Sunday, 26 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 May 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०१९ सायंकाळी २०.००
****

सतराव्या लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रीया पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर लागू असलेली आदर्श आचार संहिता मागे घेण्यात आल्याचं आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. आयोगानं याबाबत कॅबिनेट सचिवांसह राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले. निवडणूक आयोगानं राष्ट्रपतींना निवडून आलेल्या सदस्यांची यादी सादर केल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होते, त्यानंतर संसदेचं गठन केलं जाते. गेल्या दहा मार्चपासून देशभरात आचार संहिता लागू झाली होती. त्यानंतर अकरा एप्रिल ते एकोणीस मे पर्यंत सात टप्प्यात देशात विविध ठिकाणी मतदान घेऊन गेल्या २३ मे रोजी मतमोजणी झाली.
****
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी, ३० मे रोजी सायंकाळी सात वाजता नव्यानं पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांसह १७ व्या लोकसभेतील नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहमद नशीद आणि नेपाळचे माजी पंतप्रधान माधव नेपाळ यांनी निवडणुकीच्या विजयानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. तिन्ही देशातल्या या नेत्यांनी मोदी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. मोदी यांनी दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले. यावेळी मोदी यांनी शेजार धोरणाचा प्रथमच उल्लेख करत दारिद्र्याशी संयुक्तपणे लढावं लागणार असल्याचं सांगितलं. विश्वास निर्मिती, हिंसा आणि दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी यावेळी जोर दिला. शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी सहकार्य आवश्यक असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
मालदीव आणि भारता दरम्यानचे परस्पर संबंध अलिकडेच अधिक सुदृढ झाले असून जहालवादी शक्तींविरूद्ध लढण्याच्या आवश्यकतेवर मालदीवचे राष्ट्रपती नशीद यांनी भर दिला.
डचच्या पंतप्रधानांनीही मोदी यांचे विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
देशातल्या चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षांनी आपापल्या राज्यांत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामध्ये ओडिशात नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत. आंध्र प्रदेशात प्रथमच बहुमत मिळवणाऱ्या वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. सिक्किममध्ये सिक्किम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमासिंग गोलाय यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळणार आहे.
****
वाय एस आर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत पुन्हा बहुमतानं विजयी झाल्याबद्दल त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं. ३० तारखेला होणाऱ्या आंध्र प्रदेशच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रणही रेड्डी यांनी मोदींना दिलं. यावेळी दोघांत सुमारे एक तास चर्चा झाली. आंध्रप्रदेशला आर्थिक संकटात सहकार्य करण्याची आणि विशेष राज्याचा दर्जा देण्याची विनंतीही त्यांनी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ओडिशाचे बीजू जनता दलाचे नेते खासदार पिनाकी मिश्रा यांनी आपलं येत्या पाच वर्षांचं वेतन पुरी इथल्या फोनी चक्रीवादळ ग्रस्तांना देण्याची घोषणा केली आहे. पुरी इथून दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. आपलं संपूर्ण वेतन, तसंच मिळणारा दैनिक भत्ता मुख्यमंत्री मदत कोषात देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे पुरीच्या चक्रीवादळग्रस्तांना मदत होईल, असं मिश्रा यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटकमधल्या मंड्या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष विजयी झालेल्या सुमालता अम्‍बरीष यांनी भारतीय जनता पक्षात सामिल होण्याबाबतचा निर्णय मतदारांशी चर्चा केल्यानंतर येत्या २९ मे पर्यंत घेतला जाईल, असं सांगितलं. अभिनेत्री असलेल्या सुमालता यांचे पती अंबरिश यांचा २९ मे रोजी जन्मदिन आहे. काँग्रेसचे नेते अंबरिश यांच्या निधनानंतर सुमालता यांनी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते एस. एम. कृष्णा यांची आज त्यांनी बंगळूरू मध्ये भेट घेतली आणि निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले. यावेळी प्रदेश भाजपचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा उपस्थित होते.
****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...