Wednesday, 29 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.05.2019 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९  मे २०१ सकाळी ७.१० मि.
****

** राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता; ३० कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी
** दुष्काळग्रस्त भागात  शेळ्या-मेंढ्यांसाठीदेखील छावणी सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
**  राज्य विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून मुंबईत
** आणि
** राज्यात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूरमध्ये उच्चांकी ४७ पूर्णांक ८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

****
येत्या पावसाळ्यात राज्यात पाऊस पडण्याचं प्रमाण वाढावं यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यास राज्य मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. यासाठी ३० कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला, कृत्रिम पर्जन्यमान हा या निर्णयाचाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबवण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणं आवश्यक असल्यानं काल या निर्णयास मंत्रीमंडळानं मान्यता दिली. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अवर्षणग्रस्त भागात ढगांवर रसायनांची फवारणी करून हा पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबादमध्ये बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जात असलेल्या विद्युत शुल्क माफीची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णयही राज्य मंत्रीमंडळानं घेतला आहे. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या सवलतीची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपली होती. या सवलतीमुळे महावितरणला होणारा ६०० कोटी रूपयांचा तोटा राज्य सरकार भरून देणार आहे, असं ते म्हणाले. 
मध उद्योगाला चालना देण्यासाठी संपूर्ण राज्यात मध केंद्र योजना राबवण्यासही मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली.
****
राज्यात दुष्काळग्रस्त भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधल्या जनावरांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेळ्या-मेंढ्यांसाठीदेखील छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसंच त्यांच्या कुटुंबातल्या महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये राहत आहेत, या महिलांसाठी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
****
राज्य विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे. विधिमंडळ कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत काल याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत या अधिवेशनाची रूपरेषा तयार करण्यात आली. हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून १८ जूनला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. २१ आणि २४ जून रोजी  अर्थसंकल्पावर चर्चा होईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा ८५ पूर्णांक ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे  मुलांपेक्षा जवळपास आठ टक्क्यानं अधिक आहे, असं मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर शकुंतला काळे आणि सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना माहिती दिली.
यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. त्याखालोखाल पुणे, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक, मुंबई, तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
****
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. ३१ मेला याची अधिकृत घोषणा होईल. विधानपरिषदेत सध्या भाजपाचे २२ सदस्य असून देशमुख यांच्या निवडीमुळं ही संख्या २३ होणार आहे. विधानपरिषदेत भाजपा हा मोठा पक्ष ठरला आहे.
****
राज्यातल्या दूध संघांनी दूध पिशव्यांचं संकलन, पुर्नखरेदी किंवा पुर्नप्रक्रिया व्यवस्थेचा आराखडा येत्या १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. प्लास्टीकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. दिलेल्या मुदतीत हा आराखडा सादर न करणाऱ्या पॅकिंग दूध प्रकल्पांवर प्लास्टीक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या महाआघाडीच्या घटक पक्षांची काल मुंबईत बैठक झाली. लोकसभेच्या निवडणुकीतल्या दारुण पराभवनंतर आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर अजून विस्तृत चर्चा होऊन मगच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपचाच गट असून आघाडीच्या पराभवालाही ती कारणीभूत असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी निवडणूक पुर्व आघाडी करणार नसल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
   
****
राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक ८ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे. हे राज्यातलंच नाही तर देशातलंही सर्वाधिक तापमान असल्याचं हवामान विभागाचे महानिदेशक एम.एल.साहू यांनी सांगितलं. विदर्भातल्या अन्य जिल्ह्यांमध्येही तापमानात वाढ झाली आहे. मराठवाड्यात परभणी इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक १ अंश सेल्सियस, नांदेड इथं ४४ पूर्णांक ५, बीड ४४ पूर्णांक २, उस्मानाबाद ४३ पूर्णांक ३, तर औरंगाबाद इथं ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात येत्या २ जूनपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर तसंच बोगस बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व तयारी तसेच दुष्काळसदृश परिस्थितीची आढावा बैठक कदम यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात बोगस बियाण्याची विक्री झाल्याचं आढळून आल्यास मूळ उत्पादक शोधून त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंदवावेत, असं सांगून पीककर्ज देण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा सूचनाही कदम यांनी दिल्या.
****
परभणी शहरातल्या प्रत्येक इमारतीसाठी आग प्रतिबंधक उपाय योजना, अग्निशमन परीक्षण करणं बंधनकारक कऱण्यात आलं आहे, असं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी शहरातल्या सर्व शासकीय -निमशासकीय  कार्यालय, महाविद्यालय, रूग्णालये, हॉटेल्स आदी ३०० जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसाच्या आत इमारतीची अग्नी प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वीत न केल्यास इमरातीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल असं आयुक्त रमेश पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नये अशी मागणी लातूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे अध्यक्ष रवी सुडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. सत्तेच्या लोभापोटी ही मंडळी भाजपमध्ये येत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे, त्याऐवजी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ द्यावं असं सुडे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर सावरकरांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईत सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. जालना इथं राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनीही सावरकरांना अभिवादन केलं. लातूर महानगरपालिकेत महापौर सुरेश पवार यांनी तर परभणी महानगरपालिकेत महापौर मीना वरपुडकर यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली. औरंगाबाद शहरात, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. 
****
नांदेडहून जम्मूला जाणाऱ्या नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस गाडीला येत्या ३१ मे पासून रसोई यान - पॅन्ट्री कार जोडण्यात येणार आहे. तर जम्मूहून येणाऱ्या गाडीला दोन जून पासून ही सुविधा देण्यात येईल, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं ही माहिती दिली आहे.
नांदेड - श्रीगंगानगर - नांदेड या रेल्वे गाडीला दोन तृतीय श्रेणी वातानुकुलित शयनयान, तर नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि धर्माबाद - मनमाड - धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेला प्रत्येकी एक वातानुकुलित द्वितीय श्रेणीचा डब्बा वाढवण्यात आला आहे. येत्या एक जून ते एक जुलै या काळात तात्पुरत्या स्वरुपात हे डबे वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****

No comments: