Friday, 31 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
नवीन केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा निधी योजनेअंतर्गतच्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी दोन हजार रूपयांची शिष्यवृत्ती वाढवून ती आता अडीच हजार रूपये तर विद्याथीनींची शिष्यवृत्ती सवा दोन हजार रूपयांवरून तीन हजार रूपये करण्यात आली आहे. नक्षली आणि दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिस दलांच्या पाल्यांनाही आता या शिष्यवृत्ती योजनेत सामावून घेण्यात आलं आहे. दरवर्षी राज्य पोलीस दलातल्या ५०० विद्यार्थांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.   
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचं आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय, नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण,  अमित शाह यांना  गृहमंत्री तर निर्मला सीतारामण यांना अर्थ आणि कंपनी व्यवहार खाते देण्यात आलं आहे. नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. रामविलास पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंग तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास आणि पंचायत राज, रवीशंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच वन आणि पर्यावरण, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यबळ विकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत.
खातेवाटप झाल्यानंतर बहुतांशी मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारला आहे.
****
केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १७ जून ते २६ जुलैदरम्यान होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर केला जाईल, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली.
****
जंगलवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र देशात अव्वल असून जलयुक्त सोबतच वनयुक्त शिवार ही संकल्पना त्यासाठी उपयुक्त ठरली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना आज दिली. राज्य शासनाच्यावतीनं यंदा वन महोत्सवाअंतर्गत ३३ कोटी झाडे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात वाघांची संख्या वाढत असून चार वर्षांपूर्वी राज्यात २०४ वाघ होते, परंतु आता २५० मोठे वाघ असून बछड्यांची संख्याही वाढल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केलं.
****
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त आजपासून ३० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस. व्ही.  कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना, औरंगाबाद आणि  परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
                                 ****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या लोकसभा मतदारसंघात झालेलं एकूण मतदान बारा लाख ४५ हजार ७९७ इतकं होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये बारा लाख ४६ हजार २५६ मतं आढळली, म्हणजेच या मतदारसंघात ४५९ मतं जास्तीची आढळल्याचा आरोप पराभूत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नॉटिंगहम इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २२ व्या षटकांत ११० धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघान चौदाव्या षटकातच तीन गडी गमावून हे आवाहन पूर्ण केलं.
या स्पर्धेत उद्या न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामने होणार आहेत.
****
निम्न दुधना प्रकल्पातून उद्या दुपारी चार वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे निम्न दुधना प्रकल्प ते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहराजवळच्या कोल्हापूर बंधाऱ्यापर्यंत निम्न दुधना नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसंच ज्यांनी आपली जनावरं किंवा साहित्य नदीपात्रात ठेवली असतील ती त्वरीत काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****

No comments: