Saturday, 25 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय गटनेते पदासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संसदीय गटनेते म्हणून निवड झाली आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज संध्याकाळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सर्वप्रथम भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, मोदी यांची भाजप गटनेते पदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला, भाजपचे माजी अध्यक्ष नीतीन गडकरी आणि राजनाथसिंह यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. भाजपच्या नवनियुक्त तीनशे तीन खासदारांनी हात उंचावून, हा प्रस्ताव मंजूर केला.
त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनी मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय गटनेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संयुक्त जनता दलाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, अन्नाद्रमुक पक्षाचे प्रमुख तमिळनाडूचे मुख्यमंत्री डी पलानीसामी, राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान, यांच्यासह एनडीएच्या सर्व घटकपक्षांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं, एनडीएच्या नवनिर्वाचित तीनशे त्रेपन्न खासदारांनी, हात उंचावत हा प्रस्ताव मंजूर केला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ मुरलीमनोहर जोशी, रिपाईं नेते रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएचे राज्यसभेतले सदस्य तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यानंतर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी, संविधानाला अभिवादन करून, उपस्थित सर्वांचे आभार मानले. सर्वांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, आपण प्रयत्नरत राहू, असं मोदी म्हणाले. भारतीय लोकशाही परिपक्व होत असल्याचं, यंदाच्या निवडणुकीतून दिसून आल्याची भावना मोदींनी व्यक्त केली. एनडीएच्या मावळत्या कार्यकाळात देश चालवण्यात सरकारसोबत जनताही प्रत्यक्ष सहभागी झाली होती, त्यातून निर्माण झालेल्या विश्वासामुळेच, जनतेनं पुन्हा आपल्याकडे देश चालवण्याची जबाबदारी दिल्याचं मोदी म्हणाले. व्हीआयपी संस्कृतीच्या मोहापासून दूर राहण्याचं आवाहन मोदींनी सर्व खासदारांना केलं.

यापूर्वी मोदी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ज्या पध्दतीनं दोन हजार चौदा पासून आतापर्यंत काम केलं, त्याचं पद्धतीनं यापुढेही आपण सोबत काम करू, असं मोदी या कर्मचाऱ्यांना म्हणाले. सांघिक कामामुळे कामाचा वेग वाढलाच, त्यासोबत कर्मचाऱ्यांच्या सूचनांमुळे कामाला दिशा मिळाली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

दरम्यान, मोदी आज रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन, सत्ता स्थापनेचा दावा सादर करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज १६ वी लोकसभा विसर्जित केली. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर १६ वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली होती. सदरची शिफारस मान्य करून राष्ट्रपतींनी १६व्या लोकसभेचं विसर्जन केल्याचं राष्ट्रपती भवनाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज राष्ट्रपतींची भेट घेऊन, पाचशे बेचाळीस नवनियुक्त लोकसभा सदस्यांची यादी सादर केली. लोकसभा निवडणुका सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल राष्ट्रपतींनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, आणि त्यांचे सहकारी अशोक लवासा तसंच सुशील चंद्रा यांचं अभिनंदन केलं. स्वतंत्र आणि नि:पक्ष निवडणुका घेतल्या बद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलिस, तसंच मतदारांचंही कौतुक केलं.
****
काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला. मात्र, समितीनं त्यांचा राजीनामा फेटाळला. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची सविस्तर या कारणीमिमांसा करण्यात आली. तसंच कार्यकारणीनं राहुल गांधी यांना पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे पूर्ण अधिकार दिले असल्याचं, पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला पक्षाध्यक्ष राहुल गांधी एकटे जबाबदार नसून ती सामुहिक जबाबदारी असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर ते नवी दिल्लीत बोलत होते. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन, आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.
****
आंध्र प्रदेशमधे वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष वाय एस जगन मोहन रेड्डी यांची सर्वानुमते विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजधानी अमरावतीत झालेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित १५१ आमदारांच्या बैठकीत  रेड्डी यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. जगन रेड्डी आज हैदराबादमधे राज्यपाल ई एस एल नरसिंहन यांची भेट घेतली, राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. येत्या गुरुवारी जगनमोहन रेड्डी आंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
//************//




No comments: