Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
जम्मू-कश्मीरमधे
कुलगाम जिल्ह्यातल्या ताज़ीपुरा मोहम्मदपुरा भागात आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दल
यांच्यात झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. या भागात दहशतवादी लपले असल्याची
माहिती मिळाल्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या
संयुक्त पथकानं या भागात शोध मोहीम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर झालेल्या चकमकीत हा अतिरेकी
मारला गेला.
****
परदेशातल्या
संपत्तीसंदर्भात मनी लाँडरिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना सक्त वसुली संचालनालयानं
आज नव्यानं समन बजावलं असून, उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. वाड्रा तपासात
सहकार्य करत नसल्यानं त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणीही संचालनालयानं दिल्ली उच्च
न्यायालयाकडे केली आहे. वाड्रा यांच्या लंडनमध्ये
कोट्यवधी रुपये मूल्याच्या अनेक इमारती आणि सदनिका असल्याची नवी माहिती मिळाल्याचं
सक्त वसुली संचालनालयानं आज न्यायालयाला सांगितलं.
****
परदेशात
जाण्याची परवानगी मिळवताना न्यायालयाकडे जमा केलेले दहा कोटी रुपये परत मिळावेत, अशी
मागणी करणारी, काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कार्ती चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च
न्यायालयानं आज फेटाळून लावली. कार्ती चिदंबरम यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग आणि
सक्त वसुली संचालनालयानं गुन्हेगारी खटले दाखल केलेले आहेत. आपण ही रक्कम कर्ज घेऊन
जमा केली असून, त्यावर व्याज भरावं लागत आहे, असं प्रतिपादन कार्ती यांनी आज केलं.
त्यावर, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, कार्ती यांनी आपल्या
मतदारसंघाकडे लक्ष पुरवावं, असं बजावत त्यांची याचिका फेटाळली.
****
राज्यातल्या
जलाशयांमध्ये सध्या तेरा पूर्णांक एक दशांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी
याच सुमारास हा साठा तेवीस पूर्णांक चौदा शतांश
टक्के इतका होता. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात तेहतीस पूर्णांक एकोणसत्तरदशांश टक्के आहे, तर मराठवाडा विभागात सर्वात कमी म्हणजे
केवळ दोन पूर्णांक शहाऐंशी दशांश टक्के, इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात
याच काळात वीस टक्क्यांहून जास्त पाणीसाठा उपलब्ध होता.
राज्यात
सध्या सहा हजार दोनशे नऊ टँकर्सनं चार हजार नऊशे वीस गावं आणि दहा हजार पाचशे सहा वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत
आहे. यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार दोनशे शहाऐंशी गावं आणि सातशे
पंच्याऐंशी वाड्यांना तीन हजार दोनशे तेहतीस टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत
असल्याची माहिती,राज्य सरकारनं दिली आहे.
****
सध्याच्या
तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीनं टँकरद्वारे पिण्याच्या
पाण्याचा पुरवठा करताना २०११ च्या लोकसंख्येऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे
आदेश राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ
खोत यांनी दिली आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती वीस लिटर,तसंच मोठ्या
जनावरांसाठी प्रती जनावर पस्तीस लिटर, वासरांसाठी दहा लिटर तर शेळ्या मेंढ्यांसाठी
प्रत्येकी तीन लिटर इतका दैनंदिन पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिल्याचं खोत यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
दूध संघांनी दूध पिशव्यांचं संकलन, पुनर्खरेदी किंवा पुनर्प्रक्रीया व्यवस्थेचा आराखडा
पंधरवड्यात सादर करावा, असे निर्देश पर्यावरणमंत्री
रामदास कदम यांनी दिले आहेत. प्लास्टीकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक काल मुंबईत
झाली, त्यावेळी ते बोलत होते. दिलेल्या मुदतीत हा आराखडा सादर न करणाऱ्या पॅकिंग दूध
प्रकल्पांवर प्लास्टीक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कदम
यांनी दिला आहे.
****
दक्षिण
आफ्रिकेतल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या सहाही
व्याघ्रप्रकल्पांचा विकास करण्यासाठी आणि राज्यातलं वाघांचं वैभव देश विदेशातल्या पर्यटकांपर्यंत
पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे पर्यटन
मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. नैसर्गिक अधिवासामुळे राज्यातल्या वाघांची संख्या वाढत असून, वाघांच्या संख्येसंदर्भात महाराष्ट्र
देशात पाचव्या क्रमांकावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यात विशेष व्याघ्र
दलाची स्थापना करण्यात आल्याची माहितीही रावल यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment