Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०२ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
नक्षलवाद्यांनी
काल केलेला
हल्ला आणि दुष्काळी
परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आज राज्य मंत्रीमंडळाची तातडीची
बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती
आणि गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटाच्या पार्श्र्वभूमीवर
ही बैठक बोलावण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात काल दुपारी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या
भूसुरुंग स्फोटात शीघ्र कृती दलाचे पंधरा जवान शहीद झाले होते आणि त्यांना नेणाऱ्या
वाहन चालकाचा यात मृत्यू झाला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री
हंसराज अहिर, आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आज गडचीरोलीला भेट देणार असून
शहिदांना मानवंदना देणार आहेत.
****
या स्फोटात शहीद
झालेल्यांमध्ये शीघ्र कृती दलाच्या जवानांमध्ये यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तरोडा
मांगूळ येथील अग्रमन बक्षी रहाटे यांचा समावेश आहे. ते ३५ वर्षांचे होते. त्यांचा पार्थीव
देह आज संध्याकाळी तरोडा गावी अंत्यसंस्कारासाठी आला जाईल, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं
दिली आहे.
****
संयुक्त राष्ट्र
संघटना- युनोनं जैश- ए- मोहम्म्द या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय
दहशतवादी घोषित केलं आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी घेतलेल्या या निर्णयाची उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी एका
संदेशाद्वारे प्रशंसा केली आहे. सर्व सदस्य देश अझरला शस्त्रास्त्र घेऊन जाण्यापासून
रोखणं, त्याची संपत्ती जप्त करणं आणि त्याला प्रवास करण्यापासून रोखणं या निर्बंध समितीच्या निर्णयांचं पालन करतील,
अशी आशा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या उरलेल्या तीन टप्प्यांसाठीच्या
प्रचारानं वेग घेतला असून, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते देशात ठिकठिकाणी प्रचारसभा
घेत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मध्यप्रदेशात राजगड, नीमूच आणि शिहोर इथं प्रचारसभा
घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झारखंड आणि राजस्थानात प्रचार सभा
होणार आहेत. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा आज रायबरेली इथं प्रचार सभेला संबोधित
करणार आहेत. भाजपा नेते महेश शर्मा यांचीही आज रायबरेलीत प्रचार सभा होणार आहे. जे.
पी नड्डा आज सुलतानपूर आणि अमेठी जिल्ह्यातल्या पार्टी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतापगड आणि लखनौ इथं प्रचारसभा
होणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी आतापर्यंत चार टप्प्यातलं
मतदान पार पडलं असून पाचव्या टप्प्यासाठी येत्या सोमवारी, सहाव्या टप्प्यासाठी 12 तारखेला
तर सातव्या टप्प्यासाठी येत्या 19 तारखेला मतदान घेतलं जाईल. मतमोजणी येत्या 23 तारखेला
होणार आहे.
****
जम्मू कश्मिरला देशातल्या इतर भागाशी जोडणारा मुघल
रोड आज चार महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला झाला. या भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हा
रस्ता बंद ठेवण्यात आला होता. हा 84 किलोमीटरचा रस्ता केवळ प्रवासी वाहनांसाठी खुला
आहे.
****
‘फानी’ चक्रीवादळ उद्या ओदिशा समुद्रकिना-यावर धडकण्याची
शक्यता असून, यावेळी ताशी 175 ते 185 किलोमीटर वेगानं वारे वाहतील. फानी हे वादळ ओदिशा,
आंध्र प्रदेश, आणि पश्चिम बंगालच्या १९ जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याच्या
पार्श्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं खबरदारी म्हणून ८१ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
यामध्ये हावडा-चैन्नई कोरोमंडल, पटना-एर्नाकुलम, नवी दिल्ली -भुवनेश्वर - राजधानी,
हावडा-हैदराबाद आणि भुवनेश्वर-रामेश्वरम या जलद रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय विमान प्राधीकरणानं फानी चक्रीवादळाची
शक्यता लक्षात घेता समुद्र
किनाऱ्यांवरील सर्व विमानतळांना सावध राहण्याची सूचना केली आहे. कोणत्याही परिस्थीतीचा
सामना करण्यासाठी सज्ज रहावे, असं या विमानतळांच्या
संचालकांना कळवण्यात आलं आहे.
****
सांगली जिल्ह्यात या हंगामात बेदाण्याचं विक्रमी
अठरा हजार गाड्यांचं उत्पादन झालं आहे. दरम्यान एक लाख ८० हजार टन बेदाण्याची बाजारात
आवक झाली. केवळ दोन महिन्यात आवक वाढली असुन दर वाढले आहे. मात्र आवक वाढल्यामुळे दर
कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. सध्या दर पातळी किलोला १२० ते २००
रुपये एवढी आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री चेन्नई इथं झालेल्या
सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सवर 80 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
*****
***
No comments:
Post a Comment