Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24
May 2019
Time 20.00
to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या
सर्व सदस्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर
केले. राष्ट्रपतींनी हे राजीनामे स्वीकारले असून, सतरावी लोकसभा स्थापन होईपर्यंत मोदी
यांना पंतप्रधान पदाचं कामकाज सांभाळण्याचे
निर्देश दिले आहेत.
सोळावी लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय
मंत्रिमंडळानं आज संमत केला. नवी दिल्लीत आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज, मेनका
गांधी, यांच्यासह मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.
सोळाव्या लोकसभेची मुदत येत्या तीन जूनला पूर्ण होत
असून, त्यापूर्वी सतरावी लोकसभा स्थापन करणं आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोग लवकरच
राष्ट्रपतींची भेट घेऊन, नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे सोपवेल, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही
आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची उद्या संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात
आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या बैठकीत नेते म्हणून निवड होण्याची शक्यता
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी समितीची उद्या नवी
दिल्लीत बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत पक्षाचे प्रमुख
नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी
आघाडीनं या निवडणुकीत जवळपास ९० जागा जिंकल्या असून, यामध्ये काँग्रेस पक्षाला बावन्न
जागांवरच विजय मिळवता आला आहे. या कामगिरीवर चर्चेसाठी आयोजित या बैठकीत, पक्षाध्यक्ष
राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंह
यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
****
सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता
पक्षानं तीनशे तीन जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू
हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्याचं, निवडणूक विभागानं आता थोड्यावेळापूर्वीच
जाहीर केलं. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देशभरात साडे तीनशे जागांवर विजय
मिळवला आहे. यामध्ये शिवसेनेचे अठरा, संयुक्त जनता दलाचे सोळा तर शिरोमणी अकाली दलाच्या
दोन खासदारांचा समावेश आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं, महाराष्ट्रातून
सहा विद्यमान खासदारांना उमेदवारी न देता, त्यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली,
पक्षाचा हा निर्णय अचूक ठऱला असून, या सहाही जागांवर पक्षानं विजय नोंदवला आहे. जळगांव
इथून ए.टी. नाना पाटील यांच्याऐवजी उन्मेश पाटील, अहमदनगर मधून दिलीप गांधींऐवजी डॉ
सुजय विखे पाटील, दिंडोरीमधून हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी भारती पवार, पुण्यातून
अनिल शिरोळेंऐवजी गिरीश बापट, सोलापूरहून शरद बनसोडे यांच्याऐवजी जय सिद्धेश्वर शिवाचार्य
स्वामी महाराज आणि लातूर इथून सुनील गायकवाड यांच्याऐवजी सुधाकर श्रृंगारे यांना भाजपनं
निवडणुकीत उतरवलं होतं, या सर्व उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
****
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून अट्ठ्याहत्तर महिला खासदार
निवडून आल्या असून, महिला खासदारांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. मावळत्या
सोळाव्या लोकसभेतल्या एक्केचाळीस महिला खासदारांपैकी सत्तावीस महिला खासदारांनी आपलं
पद राखलं आहे. यात सोनिया गांधी, हेमा मालिनी, सुप्रिया सुळे आणि किरण खेर यांचा समावेश
असून, लोकसभेत नव्यानं खासदार होत असलेल्या एक्कावन्न महिलांमध्ये स्मृती इराणी यांचा
समावेश आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं
आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक मतदान
यंत्रांवरच्या आक्षेपांबाबत, कायमस्वरूपी समाधान शोधायला हवं, असंही त्यांनी म्हटलं
आहे. ही प्रक्रिया पारदर्शी न केल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास कमी होईल, असं
पाटील यांनी ट्वीट संदेशातून म्हटलं आहे.
****
लातूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भाजपचे
दीपक मठपती यांची निवड झाली आहे. लातूर महापालिकेत काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी आठ
आठ सदस्य असल्यानं, स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड सोडत पद्धतीनं केली जाते. काँग्रेसकडून
रविशंकर जाधव तर भाजपनं दीपक मठपती यांना सभापतिपदासाठी उमेदवारी दिली. सोडत पद्धतीनुसार
दीपक मठपती यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे त्यांना विजयी घोषीत करण्यात आलं. जिल्हाधिकारी
जी श्रीकांत यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं.
****
No comments:
Post a Comment