Saturday, 4 May 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.05.2019....20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 May 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मे २०१९ सायंकाळी २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. सात राज्यांतल्या एकूण ५१ मतदार संघांमध्ये परवा सोमवारी पाचव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांनी शेवटपर्यंत मतदारांना मतांसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रचार केला. राहुल गांधी यांनी सुलतानपूर इथं, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बहरीच आणि गोंडा जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या.

या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या १४, राजस्थान १२, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी सात, बिहारच्या पाच, झारखंडच्या चार तर जम्मू काश्मीरच्या दोन लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ, अमेठी, रायबरेली या मतदारसंघांमध्ये परवा मतदान होणार आहे.

****

वायव्य दिल्लीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हंस राज हंस यांच्याविरूद्ध जातीवाचक टिपणी केल्याबद्दल निवडणूक आयोगानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजेंद्र पाल गौतम आणि गगन सिंह यांना आज उत्तर देण्यास सांगितलं होतं. हंस राज हंस यांनी २०१४ मध्ये मुस्लिम धर्माचा स्वीकार केल्याचा आरोप करत, ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं ते वायव्य दिल्लीतून निवडणूक लढवू शकत नाहीत असं वक्तव्यं केलं. दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता आणि हंस राज हंस यांनी याबाबत तक्रार केली होती.

****

लोकशाहीचा नवा महाराजा समजणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बिहारमधल्या वाल्मिकीनगर इथं प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलांसारख्या पक्षांकडे नाव आणि पैशाचं व्हिजन असून खोटं आणि पारिवारीक राजकारण हे त्यांच्या अस्तित्वासाठी एकमात्र माध्यम बनलं असल्याचंही ते म्हणाले. चौथ्या टप्प्यातल्या मतदानानंतर महागंठबंधनमधील सर्व पक्षांचे दावे खोटे पडले असून वंशवाद आणि भ्रष्टाचाराच्या पैशांमुळे यांना आलेला अहंकार बिहारची जनता उतरवून ठेवेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

****

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज अमेठी इथं रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाच्या अमेठीतील उमेदवार स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या रोड शो मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्मृती इराणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत असून २०१४ मध्येही त्यांनी गांधी यांना जोरदार लढत दिली होती. अमेठी लोकसभा मतदार संघात परवा मतदान होणार आहे. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणाहून १६ वेळा निवडून आला आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर भाजप ही निवडणूक हरणार असून घाबरलेले पंतप्रधान विरोधी पक्षांशी सामना करण्यास असमर्थ दिसत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पक्ष मुख्यालयात ते आज वार्ताहरांशी बोलत होते. एक सुप्त लाट सध्या असून यात भाजप निवडणूक हारत असल्याचं दिसत आहे असं सांगत भाजपच्या प्रचारात कोणतीही रणनीती दिसत नसल्याचं ते म्हणाले.

****

हिंदु धर्माला दहशतवादाशी जोडण्यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केलेल्या टिपणीवरून योग गुरू रामदेव यांनी त्यांच्याविरूद्ध हरिद्वारच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. येचुरी यांच्या टिपणीमुळे हिंदुच्या भावना दुखावल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. येचुरी यांनी हिंदु धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असून याचा निषेध केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

अमेठीसह देशभरात काँग्रेस पक्ष पराभूत होण्याच्या स्थितीत असल्यामुळे आलेल्या नैराश्यातून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी पंतप्रधानांवर आरोप करत असल्याचं भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे. दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना भाजपचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंहराव यांनी, अमेठी मतदार संघातून राहूल गांधी आणि पक्ष मोठ्या फरकानं निवडणूक हारत असल्याचं सगळीकडून अहवाल मिळत आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षात नैराश्याचं वातावरण असल्याचं ते म्हणाले.

****

लोकसभा निवडणुकीचे २३ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात ‘व्यवहार्य पर्यायी सरकार’ स्थापन होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आज ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार बनवण्यास पाचारण करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर तात्काळ किंवा पंधरा दिवसात ‘व्यवहार्य पर्यायी सरकार’ येईल किंवा नाही हे आपण सांगू शकत नसल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

No comments: