Sunday, 26 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.05.2019 11.00AM

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ मे  २०१९ सकाळी ११.०० वाजता
**** 
 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी आज संध्याकाळी गुजरातला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जोरदार यश मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच गुजरातला जाणार आहेत. त्यानंतर उद्या ते वाराणसीला जातील. तिथल्या मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी ही भेट असेल, असं मोदी यांनी एका ट्विटर संदेशातून सांगितलं आहे.
****

ओडिसातल्या, बिजू जनता दल संसदीय पक्षाची आज दुपारी बैठक होत असून, या बैठकीत नवीन पटनायक यांच्याकडेच पुन्हा नेतृत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी ओडिसा सरकारचा शपथविधी होईल. तसंच लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले पक्षाचे १२ खासदार आज पटनाईक यांची भेट घेणार आहेत. पटनाईक पाचव्यांदा ओडिसाचे मुख्यमंत्री होतील.
****

सिक्कीममध्ये, सिक्किम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमासिंग गोलाय, यांनी काल राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्किम क्रांतिकारी मोर्चानं १८ जागा जिंकल्या असून, सिक्किम लोकशाही आघाडीला १५ जागा मिळाल्या आहेत. गोलाय यांनी निवडणूक लढवली नव्हती. मात्र मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी दावा केला आहे. त्यामुळं त्यांच्या शपथविधीत पेच निर्माण होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 पालघर जिल्ह्यातल्या केतन सीताराम जाधव या आदिवासी विद्यार्थ्यानं जगातलं सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं आहे. पालकमंत्री विष्णु सवरा यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागानं हाती घेतलेल्या 'मिशन शौर्य 2019' या एव्हरेस्ट मोहिमेत अकरावीत शिकणाऱ्या केतन जाधव याच्यासह एकूण नऊ आदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली होती. २३ मे रोजी भल्या पहाटे या नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं.
****

 पावसाळी हंगाम सुरू होत असल्याने मुंबईत गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यानची जलवाहतूक रविवारपासून बंद करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये ही बोट वाहतूक पुन्हा सुरू होईल. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या जलवाहतुकीमुळं मुंबई ते अलिबाग प्रवास अवघ्या एक तासात पूर्ण करता येऊ शकतो. मात्र पुढील चार महिने ही वाहतूक बंद राहणार असल्यानं अलिबागकरांना रस्ता वाहतूक करावी लागेल.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या वरुड गावात काल रानडुकराच्या हल्ल्यात सात शेतकरी जखमी झाले. पाण्याच्या शोधात शेतात घुसलेल्या या रानडुकरानं खरीपपूर्व मशागतीच्या कामात गर्क असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला केला. सर्व जखमी शेतकऱ्यांवर औरंगाबाद इथं शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या सेलू गावात २२ वर्षीय युवकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सुहास सेलूकर असं या युवकाचं नाव आहे. उन्हाचा त्रास झाल्यानंतर त्याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर घरी आल्यानंतर या युवकाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
 कलर्स ऑफ औरंगाबाद समूह आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या, अमेझिंग औरंगाबाद फोटोथॉनच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज सकाळी झालं. रेल्वे स्थानक मार्गावरील वॉकिंग प्लाझा इथं निवृत्त कॅप्टन सुरेंद्र सुर्वे आणि प्राचार्य उल्हास शिऊरकर यावेळी उपस्थित होते. ऐतिहासिक औरंगाबादची विविध रुपं दाखवणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनात ६० हौशी छायाचित्रकारांच्या १०८ छायाचित्रांना स्थान देण्यात आलं आहे.  
****
 आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेची विश्वचषक स्पर्धा आजपासून जर्मनी इथं सुरू होत आहे. एकूण ९८ देशांमधले ९१९ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
*****
***

No comments: