आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ मे २०२० सकाळी ११.००
वाजता
****
साठावा महाराष्ट्र दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात
ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त
राज्यपालांनी जनतेला दिलेल्या संदेशात, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं, आणि राज्याचा
विकास दर वाढवणं, ही दोन आव्हानं राज्यासमोर असल्याचं सांगितलं. सर्वांनी एकत्र येऊन
शासनाच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन राज्यपालांनी या संदेशातून केलं.
मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र हा दिवस मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत
साजरा करण्यात आला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून शासकीय ध्वजारोहण
झालं.
लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख, परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक, नांदेड
इथं पालकमंत्री अशोक चव्हाण, तर उस्मानाबाद इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते
महाराष्ट्र दिनाचं मुख्य ध्वजारोहण झालं.
****
नांदेड शहरात आज नव्याने तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आता नांदेड मध्ये एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या सहा झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ नीळकंठ भोसीकर यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. नांदेड मध्ये
अडकलेल्या यात्रेकरूंना पंजाब मध्ये सोडून येण्यासाठी हे तिघे ही गेले होते. यापैकी
एक जण हिंगोली जिल्ह्यातला आहे. हे तिघे नांदेड जिल्ह्यात परत येताच त्यांना थेट शासकीय
आयुर्वेद महाविद्यालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.
****
हिंगोली जिल्ह्यात एसआरपीएफ - सुरक्षा दलाच्या पंचवीस जवानांचा अहवाल
सकारात्मक आला आहे. त्यामुळे एसआरपीएफच्या एकूण एक्केचाळीस जवानांना आतापर्यंत कोरोना
विषाणूची लागण झाली असून जिल्ह्यातली रुग्णसंख्या सत्तेचाळीस झाली आहे. यापैकी तेहतीस
जवान मालेगाव इथं तर आठ जवान मुंबई इथं कार्यरत होते.
****
No comments:
Post a Comment