Tuesday, 28 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.05.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 May  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०१९ दुपारी .०० वा.
****

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत यंदा ८५ पूर्णांक ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे  मुलांपेक्षा जवळपास आठ टक्क्यानं अधिक आहे, असं मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा सर्व निकाल उपलब्ध असेल, असं अध्यक्षा काळे यांनी सांगितलं.

 यंदा १२ वीच्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते, त्यामध्ये मुलांची संख्या ८ लाख ४२ हजार ९१९ तर मुलींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती. यामध्ये ४४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

 यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३ पूर्णांक  २३ टक्के इतका लागला आहे. पुणे विभागाचा ८७ पूर्णांक ८८ टक्के, अमरावती विभागाचा ८७ पूर्णांक ५५ टक्के, कोल्हापूर विभागाचा ८७ पूर्णांक १२ टक्के, लातूर विभागाचा ८६ पूर्णांक ०८ टक्के, नाशिक विभागाचा ८४ पूर्णांक ७७ टक्के, मुंबई विभागाचा ८३  पूर्णांक ८५ टक्के, तर नागपूर विभागाचा सर्वात कमी ८२ पूर्णांक ५१ टक्के निकाल लागला आहे.
****

 झारखंडमध्ये सराईकेला खार्सवान जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरूंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे १५ जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे विशेष पथक कोब्रा आणि राज्य पोलिस दलाचे पथक एकत्रितरित्या जिल्ह्यातल्या कुचाई वनक्षेत्रामध्ये एक अभियान चालवत असताना हा आज सकाळी पाच वाजता हा स्फोट झाला.
****

 शिवसेनेचे नवनिर्वाचित सर्व सदस्य १७व्या लोकसभेत मराठी भाषेतून शपथ घेतील, असं पक्षाच्या एका नेत्यानं सांगितलं. नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं राज्यातल्या एकूण ४८ जागांपैकी १८ जागा जिंकल्या आहेत. तर युती असलेल्या भारतीय जनता पक्षानं २३ जागा जिंकल्या आहेत. कोणत्या भाषेतून शपथ घ्यायची याचं सदस्यांना स्वातंत्र्य आहे. आम्हाला मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे, विशेष म्हणजे मराठीचं रक्षण आणि  तिला प्रोत्साहन देण्यासाठीचं शिवसेनेचा जन्म झाला आहे. त्यामुळे आमचे सर्व संसद सदस्य मराठीतूनच शपथ घेतील, असं कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे सदस्य श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. येत्या ६ जूनपासून संसदेचं अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे.
****

 पुदुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी या गुरूवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहास उपस्थित राहणार आहेत. या समारोहास उपस्थित राहण्यासाठी आज त्या दिल्लीला रवाना झाल्या.

 दरम्यान, बेदी उद्या आपल्या उपराज्यपाल कारकिर्दीची तीन वर्ष पूर्ण करत आहेत. उपराज्यपालाचा २९ मे २०१७ रोजी पदभार स्वीकारल्यापासून विविध प्रशासकीय वादांवरून बेदी आणि मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यात मतभेद आहेत.
****

 लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बिहार मधले राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते आणि गायघाटचे आमदार महेश्वर यादव यांनी केली आहे. बिहार मध्ये राष्ट्रीय जनता दलानं १९ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आला नाही. तेजस्वी यादव हे केवळ राष्ट्रीय जनता दलाचे नेते नव्हते तर संपूर्ण महाआघाडीचे नेते होते. पक्षाची धुरा अन्य वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे.
****

 बंदी घालण्यात आलेला पानमसाला विक्रीप्रकरणी कारवाई न करण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबईत वाशी पोलिस ठाण्याच्या एका पोलिसासह त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं आहे. रामेश्वर खताळ असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून भुरा पाटीधार असं त्याच्या साथीदाराचं नावं आहे. भुरा हा चहाची टपरी चालवतो.  खताळने तक्रारदाराकडून बंदी घातलेला पानमसाला जप्त केला होता, सदरील प्रकरण मिटवण्यासाठी त्याने त्याच्याकडे चार लाख रूपयांची लाच मागितली, मात्र त्यानंतर ६० हजार रूपयांवर हे प्रकरण मिटवण्याचे ठरले, त्यानुसार ३० हजार रूपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना खताळ याला काल अटक करण्यात आली.
*****
***

No comments: