Saturday, 4 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 04.05.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

 बातमीपत्र

०4 मे २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



लोकसभा निवडणुकीतल्या पाचव्या टप्प्याचं मतदान परवा सोमवारी होणार असून या साठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. या टप्प्यात सात राज्यांमधील ५१ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. प्रचाराचा एकच दिवस शिल्लक असल्यानं सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही प्रचार जोरात करत आहेत. यानिमित्त प्रचार सभा, फेऱ्या, कार्यकर्त्यांच्या बैठका यावर भर दिला आहे.

****

जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार झाले. सैन्य दलाचा एक जवान यात जखमी झाला आहे. या कारवाईत शोपिया जिल्ह्यात अदखारा गावात अकराव्या बुऱ्हान वाणी गटाचा दहशतवादी लतीफ अहमद दार उर्फ लतीफ टायगर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ठार करण्यात आलं. लतीफ टायगर हा बुऱ्हाण वाणी गटाचा जिवंत असलेला एकमेव दहशतवादी होता, त्याच्या मृत्यू बरोबरच आता बुऱ्हाण वाणी गटाचा खात्मा झाला आहे.

****

सरकारच्या नोटबंदी आणि राफेल मुद्दयावर राहुल गांधी यांनी जोरादार टीका केली आहे. नवी दिल्ली इथल्या काँग्रेस भवनमध्ये आज सकाळी गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेसच्या काळातल्या सैन्य कारवाईला व्हिडीओ गेम म्हणणे म्हणजे सैन्यदलाचा अपमान असल्याचं ते म्हणाले. लक्ष्यभेदी कारवाई पंतप्रधान नरेंद मोदींनी नाही तर सैन्यदलानं केली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भारतीय जनता पक्षाला हरवणं हेच काँग्रेस पक्षाचं मुख्य ध्येय असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलं. काँग्रेसची न्याय योजना नोटबंदीला उत्तर असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

गडचिरोलीसारखा नक्षलवादी हल्ला पुन्हा होणार नाही याची खबरदारी केंद्र आणि राज्य सरकार घेईल, असं केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. काल हैद्राबाद इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शीघ्र कृती पोलिस दलाच्या जवानांचे वाहन नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून उडवून दिल्यामुळे या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते, याशिवाय वाहनाचा चालक मृत्यूमुखी पडला होता. या घटनेकडे सरकार एक आव्हान म्हणून बघत असल्याचं अहीर यांनी यावेळी सांगितलं. आतापर्यंत नक्षलवाद्यांवर सरकारने वचक निर्माण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हा हल्ला केला, मात्र यातील कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.



****

राज्यात टंचाई परिस्थितीत येत्या जुलै अखेरपर्यंत पाणी उपलब्ध व्हावं यासाठी विशेषत: मराठवाडा, नाशिक तसंच विदर्भातल्या धरणांमधल्या पाणीसाठ्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्य सचिव यू.पी.एस मदान यांनी काल संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरनं सुरळीत पाणी पुरवठा होईल, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. मदान यांनी काल टंचाईग्रस्त जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्याच्या उपाययोजनांसाठी राज्य शासनानं चालू आर्थिक वर्षासाठी ५३० कोटींचा निधी वितरीत केला आहे.

*****

पुढील आठवड्यात मतदान पडताळणी यंत्र व्हीव्हीपॅटबाबतच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली आहे. गेल्या महिन्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र ही संख्या वाढवावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी या याचिकेद्वारे केली होती.

****

आकाशवाणीच्या महाराष्ट्र आणि गोव्यातल्या २४ केंद्रांच्या प्रमुखांची बैठक काल पुण्यात झाली.या बैठकीत आगामी काळात कार्यक्रम अधिक आकर्षक आणि लोकप्रिय करण्याबाबत तसंच महसूलवाढी संदर्भातही चर्चा करण्यात आली. यावेळी पश्चिम विभागाचे कार्यक्रम विभागाचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल अध्यक्षस्थानी होते. तर महसूल विभागाचे अतिरिक्त महासंचालक अशोक गुप्ता, पुणे आकाशवाणी केंद्र संचालक गोपाळ आवटी आणि आकाशवाणी मुंबईच्या सहाय्यक संचालक सुजाता परांजपे यावेळी उपस्थित होत्या.

****

सुर्याच्या अभ्यासाकरिता भारतीय अंतराळ सशोधन संस्था पुढील वर्षाच्या सुरूवातीला यान पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी काल नागरकोविल इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या माहिमेला ‘आदित्य’ असं नाव देण्यात आलं आहे. जुलैमध्ये ‘चांद्रयान -२’ ही मोहिम तडीस नेण्याचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत अंतराळविरांना अवकाशात पाठवण्याच्या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे. चक्रीवादळापासून बचाव करण्याच्या दृष्टीनं उपग्रहांकडून मिळणारी हवामान विषयक माहिती महत्त्वाची ठरते. असं त्यांनी यावेळी सांगीतलं. 

//***********//










No comments: