आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ मे २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी आपल्या दुस-या
कार्यकाळाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात उद्या
संध्याकाळी सात वाजता होणा-या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी आणि
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अन्य सदस्यांना पदाची शपथ देतील. देशातल्या सगळ्या राज्यांच्या
मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या समारंभाचं निमंत्रण पाठवल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं
आहे.
आग्नेय आणि दक्षिण आशियातील `बिमस्टेक` देशांच्या नेत्यांनी
या समारंभाचं निमंत्रण स्वीकारून उद्या उपस्थित राहण्याचं मान्य केलं आहे, असं परराष्ट्र
मंत्रालयाचे प्रवक्ता रवीशकुमार यांनी सांगितलं आहे. या नेत्यांसह किर्गिजस्तानचे राष्ट्रपती
आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याचंही त्यांनी नमुद
केलं.
दरम्यान, मंत्रिमंडळ स्थापना आणि शपथविधीच्या पार्श्र्वभूमीवर
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन
चर्चा केल्याचं वृत्त आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते पेमा खंडू हे आज अरुणाचल प्रदेशच्या
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. भाजप साठपैकी एक्केचाळीस जागा जिंकून प्रथमच निर्विवाद
बहुमतासह या राज्यात सरकार स्थापन करत आहे. या राज्याचे राज्यपाल डॉक्टर बी.डी.मिश्रा
त्यांना पदाची शपथ देतील.
दुसरीकडे बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक हे सलग पाचव्या
वेळी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल गणेशी लाल पटनायक आणि त्यांच्या
मंत्रीमंडळाला पदाची शपथ देतील.
****
रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस पद्धतीनं पैसे
पाठवण्याच्या वेळामध्ये रिझर्व्ह बँकेनं दीड तासांची वाढ केली असून, ग्राहकांना आता
या पद्धतीनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पैशांचे व्यवहार करता येतील. मुंबईत जारी केलेल्या
अधिसूचनेत बँकेनं ही माहिती दिली आहे. नव्या वेळा येत्या एक जूनपासून लागू होतील. दुपारी
एक पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या पद्धतीनं केलेल्या पैशांच्या प्रत्येक व्यवहारावर
पाच रुपये शुल्क लागेल, असंही रिझर्व्ह बँकेनं कळवलं आहे.
****
राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सतरा जूनपासून
सुरू होणार आहे.राज्याच्या येत्या ऑक्टोबरमध्ये होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचं
हे शेवटचं अधिवशन असेल. पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल, तर दुस-या दिवशी
म्हणजे अठरा जून रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल. मुंबईत होणारं हे सत्र पाच जुलैला
संपेल. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष राहील,
काँग्रेसच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेते पदाचा
राजीनामा दिला होता.
****
नांदेडहून जम्मूला जाणाऱ्या नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस
गाडीला येत्या ३१ मे पासून रसोई यान - पॅन्ट्री कार जोडण्यात येणार आहे. तर जम्मूहून
येणाऱ्या गाडीला दोन जून पासून ही सुविधा देण्यात येईल, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
विभागानं ही माहिती दिली आहे.
नांदेड - श्रीगंगानगर - नांदेड या रेल्वे गाडीला दोन तृतीय
श्रेणी वातानुकुलित शयनयान, तर नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि धर्माबाद
- मनमाड - धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेला प्रत्येकी एक वातानुकुलित द्वितीय
श्रेणीचा डबा वाढवण्यात आला आहे. येत्या एक जून ते एक जुलै या काळात तात्पुरत्या स्वरुपात
हे डबे वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
राज्यात उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या असून, काल चंद्रपूरचं
तापमान सत्तेचाळीस पूर्णांक आठ तर नागपूरचं तापमान सत्तेचाळीस पूर्णांक पाच अंश सेशियस
इतकं नोंदलं गेलं.या ठिकाणी किमान तापमान बत्तीस अंश सेल्शियस इतकं जास्त होतं. या
ठिकाणी येत्या दोन दिवसात तापमान याहूनही जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे.
मराठवाड्यात काल बेचाळीस ते सेहेचाळीस अंशांवर पारा गेला.
परभणी इथं सर्वाधिक ४६ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी
दक्षिण अंदमानात पोहचलेला मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा होती,
मात्र तो रेंगाळला असून अजून उत्तर अंदमानमध्येही पोहचलेला नाही, असं हवामान खात्याच्या
अधिका-यांनी सांगितलं आहे.
****
विधान परिषद सदस्यपदी काल निवड झालेले सांगली जिल्हा भाजप
अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा आज जिल्ह्यातील कडेगाव इथं सत्कार होणार आहे. पलूस
आणि कडेगावमधील कार्यकर्त्यांनी या सत्काराचं आयोजन केलं असून यानिमित्त दुपारी चार
वाजता मिरवणूकही काढली जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment