Sunday, 5 May 2019

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 05.05.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 May 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५  मे २०१ सकाळी ७.१० मि.

****

** राफेल विमान खरेदीचे गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केले, तर देशाच्या अस्तित्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो- केंद्र सरकाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

** राज्यातल्या दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक बैठका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची राज्य सरकारला परवानगी तर दुष्काळ निवारणासाठी तातडीनं पावलं उचलण्याच राष्ट्रवादी काँग्रेसच सरकारला आवाहन

** देशभरात आज वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा

आणि

** जालना शहरा५०० टन बनावट सेंद्रिय खत जप्त

*****

राफेल विमान खरेदी संदर्भातले गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केले, तर देशाच्या अस्तित्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलं. राफेल खरेदी व्यवहाराबाबतची गोपनीय कागदपत्रं खुली केली तर संरक्षण, सुरक्षा दलातल्या नियुक्त्या, अणु संशोधन केंद्र, दहशतवाद विरोधी उपाययोजना यासंबंधित गुप्त माहितीही उघड होण्याची शक्यता वाढेल, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. राफेल खरेदी संबंधातल्या सर्व याचिका फेटाळून लावण्याचा सर्वोच्च न्यायालयानं १४ डिसेंबर २०१८ रोजी घेतलेला निर्णय योग्यच होता, राफेल पुनर्विचार याचिकांद्वारे या कराराच्या चौकशीचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांमधे छापून आलेले तीन लेख म्हणजे जनतेचे विचार नाहीत, आणि सरकारचा अंतिम निर्णय देखील नाही, असं केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक बैठका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र याचा राजकीय फायदा न घेण्याच्या आणि अनावश्यक प्रसिद्धी न करण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिल्या आहेत. दुष्काळी भागात पाणीपुरवठा योजनांना मंजुरी किंवा दुरुस्ती आणि अन्य दुष्काळी उपायांसाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचं आयोगानं राज्य शासनाला कळवलं आहे. राज्य सरकारनं १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारनं चार हजार ७१४ कोटी रुपये मदत दिली आहे.

****

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलायला हवीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पिण्याचं पाणी तसंच पशूधन वाचवण्यासाठी चारा छावण्या, रोजगार, पीक नुकसानाची भरपाई याची काळजी सरकारनं घ्यायला हवी, असं त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. राज्यातल्या दुष्काळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ काल रात्री मुख्यमंत्र्यांना भेटलं. फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारनं अनुदान द्यावं. शेतकऱ्यांची सर्व प्रकारची वसुली थांबवावी, कर्जमाफी आणि कर्जांचं पुनर्गठन हे दोन्ही प्रश्न सोडवावेत, असं ते म्हणाले.

****

देशभरात आज वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी नीट - राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा होणार आहे. ओडिशामध्ये मात्र फोनी वादळाच्या तडाख्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली असून या राज्याचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेनं कळवलं आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या जांभूरखेडा इथं भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर इथल्या रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर आणि त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशद्रोह, हत्या, गुन्हेगारी कट रचणं, बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

  राज्य सरकारनं बालकांचा मोफत आणि सक्तीचा अधिकार कायदा -आर टी ई नुसार मोफत प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या टप्प्यातल्या प्रवेशासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागानं काल नवीन वेळापत्रक जाहीर केलं. या कायद्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात तीन हजार आठशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिक्षण विभागानं स्वतंत्र समित्या तयार केल्या असून, या समित्यांकडून योग्यतेचं प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

****

जालना शहरानजिकच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधल्या वरद फर्टिलायझर कंपनीच्या गोदामावर काल रात्री छापा टाकून कृषी विभागानं जवळपास ८८ लाख  रुपये किमतीचं ५०० टन बनावट सेंद्रिय खत जप्त केलं आहे.

या छाप्यात उसाच्या मळीमध्ये माती आणि लिंबोळी अर्क मिश्रीत करून तयार केलेलं डॉक्टर नीम या नावानं विकलं जाणारं बनावट सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात आढळून आलं. या प्रकरणी कृषी विभागाचे मोहीम अधिकारी व्ही. एस. कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरद फर्टिलायझर कंपनीचे संचालक, मालक आणि व्यवस्थापकाविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परवा जालना तालुक्यामधल्या गुंडेवाडी शिवारातल्या राजलक्ष्मी फर्टिलायझर या खत कारखान्यात छापा टाकून कृषी विभागानं ६३ लाख २१ हजार रुपये किमतीचं, नीम पॉवर या नावानं विकलं जाणारं बनावट सेंद्रिय खत जप्त केलं होतं.

****

लातूर तालुक्यातल्या प्रत्येक गावाला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचं सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या आहेत. लातूर तालुका टंचाई आढावा बैठकीत काल ते बोलत होते. नियमित पाणी पुरवठा योजनां व्यतिरिक्त विहीर, बोअर, टँकर, तसंच अधिग्रहणाचे सूक्ष्म प्रस्ताव गाव पातळीवर तयार करुन ते तहसिलदार तसंच गट विकास अधिकाऱ्यांना पाठवावेत आणि आलेल्या प्रस्तावावर संबंधितांनी त्वरित निर्णय घेऊन त्या त्या गावांना पाणी मिळेल याचीदक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

परभणी जिल्ह्यातली दुष्काळाची परिस्थिती आणि पाणीटंचाईचं गंभीर संकट लक्षात घेता लोअर दुधना प्रकल्पातून १५ घनफूट पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातल्या परिस्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा करून पाणी त्वरीत सोडण्याची मागणी केली. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना यासंदर्भात आदेशही देण्यात आले आहेत. येत्या १५ मेपर्यंत या पाण्याचा विसर्ग होणार आहे.

****

बीड शहरातल्या नागरीकांच्या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन पाणी पुरवठ्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याच्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत सतर्कता बाळगण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी केल्या आहेत. या संदर्भात आयोजित बैठकीत काल ते बोलत होते. शहरात ठिकठिकाणी असलेली पाणी गळती तातडीनं दुरूस्त करावी, आवश्यक ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर लावावीत. शहरातले नादुरूस्त हातपंप त्वरीत दुरूस्त करून घ्यावेत अशा सूचना त्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा शेतकरी उत्पादक संस्थेत समावेश व्हावा यासाठी कृषि विभागानं प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. लातूर शहरात घेण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक संस्थेच्या एक दिवशीय कार्यशाळेत काल ते बोलत होते. शेतकरी उत्पादक संस्थेत सहभागी शेती  गटांना शासनाकडून  सहकार्य देण्यात येईल, असं ते यावेळी म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बाबत त्वरीत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन या शिष्टमंडळाला दिलं. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन खरीप हंगाम २०१८-१९ साठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी मागणी होती. आचारसंहिता संपल्यानंतर या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

//***********//

No comments: