Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26
May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे
२०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी
भेट घेतली. यावेळी निवडणुकीतल्या यशाबद्दल नायडू यांनी मोदींचं अभिनंदन केलं.
आंध्र प्रदेशचे,
वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष, वाय एस जगन मोहन रेड्डी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
भेट घेण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. रेड्डी यांची सर्वानुमते आंध्र प्रदेशच्या
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजधानी अमरावतीमध्ये झालेल्या पक्षाच्या
नवनिर्वाचित १५१ आमदारांच्या बैठकीत रेड्डी यांच्या निवडीचा प्रस्ताव संमत करण्यात
आला. जगनमोहन रेड्डी यांनी काल हैदराबाद मध्ये राज्यपाल ई एस एल नरसिंहन यांचीही भेट
घेतली, राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं. येत्या गुरुवारी
जगनमोहन रेड्डी आंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
****
गेल्या २५ वर्षांपासून मथुरेत गोसेवा करणाऱ्या, पद्मश्री पुरस्कार
प्राप्त जर्मन नागरिक फ्रेडरिक इरिना ब्रूनिंग, उर्फ सुदेवी दासी यांच्या व्हिसाची
मुदत वाढवण्यास नकार दिल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या
अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे. ब्रूनिंग यांचा व्हिसा २५ जूनला संपुष्टात येणार
आहे. मात्र, व्हिसाची मुदत वाढवून न मिळाल्यास सरकारने दिलेला पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
पश्चिम बंगालमध्ये आज
सकाळी दक्षिणेकडील जिल्ह्यातल्या बऱ्याच भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची
तीव्रता ४ पूर्णांक ८ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये कसलीही जीवित अथवा मालमत्तेची
हानी झाली नसल्याचं वृत्त आहे.
****
रायगड जिल्ह्यात मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर, पॅरा सेलिंग करताना दोरी
तुटल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. वेदांत गणेश पवार असं या मुलाचं नाव असून,
या दुर्घटनेत त्याचे वडील गणेश पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी
पॅरा सेलिंग चालका विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात चिखली
- जालना महामार्गावरील रोहडा फाट्याजवळ, ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची
समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या
जिगाव प्रकल्पाचं काम बंद पाडण्यात आलं आहे. गावातल्या पाणी प्रश्नासह इतर मागण्या
जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत प्रकल्पाचं काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा
प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. अनेकदा निवेदन देऊनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांकडे
दुर्लक्ष करत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय नेमबाजी
संघटनेची विश्वचषक स्पर्धा
आजपासून जर्मनी इथं सुरू होत आहे. एकूण ९८ देशांमधले ९१९ स्पर्धक
या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतल्या विजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश
मिळणार आहे. आज पहिल्या दिवशी महिलांचा १० मीटर एअर पिस्तुलचा सामना होणार आहे. भारताचा
३५ खेळाडूंचा संघ पाच दिवस चालणाऱ्या १० स्पर्धांमध्ये सहभागी
होणार आहे.
****
लंडन इथं काल झालेल्या क्रिकेट विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांत,
न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना
भारत केवळ १७९ धावाच करू शकला होता. भारतानं दिलेलं १८० धावांचं आव्हान, न्यूझीलंडनं
१३ षटकं आणि ६ गडी राखून पूर्ण केलं.
****
आशियाई बॅडमिंटन परिषदेच्या उपाध्यक्षपदी, भारतीय
बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. या पदासाठी झालेल्या
निवडणुकीत, हिमंता यांना ४० पैकी ३५ मतं मिळाली. हिमंता हे आसामचे आरोग्य आणि शिक्षण
मंत्री आहेत.
हिमंता यांच्या निवडीमुळं,
आशियाई बॅडमिंटन परिषदेकडून भारतात बॅडमिंटनच्या विकासासाठी मोठं पाठबळ मिळेल अशी खात्री,
भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी व्यक्त केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment