Thursday, 19 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19.12.2019 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.

****

** नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायदा राज्यात लागू करण्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

** दिल्लीतल्या निर्भया सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम

**  औरंगाबादच्या कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार

** आणि

** दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात  भारताचा वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी विजय

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या कायद्याविरोधात दाखल याचिकांना प्रतिसाद देण्याबाबत न्यायालयानं काल केंद्र सरकारला नोटीस दिली. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत दृकश्राव्य माध्यमातून जनजागृती करण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली. इंडियन युनियन मुस्लिम लीग, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह अन्य काहींनी या कायद्याविरोधात दाखल केलेल्या बावीस याचिकांवर येत्या बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत काल प्रचंड गदारोळ झाला. हा कायदा असंवैधानिक असल्यानं राज्यात लागू करू नये, असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच अशोक चव्हाण यांनी मांडलं. संसदेनं मंजूर केलेल्या या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करता येणार नसल्याची भूमिका मांडत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी चव्हाण यांच्या असंवैधानिक या शब्दावर आक्षेप घेतला. या मुद्यावरून झालेल्या गदारोळानंतर सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. त्यापूर्वी नागपूरच्या महापौरांवर झालेल्या गोळीबाराच्या मुद्यावरून सदनाचं कामकाज स्थगित करावं लागलं होतं. विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं.

****

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषदेत दिली. या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यास महापोर्टलची क्षमता कमी पडणार आहे. त्यामुळे महापोर्टलची क्षमता वाढेपर्यंत ही स्थगिती दिल्याचं ते म्हणाले. तसंच महापोर्टलच्यासंदर्भात परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर शालेय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्षवेधी सूचनेवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. सदस्य विलास पोतनीस यांनी राज्यातल्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

****

दिल्लीतल्या निर्भया सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. या प्रकरणी २०१७ मध्ये दिल्या गेलेल्या निकालावर पुनर्विचार करण्याची, या प्रकरणातला एक दोषी अक्षयकुमार सिंह याची याचिका, न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल फेटाळून लावली. यानंतर दोषीच्या वकिलांनी, राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली. यावर, ही याचिका दाखल करण्यासाठी कायद्यानुसार फक्त एक आठवड्याचा वेळ असतो, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं.

सोळा डिसेंबर २०१२च्या रात्री घडलेल्या या प्रकरणातल्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग, न्यायालयाच्या या निर्णयानं मोकळा झाला आहे.

****

साहित्य अकादमीनं तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी यावर्षीचे पुरस्कार काल जाहीर केले. मराठी विभागातून औरंगाबादच्या कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहाची यंदा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शाल, ताम्रपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. हिंदीसाठी नंदकिशोर आचार्य यांच्या ‘छिलते हुए अपनें को’ या काव्यसंग्रहाला, इंग्रजी भाषेसाठी शशी थरुर यांच्या भारत आणि ब्रिटीश राज या विषयावरच्या ‘ऍन इरा ऑफ डार्कनेस’ या पुस्तकाला ललितेतर विभागात, संस्कृत भाषेसाठी पेन्ना मधुसुदन यांच्या प्रज्ञाचक्षुम् या काव्यसंग्रहाला, उर्दू भाषेसाठी शाफे किदवई यांच्या सवनेह -ए-सर सय्यद: एक बाजदीद या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. नवी दिल्लीत येत्या २५ फेब्रुवारीला समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस तारखेला आकाशवाणीवरच्या ”मन की बात” या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा साठावा भाग असेल. नागरिकांना आपल्या सूचना नमो ॲप या खुल्या मंचावर किंवा मायजीओव्ही या संकेतस्थळावर पाठवता येतील.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. जिल्हा परिषदेतलं गट, गण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत आणून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम राबवावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं हे निर्देश दिले. त्यामुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणासंदर्भातली सुनावणी मात्र या पुढेही सुरू राहील असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या जाहीर कार्यक्रमानुसार या पाचही जिल्हा परिषदांसाठी येत्या सात जानेवारीला मतदान आणि आठ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

****

पुणे इथल्या शंकरराव कोळी प्रतिष्ठानतर्फे काल नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटंबातल्या पाल्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरू करण्यात आला. याअंतर्गत काल नांदेडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते या पाल्यांच्या शिक्षणासाठी धनादेश वाटप करण्यात आले.

****

विशाखापट्टणम इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं दिलेल्या ३८८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २८० धावांवर सर्वबाद झाला. कुलदीप यादवनं एकदिवसीय सामन्यात दुसऱ्यांदा हॅट्रीकची नोंद केली. त्यानं ३३व्या षटकात शाय होप, जेसन होल्डर आणि ए जोसेफ यांना सलग तीन चेंडूत बाद केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा हॅट्रीक केलेला तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - एक अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतला शेवटचा सामना येत्या रविवारी कटक इथं खेळला जाणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा सविता चौंढेकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. या नगर पंचायतीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, मात्र राज्यात तयार झालेल्या राजकीय समीकरणानंतर औंढ्यात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेनं भाजपसोबतचा करार मोडला आणि युती संपुष्टात आणली. त्यामुळे नगराध्यक्षांनी आमदार संतोष बांगर यांच्या आदेशावरुन पदाचा राजीनामा दिला.

****

नाशिक जिल्ह्यातल्या दुगारवाडी धबधबा इथं औरंगाबादहून सहलीसाठी गेलेल्या तीन बेपत्ता विद्यार्थ्यांपैकी दोघांचे मृतदेह काल रात्री सापडले. तिसऱ्या बेपत्ता युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी आज सकाळी मोहिम राबवली जाणार आहे. तेलंगणातले हे विद्यार्थी औरंगाबाद इथं कृषी विद्यालयात शिक्षण घेत होते.  

****

हिंगोली जिल्ह्यात रंगकाम करणाऱ्या दोन कामगारांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. वसमत तालुक्यातल्या कुरुंदा इथं काल दुपारी हा अपघात झाला. रंगकाम करण्यासाठी वापरत असलेल्या शिडीत वीज प्रवाह उतरून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जायकवाडी धरणाच्या कालव्यांची तातडीनं दुरुस्ती करून वाया जाणारं पाणी वाचवावं, असं आवाहन जल तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केलं आहे. सध्या या कालव्यांची स्थिती अतिशय वाईट असून, त्यातून पस्तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जातं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

****

हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं सुरु असलेली विविध विकास कामं निकृष्ट दर्जाची होत असून, या कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी काल विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. हिंगोली नगरपरिषदेतल्या भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रारी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.

****

नगरसोल - तिरुपती - नगरसोल तसंच नांदेड - तिरुपती - नांदेड या विशेष रेल्वेच्या २६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातल्या प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

रास्त भाव दुकानातला साडेतीन क्विंटल गहू बाजारात विक्रीला आणल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या एका रास्त भाव दुकानाचा चालक तसंच या गव्हाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****


No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 11 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 11 April -2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...