Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये दहा
टक्के आर्थिंकदृष्ट्या मागास वर्गासाठीच्या आरक्षणासह प्रवेशाची सद्यस्थिती स्पष्ट
करणारी माहिती सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश; मराठा आरक्षण अध्यादेशालाही मुंबई उच्च न्यायालयात
आव्हान
v विधान परिषदेच्या
एका जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून सांगलीचे
जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
v बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
आणि
v औरंगाबाद शहरात
शांतता राखून विकास करणं हेच धेय असल्याचं औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज
जलील यांचं स्पष्टीकरण
****
पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या
प्रवेशामध्ये आर्थिंकदृष्ट्या मागास वर्गासाठीच्या दहा टक्के आरक्षणासह प्रवेशाची सद्यस्थिती
स्पष्ट करणारी माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला
दिले आहेत. आर्थिंकदृष्ट्या मागास वर्गासाठी राखीव असलेल्या दहा टक्क्यांची अंमलबजावणी
यावर्षी पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान करण्यात
येऊ नये अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर काल सरन्यायाधिश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरूद्ध
बोस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. १० टक्क्याचं
आरक्षण प्रवेशादरम्यान देण्यात आलं असल्याचं राज्य
सरकारचे वकील निशांत कात्नेश्वरकर यांनी न्यायालयात सांगितलं. यावर न्यायालयानं सद्यस्थितीची
माहिती देणारं शपथपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या
प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मे रोजी होणार आहे.
****
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण
लागू करण्यासाठी राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर
खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. राज्याचे महाधिवक्ता, राज्य सरकार आणि प्रवेशपूर्व
परिक्षा विभाग यांना न्यायालयानं नोटीस बजावली असून येत्या १० जूनपर्यंत याबाबत शपथपत्र
सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया
सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आल्यानं, ते यावर्षी लागू करण्यात येणार
नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. सर्वोच्च न्यायालयानंही त्यावर
शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र त्यानंतर राज्य सरकारनं अध्यादेश जारी करून हे आरक्षण
लागू केलं होतं.
****
विधान परिषदेच्या एका रिक्त जागेसाठी सांगली जिल्ह्यातले
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी काल भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
देशमुख हे भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या
निधनामुळे विधान परिषदेतली ही जागा रिक्त झाली होती. येत्या अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी
या जागेची पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ असल्यामुळे,
काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवण्याची शक्यता नसून, देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित
असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अकोला लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान आणि मोजलं गेलेलं मतदान यात तफावत असून
ही निवडणूक रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. १८ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नोंदवलेलं एकूण मतदान हे अकरा लाख १६ हजार सातशे ६३ इतकं असल्याचं सांगण्यात आलं होतं तर मतमोजणीच्या
दिवशी २३ मे रोजी फक्त ईव्हीएम द्वारे मोजण्यात आलेलं मतदान हे अकरा लाख १६ हजार नऊशे दोन इतकं निघालं. या
दोन्ही आकड्यांमध्ये १३९ मतांचा फरक
आढळून आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात निवडणूक विभागानं केंद्र निहाय अहवाल सादर
करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा-
बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून
ही माहिती देण्यात आली. मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट एनआयसी
डॉट इन, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एचएसएसीरिझल्ट डॉट एमकेसीएल डॉट ओआरजी, या संकेतस्थळावर
आज दुपारी एक वाजेनंतर निकाल पाहता येतील. बीएसएनएल मोबाईलधारक ५७७६६ या क्रमांकावर
एसएमएस पाठवूनही निकाल जाणून घेऊ शकतात. यासाठी मेसेज बॉक्समध्ये एमएचएचएससी स्पेस
सीट क्रमांक लिहून ५७७६६ या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे.
****
अहमदनगर-बीड-परळी आणि वर्धा-नागपूर रेल्वे मार्गाचं
काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल
मुंबईत दिली. मुंबईत रस्ते, रेल्वे,
मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे
आढावा घेतला आणि विभागीय आयुक्त, तसंच जिल्हाधिकारी
यांच्याशी संवाद साधला. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेवून
प्रकल्पाचं काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद शहरात शांतता राखून विकास करणे हेच आपले
धेय असल्याचं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार इम्तियाज
जलील यांनी म्हटलं आहे. निवडून आल्यानंतर प्रथमच काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली. शहराची शांतता भंग करणाऱ्यांवर
कडक कारवाई करण्याचा इशारा देऊन शहराच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितल्ं
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कौडगाव औद्योगिक वसाहत परिसरात,
५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ११८ हेक्टर क्षेत्रावर
नियोजित या प्रकल्प स्थळाची आणि ३३ किलोवॅट उपकेंद्राची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड
- भेल आणि महाराष्ट्र राज्य निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकल्पाचं
लवकरच भूमीपूजन होणार असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी माहिती, भारतीय जनता पक्षाचे
प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातल्या
अभियंत्याला मारहाण करणाऱ्या नागरिकांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पालिकेतल्या
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल तीन तास काम बंद आंदोलन केलं. सिडको एन पाच इथल्या
जलकुंभावर नागरिकांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता
के.एम फलक यांना मारहाण केली होती. या आंदोलनात अधिकारी कर्मचारी काळ्या फिती लावून
सहभागी झाले होते. या सर्वांनी पालिका आयुक्त निपुण विनायक यांचीही भेट घेतली.
दरम्यान महापौर नंदकुमार
घोडेले यांनी सुरक्षेची काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिल्यानंतर
आंदोलन मागं घेण्यात आलं .
****
दुष्काळी उपाययोजनांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट
पक्षानं काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. ग्रामीण तसंच शहरी
भागात लोक दुष्काळाने त्रस्त आहेत, शहरातही लोक जलकुंभांवर आंदोलन करत आहेत, याकडे
लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, पुरातन
नहर ए अंबरीचं संवर्धन करावं, दुष्काळग्रस्तांना पीकविमा, राशनचं धान्य, आदी
सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी भाकपतर्फे करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात भरधाव टिप्परनं दुचाकीला दिलेल्या
धडकेत पती पत्नीचा मृत्यू झाला. राजूर रस्त्यावर काल झालेल्या या भीषण अपघातात योगेश
बोडखे हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी पूजा हिचा औरंगाबादला उपचारासाठी घेवून
जाताना रस्त्यातच मृत्यू झाला. मयत दोघेही भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ मिसाळ इथले
रहिवासी आहेत. दरम्यान, पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
परभणीचे जिल्हाधिकारी
पी शिवशंकर हे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जात असताना, वसमत तालुक्यातल्या
रिधोरा सजाचा तलाठी जिल्हाधिकाऱ्यांवर धावून गेला. खंडू पुजारी असं या तलाठ्याचं नाव
आहे. रविवारी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास
ही घटना घडली. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर इथं
एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. गंगाधर आकमार असं या शेतकऱ्याचं नाव असून,
ते रविवारी शेतात मशागतीची कामं करत असताना, त्यांना रक्ताची उलटी होऊन त्यांचा मृत्यू
झाला. सायंकाळनंतरही आकमार हे घरी परतले नसल्यानं, कुटुंबीयांनी शेतात शोध घेतला असता,
ही घटना निदर्शनास आली. हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत उष्माघातानं मृत्यूची
ही किमान पाचवी घटना आहे.
****
हिंगोली शहराला सिद्धेश्वर
धरणातल्या मृत साठ्यातून पाणी पुरवठा करावा लागत असल्यानं, शहराला पाच दिवस आड पाणीपुरवठा
करावा लागत आहे. जूनअखेरपर्यंत शिल्लक पाणीसाठा
पुरवण्यासाठी, हिंगोली नगरपालिकेनं
हा निर्णय घेतला आहे. पाऊस लांबला तरी शहराच्या पाणीपुरवठ्यात खंड पडणार नाही, असं
नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
सुरत इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर
लातूर शहर महानगर पालिका आयुक्त एम. डी. सिंह यांनी शहरातल्या सर्व कोचिंग क्लासेस,
अभ्यासिका, वसतिगृह, यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अग्निशमन यंत्रणेच्यावतीनं
अशा घटना घडू नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथं पद पथ – वॉकींग
ट्रॅक आणि उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं. माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या
जयंतीनिमित्त आमदार अमित देशमुख आणि अदिती देशमुख यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात
आलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात होणाऱ्या
कामासाठी काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशीरा धावणार
आहेत. नांदेड मेदचेल गाडी ३१ मे आणि एक जून रोजी मिर्झापल्ली ते मेदचेल दरम्यान रद्द
करण्यात आली असून, सिकंदराबाद मुंबई ही गाडी हे दोन दिवस नियमित वेळेपेक्षा काही मिनिटे
उशीरा धावेल.
****
आगामी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे अशा
प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे
निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी
यांनी दिले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment