Friday, 3 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.05.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 May 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३  मे २०१ सकाळी ७.१० मि.

****

·       सर्व पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करून आढावा घेण्याच्या तसंच चारा छावण्यांना भेटी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

·       गडचिरोली भुसुरूंगात शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रूपयांची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·       वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चालू शैक्षणिक वर्षात विशेष मागास प्रवर्ग- मराठा आरक्षण लागू करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

आणि

·       औरंगाबादमध्ये एलआयसीच्या जनश्री विमा योजनेत एक कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस

****

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करून आढावा घेण्याच्या तसंच चारा छावण्यांना भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यांनतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल, याची काळजी घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांना देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दुष्काळाच्या स्थितीत करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकार तयार असून,  ८२ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार ४१२ कोटी ५७ लाख रूपयांची मदत जमा केल्याचं त्यांनी सांगितलं. तीन हजार २०० कोटी रूपयांच्या पीक वीमा वितरणाची प्रक्रिया सुरू असून त्यापैकी एक हजार १०० कोटी रूपयांच्या पीक विम्याचं वितरण झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळग्रस्त भागात एक हजार २६४ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, त्यात सुमारे साडेआठ लाख जनावरं आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या दुष्काळी परिस्थीतीबाबत राज्य शासनानं ऑक्टोबर पासूनच तीव्र गतीनं पावलं उचलायला सुरूवात केली, त्यामुळं दुष्काळावर बऱ्यापैकी मात करण्यात आपण यशस्वी झालो असल्याची माहिती महसूल, मदत आणि पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली आहे.  दुष्काळी गावं घोषित करणं, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि चारा छावण्या सुरू करणं, पीक भरपाई देण्याबरोबरच प्रति हेक्टरी ते सगळ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करणं, अशा उपाय योजना करण्यात यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या पाणी टंचाईबाबत बोलतांना ते म्हणाले,



बारा हजार एकशे सोळा गावांमध्ये चार हजार सातशे चौऱ्याहत्तर टँकर आपण सुरू केलेले आहेत. यातही धोरण आपण असं ठरवलं, जे गाव पाण्याचा टँकर मागेल त्याला तो लगेच देता यावा म्हणून कलेक्टरांकडून ते अधिकार आपण प्रांताकडे आणले.प्रांताने चोवीस तासांमध्ये त्या गावानं डिमांड दिल्यानंतर प्रामुख्यानं त्या गावातील उपलब्धता चेक करायची असते. ती चेक करून चोवीस तासात निर्णय द्यावा. मागेल त्याला टँकर सुरू झाला आणि चार हजार सातशे चौऱ्याहत्तर टँकर आत्ता सुरू आहेत.



थकीत वीज देयकं न भरल्यामुळे बंद असलेल्या तीन हजार ३२० पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी पुर्ववत करण्यात आली असून, नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ अखेरची वीज देयकं शासन भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोलीला भेट देऊन भूसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या शहीद जवानांना मानवंदना दिली तसंच शहीदांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर



या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची तातडीची मदत तसंच त्यांच्या नोकरीच्या कालवधी पर्यंत संपूर्ण वेतन देण्याचं आश्वासन या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. मानवदनेनंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.  

                                     आकाशवाणी बातम्यांसाठी जयंत निमगडे



जांभूरखेडाच्या घटनेची चौकशी पोलिस महासंचालक स्वत: करत असून, यंत्रणेत काही उणिवा असल्यास त्यांची पूर्तता केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.   

दरम्यान, नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्यानं आमचं मनोबल खच्ची होणार नसून नक्षली कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी आमचा कृती आराखडा तयार असून लवकरच तो कृतीतून दिसेल असं, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोली इथं पत्रकारांशी बोलत होते.

****

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चालू शैक्षणिक वर्षात विशेष मागास प्रवर्ग- मराठा आरक्षण लागू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विशेष मागास प्रवर्ग - मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यास आक्षेप घेणारी याचिका काही विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाली असून विशेष मागास प्रवर्ग कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू झाला आहे, त्यामुळे हा कायदा पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येणार नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं, न्यायालयानं ते मान्य केलं आहे.

****

लोकसभा निवडणुकी दरम्यान घेतलेल्या जाहीर सभांच्या खर्चांचा तपशील सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले आहेत. मनसेचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसतांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात जवळपास दहा सभा घेतल्या आहेत. नियमानुसार राजकीय पक्षांना खर्च तपशील देणं बंधनकारक असून मनसेलाही खर्चाचा तपशील द्यावा लागेल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभांचा खर्च कोणत्या पक्षाच्या खात्यात लावला जाणार याबाबतची विचारणा भारतीय जनता पक्षानं राज्य निवडणूक आयोगाकडं केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.  

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

निती आयोगामार्फत देशातल्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या ११५ जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातल्या वाशिम, उस्मानाबाद, गडचिरोली आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य आणि आहार, आर्थिक स्वायत्तता आणि कौशल्य विकास तसंच पायाभूत सुविधा या पाच निकषांच्या आधारे या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. 

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. देशभरातून जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करीश्मा अरोरा यांनी पाचशेपैकी प्रत्येकी ४९९ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

****

भारतीय आयुर्विमा मंडळ - एल आय सीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या जनश्री विमा योजनेत एक कोटी रूपयांचा घोटाळा करत एलआयसीला फसवल्याचं उघड झालं आहे. जनश्री विमा योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातल्या लोकांना समूह विमा योजना देण्याची तरतूद आहे. या योजनेतल्या तरतुदींचा गैरफायदा घेत औरंगाबाद शहरातल्या काही सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मृतांच्या नावे रक्कम उचलून त्याच व्यक्तीला दुसऱ्या संस्थेत पुन्हा जिवंत दाखवत त्याची पॉलिसी काढल्याचं परिक्षण अहवालात समोर आलं आहे. यावरून शहरातल्या आठ संस्थांच्या दहा पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण आधारित खतं वापरावी आणि पीक पद्धतीत बदल करावेत, असं आवाहन कृषी शास्त्रज्ज्ञ किशोर झाडे यांनी केलं आहे. त्यांनी काल औरंगाबाद इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात खरीप हंगाम पूर्व नियोजना संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. येत्या १८ मे रोजी परभणी इथं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्हास्तरीय खरीप हंगामाची आढावा बैठक काल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जमिनीची सुपिकता आणि पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करुन शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सर्व गावांत तालुका कृषी अधिकारी, इतर संबंधित अधिकारी यांनी शेतकऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन करुन प्रत्यक्ष संवाद साधण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

परभणी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात २०११ ते १५ या कालावधीत ७५ लाख रूपयांचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणी शिक्षण विभागातल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. लेखा परीक्षण अहवालातून हे प्रकरण उघडकीस आलं आहे. महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका रेहाना बेगम शब्बीर अली यांच्या नावे वेतन प्रदान करून हा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेनं रोजंदारी कर्मचारी बालवाडी शिक्षिका रेहान बेगम यांना सेवेतून बडतर्फ केलं असून प्रभारी मुख्याध्यापक ज्योती जोशी -कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

****

औरंगाबाद इथल्या एका उद्योजकाला त्याच्या कंपनीसाठी दोन कोटी रूपये प्रकल्प कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवून चार लाख ८० हजार रूपयांना फसवण्यात आल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. राजेंद्र मंडोरे असं फसवणूक झालेल्या उद्योजकाचं नाव असून औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन औद्योगिक परिसरात त्यांची कंपनी आहे.

****

‘फानी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तीनही संरक्षण दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं आपली जहाजं आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली असून, लष्कर आणि हवाई दलही सज्ज आहेत. अत्यंत तीव्र स्वरुपाचं हे चक्रीवादळ आज ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

//************//

No comments: