Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2019
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
§ पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ
§ राज्याच्या चार
लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी
§ दिव्यांग व्यक्तींना
सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण लागू करण्याचा शासन आदेश जारी
§ गोदावरी पाटबंधारे
विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी भारतीय
जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची नियुक्ती
आणि
§ १२व्या विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये
शानदार सुरुवात; इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आज पहिला सामना
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.
बिमस्टेक देशांचे सर्व प्रमुख या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली. या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी
बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. याशिवाय
म्यानमार, भूतान, किर्गिजस्तान, नेपाळ, थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार
आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात
आलं आहे.
****
राज्याच्या चार लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या
वार्षिक पतपुरवठा आराखड्याला काल मंजुरी देण्यात आली. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची
काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गेल्या वर्षी
पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या केवळ चोपन्न टक्केच कर्जं वितरीत झाल्याबद्दल मुख्यमंत्री
फडणवीस यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या
निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
केंद्र शासनाच्या मुद्रा बॅंक, प्रधानमंत्री जनधन योजना,
अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा
योजना यासारख्या योजनांच्या पत पुरवठ्यात वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध विभाग
आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण
लागू करण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल
जारी केला. आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींसाठी तीन टक्के आरक्षण लागू होतं. आरक्षण देण्यासाठी
एक, २६, ५१ आणि ७६ क्रमांकाची बिंदू नामावली निश्चित करण्यात आली आहे. यानिर्णयाचा
बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना लाभ होईन, असं महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे
प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी
करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय
आणि विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी काल मुंबईत दिली. दिव्यांगांसाठी
गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण
विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागानं नव्यानं धोरण निश्चित
केलं आहे, यात दिव्यांगांना शिक्षण, उत्तम आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी
विविध उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन
४५ मिनिटे चर्चा केली. काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज
ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर
मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीतल्या पराभवानंतर काल
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत विधानसभा
निवडणुकीत मनसेला बरोबर घ्यावं असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता.
****
राज्यात आतापर्यंत तीनशे चौऱ्याहत्तर तंबाखूमुक्ती केंद्रांची
स्थापना करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. येत्या
शुक्रवारी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे, यापार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या
एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. राज्यातल्या
आठशे चार आरोग्य संस्था आणि दोन हजार सातशे पंचावन्न शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या
असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
औषध निर्माण शास्त्राशी संबंधित डॉक्टर ऑफ फार्मसी-
‘फार्म डी’ची पदवी प्राप्त करणाऱ्यांना नावाआधी 'डॉक्टर' शब्दप्रयोग करण्यास भारतीय
वैद्यकीय संघटना- आयएमएनं विरोध केला आहे. भारतीय औषधी परिषद- फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियानं
या पदवीधारकांना नावाआधी डॉक्टर शब्दप्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात
आयएमएनं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेला एक पत्र लिहिलं आहे.
औषध निर्माण शास्त्रज्ञ हा कायम औषधनिर्माण शास्त्रज्ञच राहतो, तो डॉक्टर हे नाव लावू
शकणार नाही अस आयएमएनं या पत्रात नमूद केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबादच्या गोदावरी
पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. एक वर्षासाठी ही नियुक्ती असेल. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात
आला.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोककवी वामनदादा
कर्डक अध्यासन केंद्राचं उद्धाटन काल जेष्ठ विचारवंत डॉ. सागर जाधव यांच्या हस्ते झालं.
यावेळी जाधव यांनी वामनदादांच्या कार्याचा गौरव करत महापुरूषांवर भाष्य करणारे वामनदादा
हे एकमेव महाकवी असल्याचं सांगितलं. डॉ.आंबेडकरांचे तत्वज्ञान गीतांमधून सांगण्यासाठी
वामनदादा यांनी आयुष्य झिजवलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
****
मुलींचं भवितव्य शिक्षणाच्या
माध्यमातून घडवावं असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई
यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेचा यंदाचा
राष्ट्रीय न्यायगौरव पुरस्कार देसाई यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत
होत्या. स्त्रियांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची सुरक्षा, आरोग्य यावरही लक्ष देण्याची
गरज त्यांनी व्यक्त केली. ५१ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असं स्वरुप असलेल्या
या पुरस्काराची रक्कम देसाई यांनी हासेगाव इथल्या एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या
सेवालयाला सुपूर्द केली.
****
१२व्या विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये
सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या राजघराण्याच्या
उपस्थित काल पार पडलेल्या शानदार सोहळ्यानं या स्पर्धेला सुरूवात झाली. इंग्लंड आणि दक्षिण
अफ्रिका यांच्यामध्ये आज लंडन इथं पहिला सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार
दुपारी तीन वाजता सुरु होईल. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना पाच जून रोजी दक्षिण
अफ्रिकेविरुध्द होणार आहे.
****
पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थावर आणि
जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. सचिन घायाळ कंपनीनं हा
कारखाना भाडेतत्वावर घेतला असून कंपनीनं नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना
रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीचे पाच कोटी ४५ हजार रूपये दिलेले नाहीत, या देयकासाठी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेऊन साखर
आयुक्त शेखर गायकवाड यांनी जप्तीचे आदेश जारी केले आहेत.
****
औरंगाबाद महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदी अखिल भारतीय
मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन - एमआयएमच्या नगसेविका सरिता बोर्डे यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. पक्षानं बोर्डे यांच्या नियुक्तिची शिफारस केली होती. आचार संहिता संपताच
काल महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्या नियुक्तीचं पत्र माहापालिका आयुक्त डॉ.
विनायक निपुण यांना पाठवलं आहे.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाथरी शाखेअंतर्गत
येणाऱ्या गावांतल्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचा दुसरा हप्ता त्वरीत द्यावा अशी
मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी
विद्यार्थी कॉंग्रेसनं दिला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड - वडीगोद्री मार्गावरील झिरपी
फाट्यावर काल सायंकाळी भरधाव ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले
तीन जण जागीच ठार झाले. मृत सर्वजण बदापूर इथले रहिवासी आहेत. गेवराई तालुक्यातल्या
माळी पिंपळगाव इथं ते लग्नासाठी जात होते.
****
औरंगाबाद शहरातल्या ज्युबिली पार्क इथं भरधाव वेगानं
जाणाऱ्या एका पाण्याच्या टँकरनं दुचाकीवर जात असलेल्या एका महिलेला पाठीमागून धडक
दिल्यानं दुचाकीवरील महिला ठार झाली. ज्योती सोनवणे असं या महिलेचं नाव असून मंगळवारी
रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली.
****
सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सराफाने दिलेले पाच लाख
२० हजार ३५८ रूपये किमतीचं सोनं घेऊन एक परप्रांतीय कारागीर पसार झाल्याचा प्रकार औरंगाबाद
इथं घडला. हा कारागीर पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी
विविध प्रकाराचे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी रमेश रेवणकर या सोनारानं या कारागिराला
सोनं दिलं होतं. त्यानं आठ दहा दिवसात दागिने बनवून देतो असं म्हणून सोनं घेऊन पलायन
केलं.
//**************//
No comments:
Post a Comment