Thursday, 30 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०१९ सायंकाळी ६.००
****

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आज सलग दुस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना आणि मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लगेच दुस-यांदा निवड होणारे मोदी हे पहिलेच भाजप नेते आहेत. विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री आणि विशेष दूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बिमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण आहे. बांग्लादेश, श्रीलंका, किर्गीज प्रजासत्ताक आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष, मॉरिशस, नेपाळ, आणि भूतानचे प्रधानमंत्री तसंच थायलंडचे विशेष दूत आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरच विविध राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, गुजरात भाजपचे अध्यक्ष जितू वाघानी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल एका संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं, आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे. याशिवाय सोहळ्याआधी, संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ. एम. रेनबो वाहिन्यांवर ऐकता येईल. शपथविधी सोहळ्याचं थेट प्रसारण संध्याकाळी सहा वाजून ५५ मिनीटांपासून सुरु होईल.
****
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर सुमारे एक तास चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा राहूल गांधींचा निश्चय असल्याच्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी या पदावर कायम राहावं, असं पवार यांनी त्यांना सूचवल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद कार्यक्रमासाठी आपले प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेस प्रवक्‍ता रणदीप सुरजेवाला यांनी एका संदेशात ही माहिती दिली.
****
जम्मु काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांची शोध मोहीम सूरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असता ही चकमक उडाली. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटायची असून चकमकीच्या ठिकाणी शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.   
****
मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तडवी कुटुंबीयांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
****
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील खुल्या गटातील दहा टक्के आर्थिक मागासवर्गाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं जनतेची फसवणूक केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात नापास झालं, असं राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशसाठी राज्य सरकारनं या संदर्भात काढलेल्या आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध घातल्याच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही प्रतिक्रीया दिली आहे.
****
मराठवाड्यातील काही भागांत तसंच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान बाहेर पडणं टाळावं, असं आवाहनही हवामान खात्यानं केलं आहे. 
****
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची इथं एका व्यक्तीचा उष्माघातानं मृत्यु झाल्याचं वृत्त आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटन्यासाठी फिरताना उन लागल्यानं झालेल्या उष्माघातामुळं विजय बोरकर या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई इथं झालेल्या ३१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शनच्या `सोयरे सकळ` या नाटकाला सात लाख ५० हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयानं केली आहे.
****

No comments: