Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
May 2019
Time 20.00
to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
पश्चिम
बंगालमध्ये, तृणमूल काँग्रेसच्या दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्षाच्या एका आमदारांसह राज्यातल्या अनेक नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षात
प्रवेश केला. नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या एका
कार्यक्रमात या सर्वांन प्रवेश देण्यात आला. पक्षाचे नेते मुकुल रॉय आणि पक्षाचे
पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत या सर्वांना पक्षाचे
सदस्यत्व देण्यात आलं. भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये पक्षनेते मुकुल
रॉय यांच्या चिरंजिवाचा समावेश आहे.
****
येत्या पावसाळ्यात राज्यात पाऊस पडण्याचं प्रमाण वाढावं यासाठी
कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यास राज्य मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यात उद्भवलेल्या
तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेकरिता आवश्यक त्या सर्व
तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला, कृत्रिम पर्जन्यमान हा या
निर्णयाचाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबवण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत
अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणं आवश्यक असल्यानं आज या निर्णयाला मंत्रीमंडळानं
मान्यता दिली आहे. यासाठी ३० कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात
आली आहे.
राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अवर्षणग्रस्त
भागात ढगांवर रसायनांची फवारणी करून हा पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबादमध्ये
बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे.
****
राज्य विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन
येत्या १७ जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे. विधिमंडळ कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत
आज याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत या अधिवेशनाची रूपरेषा तयार करण्यात आली.
हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून १८ जूनला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार
आहे. २१ आणि २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा
होईल.
****
मुंबईतल्या नायर इस्पितळातली पदव्युत्तर वैद्यकीय शाखेची विद्यार्थींनी
पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगानं
दिले आहेत. यासंदर्भात आयोगानं इस्पितळाच्या संचालकांना एक पत्र पाठवलं असून या प्रकरणात
केलेल्या कारवाईची माहिती आयोगाला देण्यास सांगितलं आहे. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांची
आयोगानं दखल घेतली असून ,तडवीच्या आत्महत्येमागे तिच्या जातीविषयी वरिष्ठ विद्यार्थ्यांमध्ये
पूर्वग्रह असल्याचं दिसून येतं, ही बाब गंभीर असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३० मे रोजी शपथविधी झाल्यानंतर
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होईल, असं भाजपचे
वरिष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. त्यांचा हा प्रवेश विनाशर्त असणार आहे,
असं ते म्हणाले. विखे पाटील यांनी आज महाजन यांची मुंबईत भेट घेतली, निवडणुकीत अहमदनगर
लोकसभा मतदार संघात आपल्या मुलाला केलेल्या सहकार्याबद्ल आभार मानण्यासाठी ही भेट असल्याचं
विखे पाटील यांनी सांगितलं. भाजपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या मुलाचा खुलेपणानं प्रचार केला,
त्यामुळे आपल्याविरूद्ध कारवाई झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अद्याप आमदारकीचा
राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नये अशी मागणी लातूर
इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे अध्यक्ष रवी सुडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब
दानवे यांच्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. सत्तेच्या लोभापोटी ही मंडळी भाजपमध्ये
येत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे, त्याऐवजी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना
बळ द्यावं असं सुडे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं
घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा ८५ पूर्णांक ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले
आहेत, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे मुलांपेक्षा जवळपास आठ टक्क्यानं अधिक आहे, असं
मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर शकुंतला काळे आणि सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी आज मुंबईत
वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३ पूर्णांक २३ टक्के इतका लागला आहे. पुणे विभागाचा ८७ पूर्णांक
८८ टक्के, अमरावती विभागाचा ८७ पूर्णांक ५५ टक्के, कोल्हापूर विभागाचा ८७ पूर्णांक
१२ टक्के, लातूर विभागाचा ८६ पूर्णांक ०८ टक्के, नाशिक विभागाचा ८४ पूर्णांक ७७ टक्के,
मुंबई विभागाचा ८३ पूर्णांक ८५ टक्के, तर नागपूर
विभागाचा सर्वात कमी ८२ पूर्णांक ५१ टक्के निकाल लागला आहे.
****
****
No comments:
Post a Comment