Thursday, 30 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० मे २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच बरोबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांच्या समाधीस्थळी जाऊन नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचं बरोबर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  
शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. याशिवाय म्यानमार, भूतान, किर्गिजस्तान, नेपाळ, थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे शिवसेनेच्या गोटातून मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे, दरम्यान नवीन खासदारांना हंगामी लोकसभा अध्यक्ष, जेष्ठ संसद सदस्य संतोष गंगवार हे शपथ देणार असल्याचं वृत्त आहे.
****
वाय एस आर कॉंग्रस पक्षाचे अध्यक्ष वाय एस जगन मोहन रेड्डी हे आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, राज्यपाल ई एस एल नरसिहंन हे त्यांना दुपारी बारा वाजून तेवीस मीनिटांनी विजयवाडा इथं पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.जगन रेड्डी हे आंध्रप्रदेशच्या विभाजनानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
****
दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण लागू करण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींसाठी तीन टक्के आरक्षण लागू होतं. आरक्षण देण्यासाठी १,२६, ५१ आणि ७६ क्रमांकाची बिंदू नामावली निश्चित करण्यात आली आहे. यानिर्णयाचा बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना लाभ होईल, असं महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी सांगितलं.  दरम्यान, राज्यात दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी काल मुंबईत दिली. दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागानं नव्यानं धोरण निश्चित केलं आहे, यात दिव्यांगांना शिक्षण, उत्तम आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधीक ४७ पुर्णांक आठ अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात  परभणी इथं ४६ पुर्णांक एक अंश सेल्सीअस इतकं तर त्याखालोखाल बीड  इथं ४४ पुर्णांक दोन  अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. नांदेड इथं  ४४ पुर्णांक पाच अंश सेल्सीअस,  उस्मानाबाद इथं  ४३ पुर्णांक ४ अंश सेल्सीअस तर औरंगाबाद  ४२ अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांत तसंच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
बाराव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या राजघराण्याच्या उपस्थित काल पार पडलेल्या शानदार सोहळ्यानं या स्पर्धेला सुरूवात झाली. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज लंडन इथं पहिला सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना पाच जून रोजी दक्षिण अफ्रिकेविरुध्द होणार आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचं उद्धाटन काल जेष्ठ विचारवंत डॉ. सागर जाधव यांच्या हस्ते झालं. यावेळी जाधव यांनी वामनदादांच्या कार्याचा गौरव करत महापुरूषांवर भाष्य करणारे वामनदादा हे  एकमेव महाकवी  असल्याचं सांगितलं. डॉ. आंबेडकरांचे तत्वज्ञान गीतांमधून सांगण्यासाठी वामनदादा यांनी आयुष्य झिजवलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड-वडीगोद्री मार्गावरील झिरपी फाट्यावर काल सायंकाळी भरधाव ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले तीन जण जागीच ठार झाले. मृत सर्वजण बदापूर इथले रहिवासी आहेत. गेवराई तालुक्यातल्या माळी पिंपळगाव इथं लग्नासाठी ते जात होते.
//************//

No comments: