Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø
सुधारीत नागरिकत्व
कायद्याबाबत नागरिकांनी गैरसमज बाळगू नये - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Ø कायद्याविरोधातल्या आंदोलनाला बीड-परभणी-हिंगोलीत
हिंसक वळण
Ø कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा संबंध
नाही - एसीबीचा निर्वाळा
आणि
Ø औरंगाबाद हे नवीन शैक्षणिक हब; एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या
शुभारंभप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं प्रतिपादन
****
सुधारीत नागरिकत्व
कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये, असं आवाहन मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. विधानसभेत काल
यासंदर्भात निवेदन करताना ते बोलत होते. राज्यातल्या
कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी
यावेळी दिली. हा कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात आंदोलनं होत असून, जनतेच्या
मनातला गैरसमज दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त
केली. कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गानं आंदोलन करत
निवेदन द्यावं, आंदोलनात हिंसाचाराचा मार्ग न अवलंबता राज्याच्या
लौकिकास धक्का लागू नये याची दक्षता घ्यावी, असं मुख्यमंत्री
म्हणाले.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या
निषेधार्थ कालही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं एमआयएम पक्षाच्या नेतृत्वात
भव्य मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात अनेक मुस्लिम
संघटना आणि नागरिक शांततेत सहभागी झाले.
जालना तालुक्यातल्या रामनगर इथं बाजारपेठेतले व्यवहार
दोन तास बंद ठेवण्यात आले. मुस्लीम समाज बांधवांनी जालना -मंठा मार्गावरून शांततेत
मोर्चा काढून, पोलिस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं.
नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय
धरणे आंदोलन करण्यात आलं. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं दुपारी शहरातल्या
रस्ते वाहतुकीत बदल केला होता.
बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मात्र या आंदोलनाला
हिंसक वळण लागलं.
बीड इथं एका बसवर तसंच पोलिसांच्या वाहनावर आंदोलकांनी
दगडफेक केली. पोलिसांना लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
परभणी इथं मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर
मोर्चा काढला, प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चा विसर्जित होताच समाजकंटकांनी दगडफेक सुरू
केल्यानं तणाव निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार
करावा लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पाथरी आणि पालम इथंही मुस्लिम संघटनांनी
बंद पाळून मोर्चा काढला.
हिंगोली इथंही
आंदोलकांनी चार बसवर दगडफेक केली, तर अग्निशमन दलाचं वाहन पेटवून दिलं. पोलिसांना परिस्थितीवर
नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमारासह अश्रुधुराचा वापर करावा लागला. हिंगोली आगारातून
बससेवा काल बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्याच्या आखाडा बाळापूर इथं मुस्लिम बांधवांनी
निषेध मोर्चा काढला.
****
राज्यातल्या
साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करणार
असल्याचं सहकार मंत्री जयंत पाटील यांनी काल
विधान परिषदेत सांगितलं. सदाशिव खोत यांनी साखर कारखान्यांच्या रास्त आणि किफायतशीर दर-
एफआरपी संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते
बोलत होते. साखर
कारखान्यांकडून शेतकऱ्यांना थकित एफआरपीची रक्कम देण्यासंदर्भात साखर आयुक्तांकडून
प्रयत्न सुरू असल्याचं
त्यांनी सांगितलं.
अवैध सावकारीला आळा
घालण्यासाठी आणि सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय
अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण
यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणाही पाटील यांनी केली.
****
सन २०१९-२० च्या पुरवणी मागण्यांना काल विधानसभेत
मंजुरी देण्यात आली, तसंच विविध विभागांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं ‘हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असं नामकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा
शासन निर्णय काल जारी झाला. या प्रकल्पासाठी साडेतीन हजार कोटी रुपये भागभांडवली अनुदान
म्हणून देण्याचा शासन निर्णयही काल जारी करण्यात आला.
****
कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांचा काहीही संबंध नसल्याचा
निर्वाळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग - एसीबीनं दिला आहे. विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठात काल दाखल केलेल्या शपथपत्रात ही बाब नमूद केली. विदर्भ सिंचन महामंडळाअंतर्गत
झालेल्या बारा प्रकल्पातल्या कथित घोटाळ्याशी अजित पवार यांचा काहीही संबंध आढळला नसल्याचं,
या शपथपत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, हे शपथपत्र दिशाभूल करणारं असून, न्यायालयात
ते टिकणार नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
याविरोधात विधीमंडळात आवाज उठवण्याचा इशारा फडणवीस यांनी दिल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे. संबंधित कागदपत्रांवर मंत्र्यांच्या सह्या असताना, प्रशासकीय त्रुटींसाठी
फक्त अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरलं जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
****
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी विविध मागण्यांसाठी
राळेगणसिद्धी इथं कालपासून मौन व्रत आंदोलन सुरु केलं आहे. संसदेत २०१२ पासून प्रलंबित
असणारा न्यायिक कायदा करावा, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी,
राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी मदतवाहिनी ठेवावी यासह अन्य मागण्यांसाठी त्यांनी मौन
व्रत धारण केलं.
****
औषधनिर्माण शास्त्र शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाचा
समजला जाणारा ‘प्रा. जी. पी. श्रीवास्तव’ राष्ट्रीय पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना काल प्रदान करण्यात आला. असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल
रिसर्च या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. विद्यापीठातले सर्व विद्यार्थी
तसंच सहकारी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची भावना
कुलगुरू येवले यांनी व्यक्त केली
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद हे नवीन शैक्षणिक हब बनल्याचं प्रतिपादन
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन
एमजीएम अभिमत विद्यापीठाचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत
होते. शासनाची कोणतीही मदत न घेता, गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येतं, हे एमजीएमनं दाखवून
दिल्याचं, पवार म्हणाले.
एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांचा काल
पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी,
माजी मंत्री कमलकिशोर कदम यांची दूरदृष्टी, आणि अंकुशरावांचं प्रशासन यामुळे एमजीएम
विद्यापीठ उभं राहिलं, असे गौरवोद्गार काढले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अंकुशराव कदम यांच्यावरच्या गौरवग्रंथाचं यावेळी
पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
****
निराधार बालकांचं दत्तक विधानाद्वारे पुनर्वसन करणाऱ्या
साकार या संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा काल औरंगाबाद इथं साजरा झाला. यावेळी प्रसिद्ध
सिनेकलावंत चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. बालकांना
दत्तक घेतलेल्या पालकांचा चिन्मयी सुमीत आणि सुमीत राघवन यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला.
****
राज्यातल्या चार महानगरपालिकांच्या प्रत्येकी एका
रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीकरता येत्या २७ डिसेंबरला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध
करण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी
ही माहिती दिली. यामध्ये नांदेड- वाघाळा,
परभणी, अहमदनगर आणि जळगाव या चार महानगरपालिकांमधल्या प्रत्येकी एका
जागेचा समावेश आहे. या यादीवर तीन जानेवारीपर्यंत हरकती आणि आक्षेप स्वीकारण्यात
येणार आहेत.
****
ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट श्रीराम लागू यांच्या पार्थिव
देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सांस्कृतिक तसंच राजकीय
क्षेत्रातल्या मान्यवरांनी लागू यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
जालना जिल्ह्यात रांजणी
ते परतूर रेल्वे मार्गावर रूळाच्या देखभालीसाठी आजपासून येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत
दर शनिवार, मंगळवार आणि गुरुवार असे तीन दिवस अडीच तास रेल्वे मार्ग दुरूस्तीचे काम
केले जाणार आहे. त्यामुळे या तीन दिवसांसाठी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपासून सायंकाळी
पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत या मार्गावरची रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. परिणामी
हैदराबाद - औरंगाबाद प्रवासी गाडी रांजणी रेल्वे स्थानकावर जवळपास ५० मिनिटे तर काचीगुडा
- मनमाड प्रवासी गाडी परतूर रेल्वे स्थानकावर तासाभरापेक्षा अधिक काळ थांबणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं
आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं केंद्र
सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत घेतलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांचं पारितोषिक
वितरण काल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते झालं. तीन दिवस चाललेल्या या
स्पर्धांमध्ये ११ क्रीडा प्रकारात ४५ शाळांमधले सतराशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
कतारमध्ये दोहा इथं सुरू असलेल्या सहाव्या कतार आंतरराष्ट्रीय
चषक भारोत्तोलन स्पर्धेत, भारताच्या साईखोम मीराबाई चानूनं, महिलांच्या ४९ किलो वजनी
गटात सुवर्णपदक पटकावलं. स्नॅच प्रकरात ८३ किलो तर क्लीन अॅन्ड जर्क प्रकारात १११ किलो
असं एकूण १९४ किलो वजन उचलून, चानूनं, टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेच्या दिशेनं, महत्त्वपूर्ण
गुणांची कमाई केली आहे.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या मुख्य
संचलनासाठी राज्यातून १४ जणांची निवड झाली आहे. यामध्ये औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चार स्वयंसेवकांचाही समावेश
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment