Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
May 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या
भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी गुरुवारी, ३० मे रोजी सायंकाळी सात वाजता नव्याने
पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ
कोविंद, हे पंतप्रधानांसह १७ व्या लोकसभेतील नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळाला पद
आणि गोपनीयतेची शपथ देतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशातल्या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये
बहुमत मिळालेल्या पक्षांनी आपापल्या राज्यांत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामध्ये
ओडिशात नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत. आंध्र प्रदेशात
प्रथमच बहुमत मिळवणाऱ्या वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना सरकार
स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. सिक्किम मध्ये सिक्किम क्रांतिकारी मोर्चाचे
अध्यक्ष प्रेमासिंग गोलाय यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला आहे, तर अरुणाचल प्रदेशमध्ये
पुन्हा एकदा भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळणार आहे.
****
वाय एस आर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष वाय एस जगनमोहन
रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत
पुन्हा विजयी झाल्याबद्दल त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं. ३० तारखेला होणाऱ्या आंध्रप्रदेशच्या
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रणही मोदींना दिलं. यावेळी दोघांत सुमारे एक
तास चर्चा झाली. आंध्रप्रदेशला आर्थिक संकटात सहकार्य करण्याची आणि विशेष राज्याचा
दर्जा देण्याची विनंतीही त्यांनी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ओडिशाचे बीजू जनता दलाचे नेते खासदार पिनाकी मिश्रा
यांनी आपलं येत्या पाच वर्षांचं वेतन पुरी इथल्या फोनी चक्रीवादळ ग्रस्तांना देण्याची
घोषणा केली आहे. पुरी इथून दुसऱ्यांदा
निवडून आल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. आपलं संपूर्ण वेतन, तसंच मिळणारा दैनिक भत्ता
मुख्यमंत्री मदत कोषात देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे पुरीच्या चक्रीवादळ ग्रस्तांना
मदत होईल, असं मिश्रा यांनी आपल्या टि्वटर संदेशात म्हटलं आहे.
****
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं
काल मुंबईतून अटक केलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोन वकिलांना आज पुण्यात न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
न्यायालयानं दोघांनाही १ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
स्वित्झर्लंडमधल्या क्रिएन्स इथं झालेल्या व्यावसायिक
स्क्वॅश संघटनेच्या, सेकी सुई खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं अजिंक्यपद, भारताच्या
महेश माणगावकर यानं पटकावलं आहे. अग्रमानांकित महेशनं, तिसऱ्या मानांकित बर्नेट जॉम
या स्पेनच्या खेळाडूला अंतिम फेरीत ११-९, ३-११, ११-५, ११-५ अशा गुण फरकानं पराभूत करुन
या स्पर्धेचं विजेतेपद, दुसऱ्यांदा पटकावलं आहे. तीन वर्षांपूर्वी ही स्पर्धा त्यांनी
पहिल्यांदा जिंकली होती.
****
कोल्हापुरात झालेल्या ११ व्या फेडरेशन करंडक राज्यस्तरीय
तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबाद संघानं १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि १२ कांस्य, अशी ४५ पदकांची
कमाई करत सर्वसाधारण विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे,
यथार्थ थोरात, रोहन शहा, हर्षवर्धन औताडे, कनक भोजने, तेजस पाटील, अमेय कदम, कृष्णा
मगर, कशिश भरड, वैदेही लोहिया, अभय शिंदे, दुर्गेश जहागीरदार या तलवारबाजांनी विविध
वयोगटांत वर्चस्व गाजवलं.
****
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू
असलेल्या एकोणीस वर्षांखालील आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत विनर्स अकादमी आणि गुरुकुल
अकादमी संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवली. पहिल्या लढतीत गुरुकुल अकादमी संघाने नेरळकर
अकादमी संघाचा ८५ धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात विनर्स अकादमी संघाने सी.
के. स्पोर्टस अकादमीवर १३७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
****
No comments:
Post a Comment