Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
नवी दिल्लीतील केंद्रीय राखीव
पोलिस दलाच्या एकतीसाव्या बटालीयनमधे कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या १२२
झाली आहे. गेल्या काही दिवसांत मयुर विहार स्थित या बटालीयनमधे मोठ्या संख्येनं रुग्ण
आढळल्यामुळे हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. इथल्या शंभर जवानांचे तपासणी अहवाल
प्राप्त व्हायचे असल्याची माहिती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
जालना इथं कोरोना विषाणूचे पाच नवे रुग्ण आढळले असून
यात राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. इथली एकूण रुग्ण संख्या आठ
झाली आहे. यातील दोन रुग्ण आतापर्यंत बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
मधुकर राठोड यांनी दिली आहे. मूळ जालन्याचे असलेले राज्य राखीव पोलिस दलाचे तीन जवान
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या मालेगावमध्ये तैनात होते आणि त्यांच्या
लाळेचे नमुने औरंगाबादला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्या तपासणी अहवालानुसार त्यांना
याची लागण झाल्याचं समोर आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटलं आहे. उर्वरित
दोन रुग्ण मुंबईला प्रवास करून आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
****
सांगली जिल्ह्यात आणखी एका तरुणीला कोरोना विषाणूचा
संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. ही तरुणी दुधेभावी गावातल्या रुग्ण व्यक्तीची नातेवाईक
आहे. सांगली जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता ३३ झाली आहे.
****
अमरावती इथं कोरोना विषाणूची लागण झालेले चार नवे
रुग्ण आढळले आहेत. शहरातल्या ताजनगरमधे दोन तर तारखेडा भागात एक नवा रुग्ण आढळला आहे.
करवरनगरच्या एका मरण पावलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली होती, असं आता
स्पष्ट झालं आहे. अमरावती शहरातल्या रुग्णांची संख्या आता ४७ झाली आहे.
****
सातारा जिल्ह्यात नवे पाच कोरोना विषाणू बाधीत रुग्ण
आढळले आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती कारागृहातल्या
दोन बंदींचा समावेश आहे. हे बंदी पुण्याच्या
कारागृहातून आले होते. तसंच कराड मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला एक,
कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथं झालेल्या तिहेरी
हत्याकांडातल्या एका आरोपीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या
हत्याकांड प्रकरणी १०६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लागण झालेला आरोपी वाड्याच्या
पोलिस ठाण्यातील कोठडीत होता. त्याच्या सहवासात आलेल्या इतर वीस सह आरोपी आणि तेवीस
पोलिस कर्मचाऱ्यांचं अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या नवनिर्मिती
बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीनं शहर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या भटक्या विमुक्त जातींच्या
आणि गोरगरीब लोकांना आठ दिवस पुरेल एवढं धान्य वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर बिहारच्या
अडकलेल्या कामगारांना या संस्थेतर्फे मदत देण्यात
आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानदारांना
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातर्फे निर्जंतुकीकरण आणि मास्क वाटप करण्यात आलं.
या दुकानदारांचा अनेक ग्राहकांशी थेट संपर्क येतो त्यामुळे खबरदारीसाठी जिल्हा पुरवठा
अधिकारी चारुशीला देशमुख यांच्याकडे हे साहित्य सोपवण्यात आलं. उस्मानाबाद शहरातील
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांजा मार्ग परिसरात गरजू कुटुंबांना
अन्न धान्याची पाकिटं वितरित केली.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात काल दुर्गाष्टमीनिमित्त
आंब्यांची आरास करण्यात आली. एका भक्तानं दिलेल्या १०१ हापूस आणि केशर आंब्यानं ही
आरास करण्यात आली.
****
मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या कामगारांना गेल्या तीन
महिन्यां पासून रोजगार मिळाला नसल्यानं, राज्य
आणि केंद्र सरकारनं त्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी नांदेड इथं शालेय पोषण आहार
कामगार संघटनेच्यावतीनं करण्यात आले आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी शालेय पोषण कामगार
शासनाचं काम तत्परतेने करीत आहेत त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शालेय पोषण आहार कामगारांना
आर्थिक मदत करावी अशी मागणीही या संघटनेनं कामगार दिनाच्या निमित्तानं केली आहे.
***
सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ तालुक्यातल्या ढालगाव
इथं मारहाण झालेल्या कंत्राटी वीज कामगाराचा उपचार सुरू असताना काल मृत्यू झाल्यानंतर
या प्रकरणी आता मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना
महावितरण विभागानं मदत करावी, अशी मागणी कंत्राटी वीजकामगार संघटनेनं केली आहे. या
भागात तार टाकून वीज चोरी होत असल्याचं गेल्या २८एप्रिल रोजी आढळलं होतं. या कर्मचाऱ्यानं
या तारा काढून टाकल्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या दोघांनी या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
केली होती.
*****
***
No comments:
Post a Comment