Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आंतरराष्ट्रीय
कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कामगारांनी आपल्या काम आणि त्यागानं समृद्ध
भारताचा पाया घातला आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर, कामगारांच्या
कठोर परिश्रम आणि बांधिलकीला आपण नमन करतो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं असून, कामगारांचे
अधिकार आणि सन्मान कायम राखण्याचा संकल्प करायला हवा, असं म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य
स्थापनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन नवी दिल्लीत उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी
आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र
शासनाच्या दिल्लीतल्या विविध कार्यालयातले अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीतले विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या
हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी राज्याचे मुख्य
सचिव यु.पी.एस मदान, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त
अजोय मेहता यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्रासाठी
प्रयत्न करणाऱ्या असंख्य हुतात्म्यांचे आपण ऋणी असून या हुतात्म्यांना वंदन करण्याचा
हा दिवस आहे, असं प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री
रामदास कदम यांनी केलं आहे. महाराष्ट्र दिनाचं ध्वजारोहण कदम यांच्या हस्ते आज नांदेड
इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते.
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात
मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते झालं. पोलिस अधिक्षक
कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका
आयुक्त रमेश पवार हे या ध्वजवंदन कार्यक्रमात
सहभागी झाले.
गोंदिया इथे गोंदिया
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते
या दिनाचं ध्वजारोहण आज झालं. पोलिस दलातल्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा
यावेळी सत्कार करण्यात आला.
धुळ्यामध्ये पालकमंत्री
आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. धुळ्याच्या
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते तर धुळे जिल्हा
पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक विश्वास
पांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला. पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या
कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रं प्रदान करण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या मया बाजार इथे जाहीर सभा घेतली. आपल्या सरकारनं गेल्या
पाच वर्षांत गरीबांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम केलं, आणि गेल्या पाच वर्षात देशाचा
स्वाभिमान उंचावला, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
सरकारनं राज्यातल्या
चारा छावण्यांची स्थिती सुधारावी आणि जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यात वाढ करावी,
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त
परिस्थितीची पहाणी करण्यासाठी पवार यांनी कालपासून सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा
दौरा सुरू केला आहे, त्यात सांगोला तालुक्यातल्या यलमार मांगेवाडी इथल्या चारा छावणीची
पाहणी करताना त्यांनी ही मागणी केली. अर्धं राज्य दुष्काळात होरपळत असून, बीड ,उस्मानाबाद,
धुळ्यासह काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्यास सरकार, निवडणूक आचार संहितेचं कारण
सांगून नकार देत असल्याचं सांगत, सरकारनं तत्काळ अशा भागात पाण्याचे टँकर्स सुरू करावेत,
असंही पवार यांनी म्हटलं.
****
आयसीएसई, अर्थात
भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परिषदेनं गेल्या मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता
दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल येत्या सात तारखेला जाहीर होणार आहेत. या दिवशी
दुपारी तीन वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर केला जाणार असल्याचं
वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत
आज रात्री आठ वाजता चेन्नईमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा सामना दिल्ली कॅपीटल्सविरुद्ध
होणार आहे. दिल्ली आणि गतविजेता चेन्नई संघ बारा सामन्यांत प्रत्येकी १६ गुण घेऊन आठ
संघांच्या या स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे. हे दोन्ही संघ `प्ले ऑफ` साठी पात्र ठरले
आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment