Monday, 27 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.05.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ मे  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना आज पंचावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून पंडित नेहरुंना आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी, केलेल्या ट्वीटमध्ये आधुनिक भारताच्या उभारणीसाठी राष्ट्र सदैव पंडितजींना स्मरण करेल, असं म्हटलं आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी, दिल्लीत यमुनेच्या तीरावर असलेल्या शांतीवन या पंडित नेहरुंच्या समाधीस्थळी, पुष्प अर्पण करून, नेहरुंना आदरांजली अर्पण केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत दाखल झाले. आज सकाळी त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी, प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून दिल्याबद्दल ते वाराणसीतल्या मतदारांचे आभार मानणार आहेत, दीनदयाल हस्तकला महाविद्यालयात ते एका सभेला संबोधित देखील करणार आहेत.  
दरम्यान,  नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी, ३० मे रोजी सायंकाळी सात वाजता नव्यानं पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांसह काही खासदारांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ देतील, असं अधिकृत वृत्तात म्हटलं आहे.
****
देशभरातली सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण विषय समाविष्ट करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतला आहे. हा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा राहणार असून यात, लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पर्यावरणीय प्रदूषण, लोकसंख्या आणि पर्यावरण, सामाजिक समस्या आणि पर्यावरण अशा विषयांवर हा अभ्यासक्रम आधारित आहे.
****
योगगुरू स्वामी रामदेव यांनी, लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. हरिद्वार इथं, पत्रकार परिषदेत बोलताना रामदेव यांनी, लोकसंख्येचा विस्फोट हा देशासाठी घातक असल्याचं सांगितलं. यापासून बचावासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना मतदानाचा अधिकार नाकारणं, तसंच तिसऱ्या आणि त्यापुढच्या अपत्यांना सरकारी नोकरी, निवडणुकांची उमेदवारी वा तत्सम लाभ नाकारणं, यासारखे कायदे करण्याची गरज रामदेव यांनी व्यक्त केली.
****
काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधानपरिषदेवरील रिक्त झालेल्या एका जागेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून पृथ्वीराज देशमुख यांना ही उमेदवारी देण्याची शक्यता आहे. ते भाजपचे सांगलीचे जिल्हा अध्यक्ष आहेत.
****
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - चिल्हार रोडवरील गुंदले इथं फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे .या आगीत लाखोंचं फर्निचर जळून खाक झालं असून,ही आग नेमकी कशा मुळं लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई इथं काल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं सैन्य दलातल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी  स्वातंत्र्यवीर दौड २०१९चं आयोजन करण्यात आलं. यात सचिन खरोटे विजेता ठरला, तर इथियोपियाच्या मिकीयास यामाथाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या दौडमधे मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर आणि राज्यातल्या विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले. समाजात देशभक्तीची भावना अधिक प्रभावी व्हावी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्र कार्याला अभिवादन करण्यासाठी स्मारकाच्या वतीनं प्रथमच अशी दौड आयोजित करण्यात आली होती. या दौडमधील निधी संकलनातून सैन्यदलातल्या कुटुंबांना सहाय्य केलं जाणार आहे.
****
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान, औरंगाबाद मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल हैद्राबादचे आमदार टी.राजासिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतमोजणीत अडथळे निर्माण केल्याप्रकरणी नागपूर मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यात वाकी इथं खैरी नदीपात्रात वाळू तस्करांकडून ४४ लाखांचा मुद्देमाल काल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं दहा जणांना अटक  केली आहे.
****

No comments: