Monday, 27 May 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.05.2019....News at 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 May 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
देश विकासाच्या मार्गावर असून आर्थिक विकास गती घेत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज वाराणसीत मतदारांचे आभार व्यक्त करताना बोलत होते. मोठ्या मताधिक्यानं निवडून दिल्याबद्दल मोदी यांनी मतदारांचे आभार मानले. देशानं आपल्याला पंतप्रधान म्हणून निवडलं असलं तरी काशीच्या लोकांसाठी आपण एक सामान्य कार्यकर्ता असल्याचं मोदी म्हणाले. त्यापूर्वी मोदी यांनी आज सकाळी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, तसंच पक्ष कार्यकर्त्यांनाही संबोधित केलं. भाजपाध्यक्ष अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.
****
काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीबाबत वेगवेगळे अंदाज, वेगवेगळे अफवा पसरवल्या जात असून त्या अफवांवर माध्यमांनी विश्वास ठेऊ नये, असं काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माध्यमांना विनंती केली असून, पक्षाच्या अंतर्गत बैठकीचं गांभीर्य राखलं जावं, असंही ते या वेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी गेल्या शनिवारी, २५ मे रोजी काँग्रेस कार्यकारणीची दिल्लीत बैठक झाली होती.
****
काळा पैसा वैध करण्यासंदर्भात उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या अंमलबजावणी संचालनालय - ईडीच्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयानं रॉबर्ट वाड्रा यांना आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं वाड्रा यांना आज याबाबत नोटीस जारी केली. न्यायालयानं गेल्या एक एप्रिल रोजी वाड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, मात्र वाड्रा हे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे, हा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं केली आहे.
****
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकाराला केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या पत्रकारांनी आज अलिबागमध्ये मोर्चा काढला, जिल्हयातील बहुसंख्य पत्रकार या मोर्चात सहभागी झाले. पत्रकार भवनापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथं एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. २३ मे रोजी मतमोजणी कक्षात पत्रकाराला मारहाण केल्याबद्दल तसंच मतमोजणी कक्षात बेकायदेशीररित्या घुसखोरी केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
****
अकोला लोकसभा निवडणकीत मतदानाच्या माहितीत तफावत आढळली आहे. १८ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात नोंदवलेलं एकूण मतदान हे करा लाख १६ हजार सातशे ६३ इतकं असल्याचं सांगण्यात आलं होतं तर मतमोजणीच्या दिवशी २३ मे रोजी फक्त ईव्हएमद्वारे मोजण्यात आलेलं मतदान हे करा लाख १६ हजार नऊशे दोन इतक मोजण्यात आलं होतं. झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान, यात १३ मतांचा फरक असल्यानं, ही निवडणूक रद्द करण्याची मागणी, वंचित बहजन आघाडीनं केली आहे. दरम्यान, या प्रकरणात निवडणूक विभागानं केंद्रनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधान परिषदेच्या एका रिक्त जागेसाठी सांगली जिल्ह्यातले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. देशमुख हे सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत. काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे विधान परिषदेतली ही जागा रिक्त झाली होती. येत्या अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी या जागेची पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ असल्यामुळे, काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवण्याची शक्यता नसून, पृथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या जागेसाठी येत्या सात जूनला मतदान होणार आहे.
****
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. उद्या दुपारी मंडळाच्या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील, असं शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयाकडून सांगण्यात आलं. मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एचएसएसीरिझल्ट डॉट एमकेसीएल डॉट ओआरजी, या संकेतस्थळावर उद्या दुपारी एक वाजेनंतर निकाल पाहता येतील. बीएसएनएल मोबाईलधारक ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस पाठवूनही निकाल जाणून घेऊ शकतात. यासाठी मेसेज बॉक्समध्ये एमएचएचएससी स्पेस सीट क्रमांक लिहून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...