Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 May 2019
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंह तमांग
यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल गंगाप्रसाद यांनी त्यांना
पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ३२ सदस्यांच्या सिक्कीम विधानसभेत सिक्कीम क्रांतिकारी
मोर्चानं १७ जागा जिंकल्या आहेत. प्रेमसिंग तमांग यांनी मात्र ही निवडणूक लढवली नव्हती.
१९९३ पासून गेली २६ वर्षं सिक्कीमचे मुख्यमंत्री असलेले पवनकुमार चामलिंग यांच्याकडून
प्रेमसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली आहेत.
****
अरूणाचल प्रदेशात भारतीय जनता दलाच्या विधीमंडळ गटाची
आज बैठक होत आहे. या बैठकीनंतर, गटाचे नेते पेमा खांडू हे राज्यपालांची भेट घेऊन, सत्ता
स्थापनेचा दावा सादर करतील. साठ सदस्यांच्या अरुणाचल विधान सभेत भाजपनं ४१ जागांवर
विजय मिळवला आहे.
दरम्यान, भाजपला पाठींबा देण्याबाबतचा निर्णय पक्षाच्या
ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून घेऊ असं संयुक्त
जनता दलानं म्हटलं आहे, पक्षाचे अध्यक्ष नीतीश कुमार हे या बाबतचा निर्णय घेतील असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संयुक्त जनता दलाचे अरुणाचल प्रदेशात ७ आमदार निवडून
आले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत दाखल झाले. आज सकाळी
त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. वाराणसीत एका सभेत, ते लोकसभा निवडणुकीत मतदारांनी,
प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून दिल्याबद्दल भाजप कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार
मानत आहेत, दीनदयाल हस्तकला महाविद्यालयात ते एका सभेला संबोधित देखील करणार आहेत.
दरम्यान, नरेंद्र
मोदी येत्या गुरुवारी, ३० मे रोजी सायंकाळी सात वाजता नव्यानं पंतप्रधानपदाची शपथ घेणार
आहेत. राष्ट्रपती भवनात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांसह काही खासदारांना
मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ देतील, असं अधिकृत वृत्तात म्हटलं आहे.
****
उत्तरप्रदेशातल्या घोसी इथले बहुजन समाज पक्षाचे नवनिर्वाचित
खासदार अतुल राय यांच्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका, सर्वोच्च न्यायालयानं
फेटाळली आहे. राय यांच्याविरोधात वाराणसी इथल्या एका विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा
आरोप आहे. त्यांच्याविरोधात गेल्या एक मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या
अटकेच्या मागणीला स्थगिती देण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल
झाली होती, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या सुटीतल्या
पीठानं, ही याचिका फेटाळून लावली.
****
सतराव्या लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे,
आदर्श आचार संहिता मागे घेण्यात आल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट सचिवांसह सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना, आयोगानं
याबाबत निर्देश दिले. गेल्या दहा मार्चपासून देशभरात आचार संहिता लागू होती.
****
काळा पैसा वैध करण्यासंदर्भात उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा
अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या अंमलबजावणी संचालनालय - ईडीच्या मागणीवर दिल्ली उच्च
न्यायालयानं रॉबर्ट वाड्रा यांना आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. आज झालेल्या सुनावणीत
न्यायालयानं वाड्रा यांना आज याबाबत नोटीस जारी केली. न्यायालयानं गेल्या एक एप्रिल
रोजी वाड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, मात्र वाड्रा हे तपासात सहकार्य
करत नसल्यामुळे, हा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं केली आहे.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचा पाकिस्तानात लाहोर
जवळ असलेल्या राजवाड्याचा काही भाग समाजकंटकांच्या एका टोळक्यानं पाडल्याचं, पीटीआयचं
वृत्त आहे. लाहोरजवळ नारोवाल इथं असलेला हा राजवाडा सुमारे चार शतकांपूर्वी बांधण्यात
आला आहे. या चार मजली राजवाड्यात सोळा खोल्या असून, प्रत्येक खोलीला तीन दरवाजे आणि
चार खिडक्या आहेत. समाजकंटकांच्या या टोळक्यानं, या पैकी काही दरवाजे आणि खिडक्या विकून
टाकल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
योगगुरू स्वामी रामदेव यांनी, लोकसंख्या नियंत्रणासाठी
कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. हरिद्वार इथं, पत्रकार परिषदेत
बोलताना रामदेव यांनी, लोकसंख्येचा विस्फोट हा देशासाठी घातक असल्याचं सांगितलं. यापासून
बचावासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना मतदानाचा अधिकार नाकारणं, तसंच
तिसऱ्या आणि त्यापुढच्या अपत्यांना सरकारी नोकरी, निवडणुकांची उमेदवारी वा तत्सम लाभ
नाकारणं, यासारखे कायदे करण्याची गरज रामदेव यांनी व्यक्त केली.
****
नागपूर जवळील आंबाझरी वन क्षेत्राला भीषण आग लागल्याचं
वृत्त आहे.
****
No comments:
Post a Comment