्रपट सृष्टीतले साहस पटांचे दिग्दर्शक निर्माते वीरू देवगण यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सुमारे ऐंशीहून अधिक चित्रपटातल्या साहसी दृष्यांचं देवगण यांनी दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता अजय देवगण यांचे ते वडील होत.
****
जालना जिल्ह्यात भरधाव टिप्परनं दुचाकीला धडकेत पती पत्नीचा मृत्यू झाला. राजूर रस्त्यावर झालेल्या या भीषण अपघातात योगेश बोडखे हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी पूजा हिचा औरंगाबादला उपचारासाठी घेवून जाताना रस्त्यातच मृत्यू झाला. मयत दोघेही भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ मिसाळ इथले रहिवासी आहेत. योगेश आपल्या गरोदर पत्नीला रुग्णालयात तपासणीसाठी घेवून जात असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक मध्ये घ्यावे अशी मागणी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे केली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना आज औरंगाबाद इथं या संदर्भातलं पत्र देण्यात आलं. वाचनालयाचे  अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
नंदूरबार जिल्ह्यातल्या २२ उपसा सिंचन योजनांची दुरुस्तीचे कामं ताततडीनं पूर्ण व्हावीत यासाठी शेतकऱ्यांनी - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आमरण उपोषण सुरू केलं आहे. तापी नदीत साठवलेले पाणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित नसल्यानं गुजरातला सोडुन द्यावं लागतं, त्यामुळे उपसा सिंचन योजना तातडीने सुरु कराव्यात, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे, यासाठी दोनशेहून अधिक शेतकरी उपोषणला  बसले आसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दुष्काळी उपाययोजनांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. ग्रामीण तसंच शहरी भागात लोक दुष्काळाने त्रस्त आहेत, शहरातही लोक जलकुंभांवर आंदोलन करत आहेत, याकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, पुरातन नहर ए अंबरीचं संवर्धन करावं, दुष्काळग्रस्तांना पीकविमा, राशनचं धान्य, आदी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी भाकपतर्फे करण्यात आली.
****
अकोला महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे कामं हे फक्त कागदोपत्री सुरू असून प्रत्यक्षात काहीच काम होत नसल्यानं, आज शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत ठिय्या आंदोलन केलं. आवास योजनेतील समस्या सोडवण्याचं आश्वासन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिल्यानंतर, हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
अकोला लोकसभा निवडणकीत मतदानाच्या माहितीत तफावत आढळली आहे. १८ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नोंदवलेलं एकूण मतदान हे करा लाख १६ हजार सातशे ६३ इतकं असल्याचं सांगण्यात आलं होतं तर मतमोजणीच्या दिवशी २३ मे रोजी फक्त ईव्हएम द्वारे मोजण्यात आलेलं मतदान हे करा लाख १६ हजार नऊशे दोन इतके मोजण्यात आलं असून यात १३९ मतांचा फरक पडल्यानं, वंचित बहूजन आघाडीनं ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात निवडणूक विभागानं केंद्र निहाय अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कौडगाव औद्योगिक वसाहत परिसरात, ५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ११८ हेक्टर क्षेत्रावर नियोजित या प्रकल्प स्थळाची आज भेल आणि महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकल्पाचं लवकरच भूमीपूजन होणार असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी माहिती, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
****
रेल्वेच्या हैदराबाद विभागात होणाऱ्या कामासाठी काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशीरा धावणार आहेत. नांदेड मेडचेल गाडी ३१ मे आणि एक जून रोजी मिर्झापल्ली ते मेडचेल दरम्यान रद्द करण्यात आली असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...