Saturday, 4 May 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.05.2019....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 May 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मे २०१९ सायंकाळी ६.००

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फोनी चक्रीवादळानं प्रभावित झालेल्या ओडिशाच्या भागांचा सोमवारी दौरा करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालांशी क्षतीग्रस्त भागाच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. संपूर्ण देश वादळग्रस्त भागातल्या नागरिकांसोबत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या चक्रीवादळामुळं ओडिशामधे आतापर्यंत चौदा नागरिकांचा बळी गेला असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. ओडिशानंतर पश्चिम बंगालमधे धडकलेल्या या वादळामुळं जोरदार पावसानं थैमान घातलं आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले आहेत. आसाममधेही काल रात्रीपासून काही भागांमधे सतत पाऊस सुरू असल्याचं याबाबत दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

****

संयुक्त राष्ट्र संघ अर्थात युनोनं भारतीय हवामान खात्यानं फोनी या चक्रीवादळाचा घेतलेला अचूक अंदाज आणि मोठ्या प्रमाणात नुकसान आणि अनर्थ टाळल्याबाबत भारताचं अभिनंदन केलं आहे. तसंच ओडिशामधल्या पुरी जिल्ह्यात भूस्खलन झाल्यानंतरही अतिशय नियोजिनबद्धरित्या काम केल्यामुळं अतिशय कमी प्रमाणात जीवित हानी झाल्याचं युनोनं म्हटलं आहे. चक्रीवादळ आणि इतर आपत्तीमधे कमीतकमी नुकसान होण्यासाठी भारताने सेंदाई मॉडेलची अंमलबजावणी करण्यासाठी दाखवलेल्या कटीबद्धतेमुळं हे सर्व शक्य झालं असल्याचं युनोनं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेरोजगारी आणि कृषीसमस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. ते आज नवी दिल्लीत पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दहशतवादाचा सामना करण्यासाठी कठोर उपायांची गरज असून संयुक्त लोकशाही आघाडी सरकारनं मोदी सरकारच्या तुलनेत हे काम अधिक सक्षमपणे केलं असल्याचं गांधी म्हणाले. मात्र, राहूल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येत असल्याचं भाजपचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिम्हा राव यांनी म्हटलं आहे. २०१६ पूर्वी कोणत्याही लक्ष्यभेदी हल्ल्याचा दस्त उपलब्ध नसल्याचंही राव यावेळी म्हणाले.

****

राफेल युध्द विमान खरेदी प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात तोंडी उत्तर दिलं आहे. सुरक्षेसंबंधी गोपनीय दस्तऐवज अशा प्रकारे सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका पोहचू शकतो, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यापूर्वीच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयानं राफेल कराराचे गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केल्यास संरक्षण, सैन्याच्या हालचाली, अण्विक कार्यक्रम आणि दहशतवाद विरोधी उपायांच्या संबंधित गुप्त योजना उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं निरीक्षण नोंदवलं असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. तसंच याचिकाकर्ते बेकायदेशीररित्या हस्तगत केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सध्याची पुनर्विलोकन याचिका दाखल केली असल्याचं केंद्र सरकारनं युक्तिवाद केला आहे. या प्रकरणी ६ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

****

देशभरात उद्या वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी नीट - राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा होणार आहे. ओडिशामध्ये मात्र फोनी वादळाच्या तडाख्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली असून या राज्याचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेनं कळवलं आहे.

****

धुळे जिल्ह्यातल्या टाकरखेडा इथं तापी नदी पत्रातील ७७ लाखांचा बेकायदेशीर वाळूसाठा केल्याचं उघडकीस आलं आहे. महसूल विभागानं १ मे रोजी या भागात अचानक कारवाई केली असता संगनमतानं बनावट शासकीय कागदपत्रे तयार करून हा वाळूसाठा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. वाळुसाठ्यासह लाखो रूपयांचं पोकलेन यंत्रदेखील जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात आज दोन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर जवळच्या भिलार इथल्या ‘पुस्तकांचं गाव’ या प्रकल्पाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त भिलार इथं विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक आनंद काटीकर यांनी दिली आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद पुस्तकांच्या गावात घ्या असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

अकोल्यात बारा लाख रुपयांची प्रतिबंधित सुगंधीत सुपारी जप्त करण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासन तसेच पोलिस दलाने काल ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी ट्रक जप्त केला असून वाहन चालकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अकोला पोलिसांनी दिली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...